Tuesday 6 April 2021

ज्ञानाचा उपयोग वंचितांच्या उत्थानासाठी करा: प्रा. अनिल सहस्रबुद्धे

शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभास सात हजार जणांची ऑनलाईन उपस्थिती

 

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात स्नातकांना ऑनलाईन संबोधित करताना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे.

शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या दीक्षान्त समारंभात विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.आर. शेवाळे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन आणि डॉ. मेघा गुळवणी.

शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या दीक्षान्त मिरवणुकीचे नेतृत्व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांनी ज्ञानदंड घेऊन केले. मिरवणुकीत सहभागी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.

शिवाजी विद्यापीठाची ५७वी दीक्षान्त मिरवणूक परीक्षा संचालक जी.आर. पळसे यांच्या नेतृत्वाखाली कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर योग्य शारीरिक अंतर राखून काढण्यात आली. यामध्ये कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह अधिष्ठाता सहभागी झाले.  


(शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या ऑनलाईन वार्षिक दीक्षान्त समारंभाची संपूर्ण चित्रफीत.)



कोल्हापूर, दि. ६ एप्रिल: नवपदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील वंचित, शोषित घटकांच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे चेअरमन प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते.

कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते, तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचा सुमारे सात हजार नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात ७७,५४२ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्रे व पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आल्या.

प्रा. सहस्रबुद्धे नवपदवीधरांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आज आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आणि आयुष्याच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तीव्र स्पर्धेला सामोरे जात आपण या गौरवशाली परंपरेच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि आपले शैक्षणिक कार्य मोठ्या तन्मयतेने साध्य करण्याचा प्रयत्न केला. कठोर परिश्रम आणि उच्च कोटीची समर्पण वृत्ती या जोरावर आपण आपली पदवी आणि पुरस्कार प्राप्त केले आहेत. हा आपणासह आपले आयुष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलणारे आपले शिक्षक, पालक अशा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. या विद्यापीठात आपण आपल्या उच्चशिक्षणाची सुरवात मोठ्या जोमाने व उत्कटतेने केली; पण मला खात्री आहे की, हा आपला प्रवास इथेच थांबणार नाही. जोपर्यंत आपल्या जीवनाच्या प्रयोगशाळेतील अनिश्चितता, आव्हानांची पूर्तता, सकारात्मक वृत्तीने यश मिळविण्याची धमक आणि अपयशाला सामोरे जाण्याचा पूर्ण आत्मविश्वास आपल्यात निर्माण होत नाही, तोवर हा प्रवास संपत नाही. बर्‍याचदा व्यवस्थापन गुरु आणि अर्थशास्त्रज्ञ हे व्हीयूसीए (VUCA-volatile, uncertain, complex and ambiguous) अर्थात अस्थिर, अनिश्चित, जटिल आणि संदिग्ध अशा जगाबद्दल आपल्याला सांगत असतात. तथापि, मी मात्र आपणास अगदी याच्या उलट म्हणजेच एसीयूव्ही (ACUV- Dedicates Action & Positive attitude, Collaboration & co-operation, Unity & untiring efforts and emerge Victorious) अर्थात समर्पित कृती व सकारात्मक दृष्टिकोन, सहकार्य व साहचर्य आणि ऐक्य व अथक परिश्रम या त्रिसूत्रीच्या बळावर अविरत प्रयत्नांच्या साथीने अस्थिरतेवर मात करून विजयी वीर म्हणून आपला ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. सहस्रबुद्धे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, एकीकडे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य आणि दुसरीकडे आत्मनिर्भर भारत घडविण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले असतानाच्या अगदी योग्य वेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेले आहे. त्यायोगे दर्जेदार शैक्षणिक संस्थांची निर्मिती,  नाविन्यपूर्ण संस्कृती आणि अत्यंत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचीही ही योग्य वेळ आहे. तथापि, संस्थांना स्वायत्तता देणारी एक मजबूत व्यवस्था निर्माण करणे आणि त्या संस्थांना वित्तपुरवठा करणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम या बाबींना प्रेरणा देणे आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाची माहिती सर्वदूर पसरविणे या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे एकमेकांशी सहकार्य करतील आणि समाजाच्या समस्या सोडविण्यास हातभार लावतील, अशी अपेक्षा यामध्ये अनुस्यूत आहे. आगामी १५ वर्षांत आपल्याला उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रवेशाचे प्रमाण (जीईआर) ५० टक्क्यांच्या पुढे घेऊन जावयाचे आहे, जगातील आघाडीच्या शंभर शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत भारतातल्या किमान दहा संस्थांना स्थान प्राप्त करावयाचे आहे आणि त्या बळावर भारताला एक सक्षम, विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित करावयाचे आहे, याची जाणीव बाळगून त्या दिशेने सक्रिय भूमिका बजावण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना भारताच्या इतिहास आणि संस्कृतीचा सखोल परिचय करून देईल आणि त्यांना जागतिक नागरिकांमध्ये रूपांतरित करेल. हे धोरण मानवी समस्यांसाठी एकात्मिक सर्वसमावेशक संशोधन समाधानास प्रोत्साहन देईल. त्यासाठी या धोरणाची सुयोग्य अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण देशाला आपल्या तरुण लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी (डेमोग्राफिक डिव्हिडंड) सक्षम करेल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये (एसडीजी 2030) साध्य करण्यासाठीही प्रेरित करेल. नॅशनल रिसर्च फाऊंडेशनच्या स्थापनेमुळे संशोधनाची गुणवत्ता वाढेल. शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्याधुनिक संशोधनात अत्यंत सक्रिय आहे. आता या स्पर्धात्मक वातावरणात संशोधनासाठी वित्तपुरवठा प्राप्त करण्याची आपणास अधिक संधी असेल, असेही त्यांनी सांगितले.

शासन विद्यापीठासमवेत: मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
महाराष्ट्र शासन विद्यार्थी हिताच्या उपक्रमांसाठी सदैव शिवाजी विद्यापीठासमवेत असल्याचे सांगून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. शिवाजी विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रालगतच्या सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी प्रयत्न चालविले आहेत. अलिकडेच विद्यापीठातर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने मोठा पुढाकार घेतला, ही अभिनंदनीय बाब आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ साथीच्या काळात पोलीस मित्र, आरोग्य मित्र अशा अनेक भूमिकांतून काम केले आणि आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले, ही बाब कौतुकास्पद आहे. शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमांना महाराष्ट्र शासनाचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली.
रत्नागिरी या आपल्या विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे पाठविला आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तो मंजूर करावा, अशी आग्रहाची मागणी त्यांनी प्रा. सहस्रबुद्धे यांच्याकडे या प्रसंगी केली.

ही पदवी पहिली ठरावी; अंतिम नव्हे: कुलपती भगतसिंह कोश्यारी

कुलपती भगतसिंह कोश्यारी
शिवाजी विद्यापीठाचे ७७,५४२ स्नातक आज पदवी घेऊन बाहेर पडताहेत. मात्र, त्यांच्यासाठी ही पदवी पहिली ठरावी, अंतिम नव्हे! कारण शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांनी संधी मिळेल तितके उच्चशिक्षण घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रसंगी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिक्षणाच्या पुढची पायरी म्हणजे विद्या अगर ज्ञान संपादन ही असते. ज्ञानमेवामृतम् हे शिवाजी विद्यापीठाचे ब्रीद आहे. याचा अर्थ ज्ञान मनुष्याला अमर बनविते. ही मोठी बाब आहे. या ज्ञानाचा वापर आपण आपल्या भोवतालाचे कल्याण करण्यासाठी करणे आवश्यक आहे. मानवासह समस्त प्राणिमात्र, निसर्ग आणि पर्यावरण यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांनी आपले जीवन समर्पित करावे. सध्या आपण सारे प्रांतवाद आणि जातिभेदाने घेरले जातो आहोत. आपण स्वतःला एक मानव अगर भारतीय म्हणून का मानत नाही,  हा मोठा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांची आपण नावे घेतो, मात्र त्यांचे विचार अंमलात आणत नाही, हे खेदजनक आहे. आत्मनिर्भरतेची सुरवात ही स्वतःपासून करायला हवी आणि त्यामध्ये या साऱ्या पर्यावरणाचा विचार असायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, खूप काम करावे. आज अनेक साधने उपलब्ध आहेत, त्या साधनांचा देशहितासाठी सुयोग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आपण केवळ आधुनिकच नव्हे, तर अत्याधुनिक बाबतीतही अग्रणी असायला हवे. त्यायोगे आपले योगदान सर्वोत्तम असण्याच्या बाबतीत आग्रही राहावे. अशा चांगल्या कामातून आनंद मिळवावा, असे आवाहनही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले. कोविड-१९चे संकट पुन्हा आपल्यासमोर ठाकले आहे. यावेळीही सर्व घटकांनी एकजुटीने आणि दुप्पट जोमाने त्याला हद्दपार करण्यासाठी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणाचे जीवनाशी अभिन्नत्व: कुलगुरू डॉ. शिर्के

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. अहवाल सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांना आवाहन करताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिक्षण हे जीवनापासून विभक्त करता येऊ शकत नाही. शिक्षणाशी जीवनाचे हे अभिन्नत्व आणि एकजिनसीपण आपण साऱ्यांनी समजून घ्यावे. शिक्षणाचे उपयोजन जीवनात आपण कशा पद्धतीने करता यावर आपला भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली अंगभूत कौशल्ये, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या बळावर जगातील जवळजवळ सर्व देशांत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशंसनीय कामगिरी करीत आहेत. विद्यापीठाच्या लौकिकात नवपदवीधारक विद्यार्थ्यांनीही मोलाची भर घालून विद्यापीठाचा लौकिक उंचावावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रथेप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षान्त मिरवणूक निघाली. यावेळी ती कुलगुरू कार्यालयापासून समारंभ स्थळापर्यंत म्हणजे राजर्षी शाहू सिनेट सभागृहापर्यंत काढण्यात आली. त्यामध्ये कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता सहभागी झाले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांनी पदव्यांचे वाचन केले. डॉ. टी.के. करेकट्टी, धैर्यशील यादव आणि नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनीने पसायदान व राष्ट्रगीत सादर केले. यावेळी व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.आर. शेवाळे, आंतरविद्याशाखा विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी उपस्थित होते.

 

नॅकचे ++’ मानांकन प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदन

शिवाजी विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या नॅकच्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ++’ मानांकन मिळविल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये विद्यापीठाबद्दल गौरवोद्गार काढले. विद्यापीठाने शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय दर्जा सिद्ध करण्याबरोबरच विद्यार्थीप्रियता, सामाजिक बांधिलकी या निकषांवर देश पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, याचा अभिमान असल्याचे कौतुकोद्गार राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्यासह मंत्री उदय सामंत आणि प्रा. सहस्रबुद्धे यांनी काढले.

 

सुमारे सात हजार जणांची लाइव्ह उपस्थिती

यंदा कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठाने ५७वा दीक्षान्त समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचे ठरविले. त्यानुसार आज हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीवरुन थेट प्रक्षेपित करण्यात आला. ६९०६ नागरिकांनी हा कार्यक्रम लाइव्ह पाहिला. त्यानंतरही दिवसभरात सवडीनुसार लोक हा कार्यक्रम पाहात असल्याने आकडा वाढताच राहिला.

2 comments:

  1. आजचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे आयोजित झाला. सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन .

    ReplyDelete