Wednesday 14 April 2021

बाबासाहेबांमुळे भारताची एकता, अखंडता अबाधित: डॉ. विजय खरे

 

शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना डॉ. विजय खरे. (डावीकडे) कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारताची एकता व अखंडता अबाधित ठेवण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील परराष्ट्र व संरक्षणविषयक कलमांद्वारे अत्यंत कुशलतेने केले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास अधिविभागाचे तसेच संरक्षण व रणनितिक अभ्यास अधिविभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय संरक्षणविषयक विचारया विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

Dr. Vijay Khare
डॉ. विजय खरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक विचारांकडे देशाने अत्यंत सजगपणाने पाहण्याची गरज आहे. भारताची एकता, अखंडता जपण्यासाठी, या देशाला कायम एकसंध राखण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ३५२, ३५६ आणि ३०७ या तीन कलमांची केलेली योजना फार बहुमोल स्वरुपाची आहे. एखाद्या राष्ट्राने लष्करी कारवाई केल्यास ३५२ कलमाच्या आधारे राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. एखाद्या वेळी काही कारणांनी देश आर्थिक संकटात सापडल्यास ३०७ कलमाच्या आधारे राष्ट्रपती राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. यातील कलम ३५६ हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. एखादा समूह, एखादी चळवळ अति आक्रमक होऊन देशाच्या एकता व अखंडतेला धोका निर्माण करीत असेल, तर अशा वेळी राष्ट्रपती तेथे आणीबाणी जाहीर करू शकतात. खलिस्तान चळवळ, काश्मीरमधील अस्वस्थ वातावरण, ईशान्येकडील राज्यांतील अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या चळवळी अशा प्रसंगी या कलमाचा वापर करण्यात आला आणि त्या दर खेपी भारताची अखंडता अबाधित राहिली. शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित झाली. घटना समितीमध्ये या कलमाच्या अनुषंगाने सुमारे अडीच दिवस चर्चा चाललेली होती. या प्रसंगी बोलताना बाबासाहेबांनी, घरात आपण इमर्जन्सीसाठी म्हणून जशा काही वस्तू आणून ठेवतो, तशा प्रकारचे हे कलम असल्याचे सांगितले. ते सारखे वापरून बोथट करू नये. सारासार विवेकाच्या आधारेच त्याच्या वापराविषयी निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही सांगून ठेवले. त्यामुळेच आजतागायत देशाची अखंडता टिकून राहिली आहे, याचे खरे श्रेय बाबासाहेबांचे आहे.

डॉ. खरे पुढे म्हणाले, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा ही राजकीय, सामाजिक व आर्थिक बाजूंनी सर्वसमावेशक असली पाहिजे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक इशारे देऊन ठेवले आहेत. पाकिस्तानविरुद्धचा संघर्ष हा केवळ भूमीचा नाही, तर तो अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असा आहे. त्यामुळे जोवर हा प्रश्न सुटणार नाही, तोवर भारताच्या बाह्य सुरक्षेला स्थैर्य लाभणार नाही, असे त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये सांगून ठेवले आहे. चीनच्या संदर्भातही आपल्याकडे ठोस दूरगामी परराष्ट्र धोरण आजही नाही. चीन, पाकिस्तानसारखी उपद्रवी राष्ट्रे शेजारी असल्याने असे धोरण नसणे धोक्याचे ठरते. विकास आणि सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने त्यासंदर्भात भारताने काणाडोळा करणे योग्य नाही. लोकशाहीवादी राष्ट्रांशी समन्वय राखण्याबाबत बाबासाहेबांनी आवाहन केले होते. त्यानुसार भारताने योग्य दिशेने वाटचाल केलेली आहे.

एक मत, एक मूल्य, एक नागरिकत्व, एक प्रशासकीय व्यवस्था, एक न्यायव्यवस्था ही बाबासाहेबांनी या देशाला दिलेली प्रचंड मोठी देणगी आहे. तसेच, गावकुसाबाहेरील समाज बाबासाहेबांमुळे देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन प्रगतीमध्ये आपला वाटा उचलू लागला, ही त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून घडवून आणलेली रक्तविहीन क्रांती आहे, असे गौरवोद्गारही डॉ. खरे यांनी यावेळी काढले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या देशाला असलेल्या परराष्ट्र धोरण व संरक्षणविषयक पैलूंचा अधिकार वाणीने डॉ. विजय खरे यांनी परिचय करून दिला. या माध्यमातून देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेमध्ये बाबासाहेबांचे योगदान अधोरेखित झाले. त्याच्याशी राज्यघटनेचा संबंध, अन्वय यांचाही त्यांनी घेतलेला वेध अत्यंत माहितीपूर्ण व ज्ञानवर्धक स्वरुपाचा आहे. या विषयाचा सविस्तर अभ्यास करण्याकरिता शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने एक विशेष प्रकल्प हाती घेईल आणि बाबासाहेबांचा हा अद्याप फारसा झोतात नसलेला पैलू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेल, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी परिचय करून दिला. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.व्ही. गुरव, प्राचार्य हरिष भालेराव, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. एन.बी. गायकवाड, डॉ. रविंद्र श्रावस्ती, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. अमोल मिणचेकर यांच्यासह अनेक मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment