सर्वाधिक
शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या महाविद्यालयांचा गौरव
कोल्हापूर, दि.
१८ जून: शैक्षणिक
गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘शिवाजी
विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी
एकूण ४१० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना २९ लाख ५५ हजार रुपयांची
शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामधील सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त
करणाऱ्या अधिविभागांचे प्रमुख आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार कुलगुरू
डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते आज करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.
पदव्युत्तर प्रवेश विभागामार्फत
राबविण्यात आलेल्या या योजनेसाठी यंदा १,१३८
अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी विविध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांची निवड करून
शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. योजनेसाठी ४१० विद्यार्थी पात्र ठरले. यात विद्यार्थिनींची
संख्या ३५६ इतकी आहे.
कुलगुरू डॉ. कामत यावेळी म्हणाले, विद्यापीठाच्या
गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना
शैक्षणिक प्रवासात आर्थिक बळ देण्याबरोबरच महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता
वृद्धिंगत करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे. आज उपस्थित महाविद्यालयांनी
आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखण्याबरोबरच इतर महाविद्यालयांनाही या योजनेमध्ये
सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विविध
घटकांना शिष्यवृत्तीचे वितरण
सर्वसाधारण घटकातून सर्वाधिक २९२
विद्यार्थी पात्र ठरले. त्यामध्ये २४३ विद्यार्थ्यांना पदवी शिष्यवृत्ती आणि ४९
विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. या घटकांसाठी १७.०५
लाख रुपये वितरित करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकातून ५६ विद्यार्थी, निराधार
घटकातून ४३ विद्यार्थी, दिव्यांग घटकातून ८ विद्यार्थी, तर
क्रीडा घटकातून ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्व घटकांसह एकूण
शिष्यवृत्ती रक्कम २९.५५ लाख रुपये इतकी वितरित करण्यात आली.
सर्वाधिक
गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविणारी महाविद्यालये
विद्याशाखानिहाय आणि ग्रामीण, निमशहरी
व शहरी गटानुसार सर्वाधिक गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयांची नावे
(कंसात शिष्यवृत्तीचा आकडा याप्रमाणे) अशी-
विज्ञान
व तंत्रज्ञान विद्याशाखा: शहरी
गट : तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी
विद्यापीठ, कोल्हापूर (११), निमशहरी गट :
शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी.एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज
(१३), अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी, आष्टा
(१३), ग्रामीण गट : संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, महागाव
(ता. गडहिंग्लज) (१२),
वाणिज्य
व व्यवस्थापन विद्याशाखा: शहरी
गट : द न्यू कॉलेज, कोल्हापूर
(९), निमशहरी गट : डी. आर. माने महाविद्यालय, कागल
(११), ग्रामीण गट : भोगावती महाविद्यालय, कुरूकली
(५),
मानवविज्ञान
विद्याशाखा: शहरी
गट : द न्यू कॉलेज, कोल्हापूर (१०), निमशहरी गट :
डी. आर. माने महाविद्यालय, कागल (८), ग्रामीण गट :
पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी आर्ट्स कॉलेज, झरे
(१०),
आंतरविद्याशाखीय
विद्याशाखा: शहरी
गट : कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्स
फॉर विमेन, कोल्हापूर (६), निमशहरी गट :
संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव
(९). ग्रामीण गट : निरंक
यावेळी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा प्रशस्तीपत्र, शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. एस. एस. कदम, डॉ. एस.एच. सावंत, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. एस.एल. कदम, डॉ. एस.एम. पाटील, डॉ. राजाराम पाटील, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. डी.एम. पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी यांच्यासह महाविद्यालयांचे शिक्षक व अधिकारी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. उपकुलसचिव तेजस्विनी भूतकर यांनी आभार मानले.
.jpeg)
No comments:
Post a Comment