शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे. |
डॉ. पाटील शिवाजी विद्यापीठाचेच विद्यार्थी
कोल्हापूर, दि. १०
डिसेंबर: येथील शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागाचे
प्रमुख प्रा. डॉ. प्रमोद शंकरराव तथा पी.एस. पाटील यांची आज शिवाजी विद्यापीठाच्या
प्र-कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे
कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाकडून आज सायंकाळी ई-मेलद्वारे या
नियुक्तीची माहिती विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाली. शिवाजी विद्यापीठाचे
विद्यार्थी असलेले डॉ. पाटील हे विद्यापीठाचे सातवे प्र-कुलगुरू आहेत.
दुंडगे (ता. चंदगड) येथे दि. ९ जानेवारी १९६५ रोजी जन्मलेल्या डॉ. पाटील यांचे
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. तेथीलच विलिंग्डन महाविद्यालयातून
त्यांनी पदार्थविज्ञान विषयात बी.एस्सी. केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून
त्यांनी एम.एस्सी. व पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. पाटील हे विद्यापीठात सुमारे ३०
वर्षे अध्यापन व संशोधन करीत आहेत. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर त्यांनी
प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान
विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख
म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड
टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक म्हणून ते काम पाहताहेत. अमेरिकेतील स्टॅनफॉर्ड
विद्यापीठातर्फे नुकतीच जगभरातील आघाडीच्या संशोधकांची जी क्रमवारी जाहीर केली,
त्यामध्ये डॉ. पाटील हे अप्लाईड सायन्समध्ये देशातील पाचवे, तर जगातील ३९१
क्रमांकाचे आघाडीचे संशोधक ठरले आहेत. सन २०१८ मध्ये मटेरियल सायन्स विषयातील
देशातील टॉप-१० संशोधकांमध्ये त्यांची गणना झाली. त्यांना आऊटस्टँडिंग रिसर्च
फॅकल्टी पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुमारे ६ कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांवर
त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी
प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सुमारे ५०० आंतरराष्ट्रीय शोधनिबंध
प्रकाशित आहेत. जर्मनीमधील डॅड (DAAD) फेलोशीप आणि दक्षिण कोरियातील
ब्रेनपूल फेलोशीप या प्रतिष्ठित फेलोशीप त्यांना मिळाल्या आहेत.Dr. P.S. Patil
दरम्यान, आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठात ही बातमी समजताच कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. पी.एस. पाटील
यांचे अभिनंदन व स्वागत केले.
‘दर्जेदार अध्ययन, अध्यापन प्रणाली
व संशोधन विकासावर भर देणार’
शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदावर आपली निवड केल्याबद्दल आणि विश्वास
दाखविल्याबद्दल कुलपती भगतसिंह कोश्यारी आणि कुलगुरू डॉ. डी.डी. शिर्के यांच्याप्रती
डॉ. पी.एस. पाटील यांनी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, शिवाजी
विद्यापीठात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण अध्ययन, अध्यापन प्रणाली आणि विशेषतः संशोधन
विकासावर भर देण्याचा माझा प्रयत्न राहील. नजीकच्या काळात विद्यापीठ नॅक
मानांकनाच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. त्या दृष्टीने संघबांधणी आणि क्षमता
वर्धन या बाबींवर तातडीने भर देण्यात येईल. विद्यापीठाची एन.आय.आर.एफ., वर्ल्ड
क्यू.एस. रँकिंग इत्यादी विविध मानांकनांच्या क्रमवारीत वृद्धी करण्यासाठीचे
प्रयत्न येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील शिक्षक,
संशोधकांसह सर्वच घटकांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment