Wednesday, 7 March 2018

भाषा समृध्द असेल तर टिकेलच - डॉ.सुलभा ब्रम्हनाळकर



कोल्हापूर, दि.7 मार्च - भाषा समृध्द असेल तर टिकेलच. भाषा कधी समृध्द होणार कधी अटणार कधी लोपही पावणार. यातून भाषेचे प्रवाहीपण मान्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कराड येथील डॉ.सुलभा ब्रम्हनाळकर यांनी केले.
 
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि सावली केअर सेंटर, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित 'आरोग्याची भाषा आणि भाषेचे आरोग्य' या विषयावरील परिसंवादामध्ये डॉ.सुलभा ब्रम्हनाळकर बोलत होत्या. यावेळी परिसंवदाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते.
डॉ.सुलभा ब्रम्हनाळकर
डॉ.सुलभा ब्रम्हनाळकर पुढे म्हणाल्या, आजच्या, मराठी भाषेपेक्षा इतिहासकालीन आणि ज्ञानेश्वरांच्या काळातील मराठी वेगळी होती. आताच्या, पिढीतील आजोबा, मुलगा आणि नातवाची मराठी वेगळी असते त्यामुळे भाषा ही प्रवाही आहे. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नागपूर, कोकण येथील भाषा स्थळ, काळानुरुप बदलत असते. भाषा हे संवादाचे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे भाषेकडून खुपच अपेक्षा वाढलेल्या आहेत. भाषेकडे भावनिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक गरजा आहेत. त्या पूर्ण होत नसेल तर त्या जोडल्या जाणार नाहीत. मराठी भाषा टिकविण्यासाठी, समृध्द होण्यासाठी सर्वांचे सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत. जगामध्ये विपूल प्रमाणात सर्वच क्षेत्रामध्ये इंग्रजीमधून लिखाण झालेले आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी भाषा जाणणेही आवश्यक आहे. आज, चीनमध्ये संपूर्ण वैद्यकीय शिक्षण चिनी भाषेत शिकविले जाते. त्यामुळे त्याचा सखोल अभ्यास करणे तेथील लोकंाना सहज शक्य आहे. भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. जगामध्ये विस्तारलेले ज्ञान क्षेत्र कवेत घ्यावयाचे असेल तर जागतिक भाषा शिकणे आवश्यक आहे. भाषा समृध्द करण्यासाठी तात्वीक चर्चेपेक्षा व्यावहारिक दृष्टीकोन जोपासणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, मराठी भाषेची वाढ होण्यासाठी सामुहीकरित्या प्रयत्न होणे गरजेचे आहे. घरामध्ये मराठी भाषा बोलणे ही आपली सांघिक जबाबदारी असली तरी मराठी भाषा वृद्‌धींगत करणे ही वैयक्तिक जबाबदारी जास्त आहे. मराठी या व्यक्तिमत्वाला इंग्रजीचा मुलामा देणे घातक आहे. मराठीचे आरोग्य सांभाळणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे काम आहे.
यावेळी डॉ.आशुतोष दिवाण, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, सावली केअर सेंटरचे डॉ.किशोर देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मराठी अधिविभागप्रमुख डॉ.राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ.नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. परिसंवादाचे सूत्रसंचालन सोनाली नवांगुळ राजेश पाटील यांनी केले. यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

------

No comments:

Post a Comment