Tuesday, 16 June 2026

गवताळ क्षेत्रातील जैवविविधता अभ्यासण्यासाठी विद्यापीठाला संशोधन प्रकल्प मंजूर

डॉ. सुनील गायकवाड, डॉ. मनोज लेखक करणार संशोधन

डॉ. सुनील गायकवाड


डॉ. मनोज लेखक


कोल्हापूर, दि. १६ जून: पश्चिम महाराष्ट्रातील गवताळ प्रदेशातील जैववविविधतेचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प मंजूर झाला आहे. महाराष्ट्र जीन बँक आणि महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र जैवविविधता मंडळ यांच्याकडून या सुमारे ३३ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र जीन बँक आणि महाराष्ट्र जैवविविधता मंडळाकडून पश्चिम महाराष्ट्रातील दोन गवताळ प्रदेश आणि सॅव्हाना अधिवासांमधील गवत, वृक्ष, पृष्ठवंशीय प्राणी आणि निवडक संधिपाद (आर्थ्रोपॉड) गटांची विविधता (डायव्हर्सिटी ऑफ ग्रासेस, ट्रीज, वर्टिब्रेट्स अँड सिलेक्टेड आर्थ्रोपॉड्स इन टू ग्रासलॅंड्स अँन्ड सॅव्हाना हॅबिटॅट इन वेस्टर्न महाराष्ट्र) या संशोधन प्रकल्पासाठी मंजुरी आणि आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. एकूण३३,१७,०००/- इतक्या मूल्याचा हा प्रकल्प विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. सुनील गायकवाड यांना मंजूर झाला आहे. डॉ. गायकवाड हे प्रकल्प प्रमुख म्हणून आणि वनस्पतीशास्त्र अधिविभागातील डॉ. मनोज लेखक हे सह-प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

अत्यंत समाजाभिमुख सलेल्या या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार, आणि सांगली जिल्ह्यातील दंडोबा हिल्स या दोन गवताळ क्षेत्रांतील जैवविविधता तपासणे आणि तेथील परिसरात असणाऱ्या शैक्षणिक संस्था स्थानिक रहिवाशी यांना त्याची माहिती देऊन या भागांतील जैवविविधता जपण्यासाठी प्रबोधन करणे हा आहे. तसेच, या दोन्ही क्षेत्रांत राहणाऱ्या युवकांना जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन याचे ज्ञान देऊन, या क्षेत्रांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना स्थानिक गाईड म्हणून जैविविधतेची माहिती देण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यायोगे जैवविविधता संवर्धनाबरोबरच पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिकांना आर्थिक स्रोतही उत्पन्न होतील. या उपक्रमाद्वारेवैज्ञानिक, सामाजिक आर्थिक विकासात योगदान देण्याचा प्रयत्न अभिप्रेत आहे.

या संदर्भात डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकल्पातून स्थानिक जैवविविधतेची माहिती प्राप्त होईल. या संशोधनाच्या आधारे स्थानिकांसाठी उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणारा हा प्रकल्प आहे. त्यातून प्रकाशने, धोरणात्मक शिफारशींसह अनेक सामाजिक लाभाची फलिते सामोरी येण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प जून २०२६ ते मे २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र जीन बँक या संस्थांमध्ये तीन वर्षांसाठी सामंजस्य करारही झाला आहे. या कामी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment