Friday, 23 February 2018

आत्मविश्वासाच्या बळावर उद्योगातील अडचणींवर मात करणे शक्य: प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के




कोल्हापूर, दि. २४ फेब्रुवारी: प्रचंड इच्छाशक्ती आत्मविश्वासाच्या जोरावर उद्योग, व्यवसाया येणाऱ्या अडचणींवर मात करणे शक्य असल्याचे प्रतिपादन प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र, मध्यवर्ती प्लेसमेंट सेल आणि शिवाजी विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित उद्योजता विकास कार्यक्रमामध्ये प्र-कुलगुरु डॉ.शिर्के बोलत होते. यावेळी स्टार्टअप तज्ज्ञ सचिन कुंभोज यांची प्रमुख उपस्थित होती.
प्र-कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, कुशल उद्योजक होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी आणि कामासातत्य राखणे आवश्यक आहे. यशस्वी उद्योजक प्रथम छोटया-छोटया व्यवसायाने सुरुवात करतात. त्यानंतर अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसायवृद्धी करतात. विद्यार्थ्यांनी उद्योजक हो इतरांना उद्योग-व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे. आजचा टेक्नोसॅव्ही तरुण एका क्लिकवर उद्योगांची माहिती उपलब्ध करु शकतो. त्याचा उपयोग आपल्या ज्ञानवृद्धीबरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी करणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. तो कोठेही विकत मिळत नाही. कष्टाच्या तयारीपुढे कोणत्याही नव-उद्योजकास पैशाची अडचण भासत नाही. यशस्वी उद्योजक होण्यासाठी योग्य नियोजनाबरोबरच प्रचंड कष्टाची आवश्यकता असते. तसेच, मेहनतीमध्ये सातत्य आणि वेळोवेळी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी ठराविक मार्गानेच जातात, थोडेसे नियोजन करुन वेगळी वाटही निर्माण करणे शक्य आहे.
विद्यापीठाच्या कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जी.एस. राशिनकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment