Tuesday, 15 December 2020

रेशीम शेतीविषयक मार्गदर्शनातून शिवाजी विद्यापीठाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान

केंद्रीय रेशीम संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून गौरवोद्गार

 

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासमवेत केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. पंकज तिवारी, सहसंचालक डॉ. एम. मूर्ती व डॉ. शिवकुमार हुक्केरी, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने, व डॉ. ए.डी. जाधव आदी.


कोल्हापूर, दि. १५ डिसेंबर: रेशीम शेतीविषयक माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्यांना सातत्याने आवश्यक मार्गदर्शन पुरविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचे ग्रामीण विकासात मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी नुकतेच काढले.

केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्था तसेच केंद्रीय रेशीम मंडळ, म्हैसूर येथील संचालक डॉ. पंकज तिवारी, सहसंचालक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. मूर्ती आणि सहसंचालक (यांत्रिकीकरण) डॉ. शिवकुमार हुक्केरी यांनी नुकतीच (दि. १० व ११ डिसेंबर) शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स आणि इनक्युबेशन इन सेरिकल्चरला भेट दिली. येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विविध प्रक्षेत्रांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे कागल येथील रेशीम यांत्रिकीकरणासाठी लागणाऱ्या मशीन तयार करणाऱ्या प्रकल्पांना भेटी दिल्या.

विद्यापीठाच्या रेशीमशास्त्र विभागामार्फत मार्गदर्शन प्राप्त यळगूड (ता. हातकणंगले) येथील आप्पासो झुंजार, राजेंद्र बागल यांच्या रेशीम शेतीला भेट देऊन पाहणी केली. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील रेशीमशास्त्रविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडील कोषाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी पडत असल्याबद्दल या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या रेशीमशास्त्र पदविका, पदव्युत्तर पदविका प्रशिक्षण उपयुक्त ठरत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या या सेरिकल्चर इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण संकल्पना आदींना भविष्यात सहकार्य करण्याविषयी सदर शिष्टमंडळाने अनुकूलता दर्शविली. जिल्हा नियोजन समिती, केंद्रीय रेशीम मंडळ, वस्त्र मंत्रालय यांच्या सहकार्याने तुती लागवड ते कापड निर्मिती असे एकात्मिक मॉडेल विद्यापीठात उभे करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची तयारी सदर अधिकाऱ्यांनी दर्शविली.

सदर अधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रसंगी प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने, रेशीमशास्त्र सेंटरचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment