Friday, 9 February 2018

विद्यार्थ्यांनी संकल्पनात्मक, कृतीशील शिक्षणाची कास धरणे आवश्यक: कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर


डॉ. पंडित विद्यासागर



कोल्हापूर, दि. फेब्रुवारी: एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कृतीशील शिक्षणाकडे वळताना संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्यामधील सुप्त कौशल्य गुणांचा शोध घेवून त्यांचा विकास करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागामार्फत ज्ञानविस्तार व्याख्यानमालेअंतर्गत  'करिअरचा मार्ग कसा निवडाल?  पायवाट की आडवाट?' या विषयावर कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांचे व्याख्यान वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षथानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. विद्यासागर म्हणाले, करिअरमध्ये उत्तुंग यश प्राप्तीसाठी तुमची ऊर्जा सामान्य ऊर्जेपेक्षा दीडपट जास्त असली पाहिजे.  यासाठी आपले मन, बुध्दी, शरीर सुदृढ असले पाहिजे.  स्पर्धेच्या जगामध्ये वावरताना एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची कला अवगत केली पाहिजे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पुढे जाण्याची, करिअर घडविण्याची तीव्र उर्मी असते.  तुम्ही कुठे शिकलात, यापेक्षा तुम्ही काय शिकलात याला जास्त महत्व असते. आपल्यामधील योग्य क्षमतांना विकसित करताना प्रत्येकाने मानवी मूल्यांची जपणूक करणे आवश्यक आहे.  प्रत्येक बारकाव्यांचा विचारपूर्वक अभ्यास करावा. त्यामुळे भविष्यामध्ये कोणतेही करिअर निवडताना अडचण येणार नाही. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कसे शिकावे हे शिकविले जात नाही.  आता, विद्यार्थ्यांनी स्वत:हून शिक्षणामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे. त्यामुळे शिक्षकांवर कायमस्वरुपी अवलंबून न राहता आवश्यक असेल तेव्हाच त्यांची मदत घ्यावी.  शिक्षणाची पद्धत बदलताना मूलभूत शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे.  तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य ज्या वेळेस दिले जाते तेव्हा त्याचा प्रभाव पडला पाहिजे.  जीवनामध्ये साध्या साध्या मूल्यांचे अनुकरण करताना सर्वोच्च ध्येय प्राप्तीचे उद्दीष्ट समोर ठेवले पाहिजे.
डॉ. विद्यासागर पुढे म्हणाले, जागतिक पातळीचा विचार करताना आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवली पाहिजे. पायवाटपेक्षा आडवाटेमध्ये स्पर्धा कमी असते.  परंतु, त्या ठिकाणी स्वत:ला सिध्द करण्याची जबाबदारीही अधिक असते. विज्ञान क्षेत्राबरोबरच भाषेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आवाका वाढविल्यास अगणीत संधी निर्माण होतील. करिअर निवडताना कोणाच्या सांगण्यावरुन करिअर निवडू नका स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा. तुम्ही जेव्हा नकारात्मतक विचार अंगीकारत नाही त्यावेळेस तुमची यशाकडे वाटचाल होत असते. विविध आव्हानांना तोंड देताना विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी वेळेचे नियोजन काटेकोरपणे केले पाहिजे.  विपरित परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी संशोधनात्मक वृत्ती जोपासली पाहिजे.  अद्यावत मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करत असताना ते आपल्यावर स्वार होऊ नये याची प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.  करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वत:चा मार्ग स्वत: निवडताना प्लॅन ए, बी, सी तयार असणे गरजेचे आहे.  त्यामुळे निराशेला सामोरे जावे लागणार नाही.   
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यामधील क्षमता ओळखून करिअरची निवड करताना व्यापक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. आजचे आधुनिक जग तंत्रज्ञानाने व्यापलेले असल्याने करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम संधी प्राप्त झाली आहे.  या नामी संधीचा उपयोग करुन घेताना विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये, उपलब्ध अभ्यासक्रम आत्मसात करुन घेतले पाहिजेत.
इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ.सी.ए.लंगरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ए.एम. सरवदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.  डॉ. पी.बी. माने यांनी आभार व्यक्त केले तर प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सौ.विद्यासागर या उपस्थित होत्या. तसेच, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांचेसह विविध अधिविभागातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment