Friday, 9 February 2018

भारताला राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य बाबासाहेबांकडून: डॉ. भारत पाटणकर




विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ
कोल्हापूर, दि. ९ फेब्रुवारी: ब्रिटीशांच्या ताब्यातून स्वतंत्र झालेल्या भारताला राज्यघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, त्याचप्रमाणे हे राष्ट्र सातत्याने विकास पावत राहील, याची तरतूदही त्यांनी घटनेमध्ये करून ठेवली, हे बाबासाहेबांचे भारताचे राष्ट्रनिर्माता म्हणून सर्वाधिक मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित आधुनिक भारताच्या उभारणीत राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ते बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रनिर्माता आणि आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान अशा दुहेरी अंगांनी विचार करावा लागतो. बाबासाहेबांनी भारताची घटना अशा पद्धतीने लिहीली की, ज्यामध्ये राष्ट्रनिर्मिती व राष्ट्रउभारणीची प्रक्रिया निरंतर होत राहील, अशी व्यवस्था आहे. जगातील अन्य कोणत्याही देशाच्या घटनेमध्ये अशी तरतूद नाही. भारतीय समाजातील जात, धर्म, पंथ, लिंग आदींच्या आधारावर प्रस्थापित झालेल्या शोषण व्यवस्थेचा अंत करण्याच्या दृष्टीने राज्यघटनेत जागा निर्माण करून देण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या समता, स्वातंत्र्य व बंधुता अर्थात मत्ता या तत्त्वाच्या आधारावरच राज्यघटनेची पर्यायाने या राष्ट्राची उभारणी केली. प्रेम व करुणा या बुद्धाने सांगितलेल्या मूलभूत तत्त्वांखेरीज एकात्म राष्ट्राची उभारणी अशक्य आहे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणून त्यांनी त्यांचा समावेश घटनेत केला.
आधुनिक भारताची बाबासाहेबांची संकल्पनाही केवळ तंत्रज्ञानात्मक अथवा भौतिक आधुनिकतेच्या पलिकडे जाणारी असल्याचे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, बाबासाहेबांनी जल, जमीन आणि जंगल या नैसर्गिक संसाधनांची संकल्पना माणसाशी जोडून त्यांची पुनर्मांडणी केली. स्वातंत्र्य, नैसर्गिक संसाधने आणि मानव यांच्यातील सहसंबंधांची प्रस्थापना हा या मांडणीमागील कळीचा मुद्दा आहे. शेतीचे आधुनिकीकरण या बाबीचा विचार करताना बाबासाहेबांना त्यात केवळ तंत्रज्ञानात्मक आधुनिकता अभिप्रेत नाही, तर शेती ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून तिच्या माध्यमातून उत्पादकता वृद्धीसाठी त्यात गुंतलेले मनुष्यबळ, नैसर्गिक संसाधने यांना प्रचलित पद्धतीमधून मुक्त करणे अभिप्रेत आहे. देशातील ७३ टक्के साधनसंपत्ती केवळ एक टक्का लोकांच्या हाती एकवटलेली असणे हे राष्ट्रीय आपत्तीचे निदर्शक असून आधुनिक राष्ट्रउभारणीसाठी घातक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. गेल ऑम्व्हेट आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाल्या, जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या बरोबरीने त्यांनी या देशात निर्माण केलेल्या अनेक समस्या व दुःखे यांचे निराकरण करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. जीवनाचा अधिकार व जगण्याचा अधिकार यांचा राज्यघटनेत समावेश हे त्यांचे भारतीय समाजावर फार मोठे उपकार आहेत. राज्यघटनेने प्रदान केलेल्या एक व्यक्ती-एक मत ही बाब खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात यावयाची असेल तर तिला सामाजिक-आर्थिक समतेचे अधिष्ठान लाभायला हवे. भांडवलशाहीमुक्त व शोषणमुक्त व्यवस्था प्रस्थापित झाल्याखेरीज या देशाची भरभराट होणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. महिलांची शोषणमुक्ती करण्याच्या दिशेने हिंदू कोड बिल ही बाबासाहेबांची या समाजाला महान देणगी असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी बाबासाहेबांच्या राष्ट्रउभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, बाबासाहेबांनी चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीचा आग्रह धरला. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांनी ग्रंथांच्या सहवासात राहिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. तर, चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीसाठी त्या समाजातील शिक्षकही चारित्र्यसंपन्न व विनयशील असायला हवेत, यासाठी बाबासाहेब आग्रही होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले तर, डॉ. गिरीश मोरे यांनी आभार मानले. यावेळी धारवाड येथील डॉ. टी.ब्रह्मानंदन यांच्यासह अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ.ए.एम. गुरव, प्रा. हरिष भालेराव, प्रा. विनय कांबळे, डॉ. भगवान माने, डॉ. राजन गवस, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. गौतम कांबळे यांच्यासह विविध अधिविभागांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment