शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन करताना डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. एस.टी. बागलकोटी. सोबत अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. व्ही.बी. ककडे आदी. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात बोलताना डॉ. एस.टी. बागलकोटी. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. व्ही.बी. ककडे, डॉ.एम.एस. देशमुख, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. डी.सी. तळुले. |
कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: स्वतःला शेतकरी, कामगार आणि
सैनिक यांच्यातीलच एक समजणारे छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने वंचित, शोषित,
गोरगरीबांचे मसीहा होते, असे प्रतिपादन धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाचे प्रा. डॉ.
एस.टी. बागलकोटी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र
अधिविभागाच्या वतीने ‘छत्रपती शाहू महाराज यांचे विचार व धोरण यांचे समकालीन औचित्य’ या विषयावर दोनदिवसीय
चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. त्या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषक
म्हणून ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील होते.
Dr. S.T. Bagalkoti |
डॉ. बागलकोटी म्हणाले, समाजामध्ये समानता,
सामाजिक न्याय आणि वैश्विक बंधुत्वाची भावना प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र
झटणारे राजर्षी शाहू महाराज यांची अंगिकृत कार्याप्रती पराकोटीची निष्ठा होती.
ब्राह्मणी वर्चस्ववादावर प्रहार करीत असतानाच ब्राह्मणेतर समाजामध्ये आत्मोन्नतीची
भावना चेतविण्याचे महत्कार्य त्यांनी केले. भेदभाव न करण्याचे रयतेला आदेश जारी
करीत असताना जातवर्चस्वाच्या भावनेपासून खालच्या वर्गांची मुक्तता करणे ही
ब्रिटीशांपासून मुक्तता मिळविण्याइतकाच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचा प्रश्न
आहे, असे त्यांचे मत होते. राज्याच्या विकासात प्रत्येक समाजघटकाचा समान वाटा व
समान संधी असली पाहिजे, असे त्यांचे मत होते आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न
चालविले होते. त्यामुळे शाहू महाराजांकडे आपण समावेशी धोरणाचे एक आदर्श प्रतीक
म्हणून पाहण्याची गरज आहे.
शाहू महाराज हे उच्चकोटीचे कृतीशील अर्थतज्ज्ञ
होते, असे मत व्यक्त करून डॉ. बागलकोटी म्हणाले, शाहू महाराजांनी शेती, सिंचन,
पायाभूत सुविधा विकास, रस्ते विकास, पणन-विपणन, लघु व मध्यम उद्योगांचा विकास आदी
अनेक क्षेत्रांचा साकल्याने विचार व विकास केला. त्यामध्ये लोकसहभाग मिळविण्यासाठी
प्रयत्न केले. उर्ध्वगामी प्रशासनाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी प्रयत्न केले.
गावपंचायत व्यवस्थांची निर्मिती करून लोकांना स्व-प्रशासन देण्याची तयारी
दाखविणारे ते एक सच्चे प्रशासक होते. त्यांच्या चरित्रापासून कृतीशीलता, अंगिकृत
कार्याप्रती निष्ठा आणि समर्पण या गुणांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घेण्याची
गरज आहे. सहभागात्मक विकास, संसाधनांचे समन्यायी वाटप, शिक्षण, आरोग्य व पायाभूत
सुविधा विकासावर भरीव व नेमका खर्च, शेतीच्या वृद्धीला मदत, सामाजिक-आर्थिक
विकासासाठी प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्वानांचा योग्य आदर या बाबी
करण्यासाठी शाहूचरित्रापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. या देशाच्या विकासासाठी
शाहूंचे विचार व कार्य आजही अत्यंत उपयुक्त आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Dr. J.F. Patil |
अध्यक्षीय भाषणात डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले, लोकशाहीत
धोरण निर्धारित करणाऱ्या संस्था जेव्हा निष्क्रिय होतात, तेव्हा स्वातंत्र्याला,
सामाजिक न्याय प्रस्थापनेला मर्यादा पडतात. समावेशी विकासाला अडथळा करतात.
नव्वदोत्तरी कालखंडात देशात मोठ्या प्रमाणात असमानता वाढू लागली. सामाजिक-आर्थिक
दरी वाढू लागली. असमानता आणि समावेशी विकास या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात
येऊ शकत नाही. अर्थात, वाढती असमानता ही समावेशी वृद्धीमधील सर्वात मोठी आडकाठी
आहे. ही असमानता दूर करण्यासाठी हिरीरीने प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
आहे. जी व्यवस्था प्रत्येकाला रोजगार देऊ शकते, ती खऱ्या अर्थाने समावेशी
स्वरुपाची असते, याची जाणीव ठेवून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. कांबळे यांनी
स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. एम.एस. देशमुख यांनी आभार मानले. डॉ. व्ही.पी.
कट्टी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. व्ही.बी. ककडे, डॉ. डी.सी. तळुले, डॉ. आर.जी. दंडगे, डॉ.
एस.टी. कोंबडे, डॉ. एस.पी. पंचगल्ले यांच्यासह संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक,
संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment