शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात कॉ. दत्ता देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना (डावीकडून) डॉ. भारती पाटील, कॉ. माधवराव जोगळेकर, डॉ. बाबा आढाव, डॉ. अशोक चौसाळकर. |
कॉ. माधवराव जोगळेकर |
कोल्हापूर, दि. १५ फेब्रुवारी: स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय करावयाचे, याचे आधीपासूनच नियोजन करणारे कॉ. दत्ता देशमुख एक द्रष्टे व कणखर नेते होते, असे प्रतिपादन अंबरनाथ (मुंबई) येथील कॉ.माधवराव जोगळेकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कॉ. दत्ता देशमुख अध्यासनाच्या वतीने विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात 'कॉ. दत्ता देशमुख: जीवन व कार्य' या विषयावर आज एकदिवसीय चर्चासत्र झाले. त्यावेळी बीजभाषण करताना कॉ. जोगळेकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ.अशोक चौसाळकर उपस्थित होते. यावेळी बाबा आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॉ. जोगळेकर म्हणाले, महात्मा गांधीजींच्या काळात स्वातंत्र्य लढा समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचला होता. त्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काय करावयाचे, असे दोन मत प्रवाह होते. नवजीवन संघटनेच्या माध्यमातून लोकांमध्ये शिक्षणविषयक जागृती निर्माण करण्याचे मोठे कार्य कॉ.देशमुख यांनी केले. देशामध्ये संघटनेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवायचे, ही विचारधारा त्यांनी मांडली. संघटनेच्या माध्यमातून कार्य करताना प्रश्नांची उकल अंतर्गत चर्चेच्या माध्यमातून केली जाईल, त्यामध्ये आक्रमकता असणार नाही, याची त्यांनी नेहमी दक्षता घेतली. कामगारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करणारे नेतृत्व म्हणून कॉ.देशमुख पुढे आले. राज्याच्या खेड्यापाड्यांत वीज कामगार विखुरलेला आहे, हे ओळखून त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वीज कामगार, शेत मजूर, असंघटित कामगार, धरणग्रस्त लोकांचे पुनर्वसन यासाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रश्न सोडविण्याचा, त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. यामुळे कामगारांच्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला.
अध्यक्षीय भाषणात डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले, १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या राजकारणात कॉ.दत्ता देशमुख यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. कॉ.देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे न्याय, हक्क मागण्यासाठी वीज कामगारांच्या संघटना निर्माण झाल्या. त्याचा वीज कामगारांच्या पुढील पिढीला लाभ झाला. कॉ. देशमुख यांनी शेती, पाणी, पुनर्वसन, सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये मोठे योगदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यासनाच्या समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक व परिचय करुन दिला. नेहा वाडेकर यांनी आभार मानले.
डॉ. भारत पाटणकर, मोहन देशमुख, कॉ. अतुल दिघे, सुरेश परचुरे, डॉ. टी.एस. पाटील, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment