Wednesday, 7 February 2018

गुणवत्ताधारित उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रयत्न आवश्यक: डॉ. आर. एस.माळी

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. आर.एस. माळी, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. विद्याधर खंडागळे, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. मुरली भानारकर, डॉ. कविता ओझा.



Dr. R.S. Mali
कोल्हापूर, दि. ७ फेब्रुवारी: सद्यस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत महत्वाचे असून सर्वच शैक्षणिक संस्थांनी गुणवत्ताधारित शिक्षणावर भर देणे आणि त्यासाठी त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. आर. एस.माळी यांनी केले. शिवाजी विद्यापीठात रविवारी (दि. ४) आयोजित आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उच्च शिक्षणात जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम व सुधारणा या विषयावर प्रा. माळी बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग, माहिती तंत्रज्ञान अधिविभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण हे एक महत्त्वाचे आव्हान आहे, पण ही बाब अवघड नाही. मात्र त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्वच घटकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
त्यानंतर प्रथम सत्रात डॉ. मोहन गौतम म्हणालेउच्च शिक्षणात युरोपियन व इतर राष्ट्रांमध्ये अभ्यासक्रमात सांस्कृतिक एकीकरणाच्या भूमिकेतून बहुविध सांस्कृतिकता टिकविली जात असलेचे सांगितले. सत्राध्यक्ष म्हणून प्रा. डॉ.भारती पाटील यांनी काम पाहिले.
लंडन विद्यापीठातील डॉ. सुभेन्द्र डोईफोडे यांनी परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर व प्रभाव वाढवायला हवा. त्यासाठी भारतीय उच्च शिक्षणात आवश्यक ते बदल होण्याच्या दृष्टीने विचारमंथन होऊन तातडीने कृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रा. डॉ. ए.एम.गुरव सत्राध्यक्ष होते.
यावेळी परिषदेच्या समन्वयक डॉ. प्रतिभा पाटणकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर.के. कामत यांनी परिषदेचे महत्त्व सांगितले. यावेळी आयोजन समितीतील डॉ. मुरली भानारकर, डॉ. कविता ओझा, डॉ. विद्याधर खंडागळे यांच्यासह अन्य सदस्य, विद्यार्थी, संशोधक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी संशोधक, विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले.

No comments:

Post a Comment