कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे |
प्रा. देऑन शॉन |
विद्यापीठात तीनदिवसीय
आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ
कोल्हापूर, दि. १
फेब्रुवारी: जागतिक स्तरावर रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये समन्वय निर्माण करून
आधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्याची निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन दक्षिण
कोरियातील हॅनयांग विद्यापीठातील वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ प्रा. देऑन शॉन यांनी आज
येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठात
आज ‘अॅडव्हान्सेस इन केमिकल सायन्सेस’ या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
झाला. या उद्घाटन समारंभात प्रा. शॉन बोलत होते. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर
भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे होते, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. पी.एस. पाटील प्रमुख
उपस्थित होते.
प्रा. देऑन शॉन |
प्रा. शॉन म्हणाले,
आयुष्याची सर्व क्षेत्रे रसायनशास्त्राने व्यापलेली आहेत. या पार्श्वभूमीवर
रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये अनेकविध आधुनिक संशोधन सुरू आहे. या संशोधनाची
व्याप्ती वाढविण्यासाठी या सर्व शाखांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. त्या
दृष्टीने या आंतरराष्ट्रीय परिषदेला मोठे महत्त्व आहे.
शिवाजी विद्यापीठ
आणि हॅनयांग विद्यापीठ यांच्यात गेल्या पंधरा वर्षांपासून अत्यंत दृढ स्वरुपाचे संशोधकीय
व शैक्षणिक संबंध प्रस्थापित झाले असल्याचे सांगून प्रा. शॉन म्हणाले, उभय
विद्यापीठांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांतर्गत जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे संशोधन
करणे शक्य झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील प्रा. सी.डी. लोखंडे, प्रा. एस.आर.
पाटील, प्रा. विजय फुलारी, प्रा. एस.एस. कोळेकर या संशोधकांनी विविध प्रकारचे
आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प हॅनयांग विद्यापीठाच्या सहकार्याने राबविले आहेत.
त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन विद्यार्थी व सध्या नांदेड विद्यापीठात
कार्यरत असलेले डॉ. आर.एस. माने पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी हॅनयांग विद्यापीठात
आले असताना त्यांनी त्या कालावधीत शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित
केले, हा हॅनयांग विद्यापीठाच्या इतिहासातील विक्रम आहे. आजही ते या विद्यापीठाशी
संयुक्त प्रकल्पाद्वारे जोडलेले आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद
केले.
डॉ. संजीव कट्टी |
रिलायन्स उद्योग
समूहाच्या संशोधन व विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.संजीव कट्टी म्हणाले, हरित
रसायनशास्त्र आणि हरित अभियांत्रिकी या शाखांमध्ये संशोधनाचा विकास होणे ही
आजघडीची सर्वात मोठी गरज आहे. त्या दृष्टीने रसायनशास्त्रज्ञांमध्ये विचारमंथन
होण्याची आवश्यकता आहे.
आधुनिक जगाच्या गरजा
भागविण्यासाठी सातत्याने बदलणारे व विकास पावणारे शास्त्र म्हणजे रसायनशास्त्र
असल्याचे सांगून अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, रसायनशास्त्र
ही सर्वाधिक मोठी विज्ञानशाखा असून त्यामध्ये निरंतर संशोधन सुरू आहे. जागतिक
स्तरावर एकूण प्रकाशित होणाऱ्या संशोधनामध्ये निम्म्याहून अधिक संशोधन हे एकट्या
रसायनशास्त्रामधील आहे. विज्ञानाच्या
सर्वच शाखांना व्यापून उरणारे असे हे शास्त्र असून आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या
माध्यमातून ते अधिकच व्यापक होत चालले आहे. विशेषतः औषधनिर्माण शास्त्राच्या
विकासामध्ये रसायनशास्त्राने बजावलेल्या बहुमोल कामगिरीला तोड नाही, असेही ते
म्हणाले.
या परिषदेत शिवाजी
विद्यापीठाने तैवान येथील नॅशनल तैवान सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या जगातील आघाडीच्या
दोनशे विद्यापीठांत समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केला.
मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
परिषदेचे समन्वयक
प्रा. अनिल घुले यांनी स्वागत केले. रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. जी.एस.
गोकावी यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव डॉ. सागर डेळेकर यांनी आभार मानले.
दरम्यान, या परिषदेत
तैवान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांसह भारताच्या विविध विद्यापीठांतून
सुमारे तीनशेहून अधिक संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
No comments:
Post a Comment