शिवाजी विद्यापीठात आयोजित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमासंदर्भात गठित उपसमितीच्या बैठकीस संबोधित करताना अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात. |
शिवाजी विद्यापीठात ‘विद्यापीठ कायदा मूल्यमापन समिती’च्या दोनदिवसीय बैठकीस
प्रारंभ
कोल्हापूर, दि. १४
डिसेंबर: केंद्राच्या नूतन
शैक्षणिक धोरणानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक विद्यापीठे कायद्यामध्ये योग्य सुधारणा
करण्यासाठी सर्व चांगल्या सूचनांचे स्वागत असून त्यातील अधिकाधिक सूचनांचा अंगिकार
करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान
आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे ऑनलाईन संवाद साधताना दिली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम-२०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी डॉ.
थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र
राज्य विद्यापीठ कायदा मूल्यमापन समिती’ ही उपसमिती स्थापन करण्यात आली
आहे. या उपसमितीच्या दोनदिवसीय बैठकांना आज सकाळी विद्यापीठ अधिकाऱ्यांसमवेत
बैठकीने प्रारंभ झाला. त्यावेळी औपचारिक उद्घाटनपर संबोधन डॉ. थोरात यांनी केले.
डॉ. थोरात म्हणाले, सदर समितीकडे राज्य शासनाने अत्यंत जबाबदारीचे काम
सोपविलेले आहे. आतापर्यंत समितीला सुमारे २५० विविध सूचना प्राप्त झाल्या आहेत. आणखीही
सूचना विविध घटकांकडून येत्या दोन दिवसांत अपेक्षित आहेत. त्या लक्षात घेऊन त्यांचा
सांगोपांग अभ्यास करण्याचे काम समितीला करावयाचे आहे. विद्यापीठांचे कुलगुरू,
कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी सर्व संबंधित
घटकांचे सदर कायद्याच्या अनुषंगाने गेल्या वर्षभरातील अनुभव, अडचणी विचारात घेऊन
त्यांनी केलेल्या सूचनांवर विचारविनिमय करण्यात येईल. कायद्याच्या सर्वच घटकांचे
पुनरावलोकन याअंतर्गत करावे लागणार आहे. त्या दृष्टीने या घटकांच्या लेखी सूचनांचा
विचार करून त्यातील योग्य व चांगल्या सूचना विचारात घेऊन कायद्यात सुधारणा
सुचविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुणे विभागाचे संचालक डॉ. धनराज माने
यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी संयोजन केले. या बैठकीस
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह समितीचे सदस्य
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, डॉ. राजन वेळूकर, यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, मुंबई विद्यापीठाचे
माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य शीतल
देवरुखकर-शेठ, विल्सन महाविद्यालयाचे
शिक्षण संचालक डॉ. टी.ए. शिवारे हे सदस्य उपस्थित होते. विद्यापीठाच्या
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.
पाटील यांच्यासह अधिकारी, शिक्षकही यावेळी उपस्थित होते. दिवसभरात समिती सदस्यांनी
विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधला.
उद्या (दि. १५) विद्यार्थी संघटनांसमवेत चर्चा
सदर समिती उद्या (दि. १५ डिसेंबर) सकाळी ११ ते ११.३० या कालावधीत विविध
विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहे. ज्या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना
उपस्थित राहावयाचे आहे, त्यांनी संघटनेच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना उपस्थित
राहता येईल. तत्पूर्वी, संबंधित संघटनेस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम
२०१६मध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने काही सूचना असल्यास त्या सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या वेबसाईटवर नोंदवाव्यात. तसेच,
सदर सूचना लेखी स्वरुपात सदर बैठकीवेळी सभागृहात समितीकडे सादर कराव्यात, असे
आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment