Thursday, 22 February 2018

निवडणुकांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सखोल चिंतन आवश्यक: शेखर चन्ने



शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातून काढण्यात आलेली निवडणूक प्रबोधन रॅली.



शिवाजी विद्यापीठात आयोजित निवडणूकविषयक एकदिवसीय चर्चासत्रात मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ. रविंद्र भणगे.

कोल्हापूर, दि. २२ फेब्रुवारी: लोकशाही निवडणूक प्रक्रियेत मतदारांना वस्तू समजून त्यांची किंमत लावणाऱ्या भ्रष्टाचारी प्रवृत्ती रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच समाजातील बुद्धीवंतांकडूनही सखोल चिंतन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी आज सकाळी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणुकांतील आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे या विषयावर आयोजित एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटक या नात्याने बीजभाषण करताना ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील होत्या.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव श्री. शेखर चन्ने
आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक सुधारणा या विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार व वस्तुनिष्ठ मांडणी करताना श्री. चन्ने यांनी भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात निवडणुकांमध्ये झालेल्या विविध बदलांचा व प्रवाहांचा वेध घेतला. ते म्हणाले, निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून बळाचा (मसल-पॉवर) आणि पैशांचा (मनी पॉवर) वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले. तथापि, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने बळाचा वापर रोखण्यात आयोगाला यश आले. मात्र, पैशाचा गैरवापर, प्रभाव आणि दबाव कमी करण्यात अद्याप अपेक्षेइतके यश मिळालेले नाही. याचे कारण असे की, उमेदवारांकडून मतदारांना भुरळ पाडण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या जात असतात. विविध प्रलोभने, आडमार्गाने भेटवस्तू, जेवणावळी असे यंत्रणेच्या डोळ्यांत धुळफेक करणारे अप्रत्यक्ष मार्ग पैसा मुरविण्यासाठी अवलंबले जातात. या प्रवृत्तींमुळे लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला जसा मतदानाचा अधिकार असला, तरी निवडणूक लढविण्याची समान संधी मात्र उपलब्ध होऊ शकत नाही. पैशाचा गैरवापर या समान संधीच्या आड येतो. तसे होऊ नये यासाठी जबाबदार समाजघटकांनी मतदारांचे प्रबोधन करण्यावर भर दिला पाहिजे, तर मतदारांनीही अशा प्रलोभनांना बळी न पडण्याचा निर्धार करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्नशील आहे. कागदी मतपत्रिकांपासून सुरू झालेला मतदान प्रक्रियेचा प्रवास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण ई.व्ही.एम. यंत्रांपर्यंत केला. आता त्यापुढे जाऊन व्ही.व्ही.-पॅट यंत्रणेपर्यंत आपण पोहोचलो आहोत. पण, सक्षम लोकशाहीसाठी मतदारांनी स्वतःहून भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्याचप्रमाणे अशा चर्चासत्रांच्या माध्यमातून यावर आपण काही तंत्रज्ञानात्मक उपाय देऊ शकू का, या विषयीही चिंतन होण्याची गरज असल्याचे मत श्री. चन्ने यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. भारती पाटील म्हणाल्या, विकसनशील देशांमध्ये केवळ भारत हा एकच देश असा आहे की जिथे लोकशाही टिकली. या लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी येथील निवडणूक प्रक्रियेकडे अधिक सटिक पद्धतीने पाहणे गरजेचे आहे. माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त श्री. टी.एन. शेषन आणि सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त श्री. जे.एस. सहारिया यांच्यासारख्या संवेदनशील अधिकाऱ्यांनी चालविलेले प्रयत्न लोकशाहीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या प्रयत्नांना विद्यापीठासारख्या यंत्रणांनी मजबूत साथ देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या अंतर्गत लोकशाहीबाबतही गांभीर्याने सखोल चिंतन होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
राज्य निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अनेक विधायक उपक्रम विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासून राबवित आहे. तसेच, आयोगाच्या सूचनेनुसार, लोकशाही, सुशासन व निवडणुका हा विषय विद्यापीठात तातडीने सुरू करण्यात आल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.
सुरवातीला राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रविंद्र भणगे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणातून निवडणूक प्रबोधन रॅली काढण्यात आली. श्री. चन्ने यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. रॅलीत विद्यापीठातील तसेच महाविद्यालयीन राज्यशास्त्र अधिविभागातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.

No comments:

Post a Comment