'शिव वार्ता संवाद' कार्यक्रमांतर्गत 'महावीर की महाविनाश?' या विषयावरील मुलाखतीदरम्यान बोलताना शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. व्ही.बी. ककडे. |
शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव वार्ता' वाहिनीसाठी डॉ. व्ही.बी. ककडे यांची मुलाखत घेताना डॉ. आलोक जत्राटकर. |
कोल्हापूर, दि. २४ एप्रिल: जगाला महाविनाशापासून वाचवावयाचे असेल तर भगवान
महावीरांच्या तत्त्वज्ञानाचाच अंगिकार आपल्याला करावा लागेल, असे प्रतिपादन शिवाजी
विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. व्ही.बी. ककडे यांनी केले
आहे.
भगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ युट्यूब वाहिनीवरील ‘शिव वार्ता संवाद’ या कार्यक्रमांतर्गत ‘महावीर की महाविनाश?’ या विषयावर डॉ. ककडे यांची विशेष मुलाखत जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक
जत्राटकर यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
डॉ. ककडे म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीची अपरिमित हानी, सत्तासंघर्ष,
संपत्तीचे केंद्रीकरण आदी अनेक कारणांनी जग एका मोठ्या विनाशाकडे निघाले आहे. या
विनाशापासून जगाला वाचवावयाचे असेल तर भगवान महावीरांच्या सत्य, अहिंसा, अस्तेय
आणि अपरिग्रह या मूल्यांचा अंगिकार प्रत्येकाने व्यक्तीगत पातळीवर करावयास हवा. भगवान
महावीरांनी कोणत्याही देवाची अगर व्यक्तीची पूजा केली नाही, तर त्यांनी सदैव या
मानवी मूल्यांचीच उपासना केली. हीच तत्त्वे त्यांनी जगाला प्रदान केली. त्याचप्रमाणे
सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या रत्नत्रयींचा अंगिकार हा
सार्वत्रिक पातळीवर होणे आवश्यक आहे. एखाद्या विषयावर साकल्याने सर्वंकष विचार
करणे हा सम्यक दर्शनाचा विशेष आहे. त्यापुढील पायरी म्हणजे सम्यक ज्ञान आहे.
अर्थात एखाद्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त करवून घेणे. या दोन पायऱ्या आज
जगाने बऱ्यापैकी गाठलेल्या आहेत. तथापि, अद्याप सम्यक चारित्र्यापर्यंतचा प्रवास
आपल्याला करावयाचा आहे. त्यासाठी भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान मुळापासून समजावून
घेण्याची, अंगिकृत करण्याची गरज आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या उपक्रमांबद्दल
माहिती देताना डॉ. ककडे म्हणाले, जैन धर्मातील २४ तीर्थंकर आणि त्यांच्या
योगदानाची, शिकवणीची किमान माहिती लोकांना व्हावी, यासाठी अध्यासनामार्फत २४
पुस्तकांची ग्रंथमाला प्रकाशित करण्यात आली. तिला सर्वदूर उत्तम प्रतिसाद लाभला. पहिली
आवृत्ती आता संपत आली आहे. जैन धर्मातील कोणीही आंतरजातीय विवाह केला, तर जैन तत्त्वज्ञानाची
माहिती त्यांना व्हावी, यासाठी हा संच भेट देण्याचा उपक्रम समाज राबवित आहे, ही
फार समाधानाची बाब आहे. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रेरणेतून
अध्यासनाच्या सल्लागार समितीची फेररचना केली असून त्यामध्ये अजैन असलेल्या
मान्यवरांचाही समावेश केला आहे. जैन तत्त्वज्ञान केवळ एका विशिष्ट धर्मापुरते
मर्यादित राहू नये, तर प्रत्येकाला जात-धर्मनिरपेक्ष त्यांचा अभ्यास करता यावा, ही
व्यापक भूमिका त्यामागे आहे. अध्यासनामार्फत जैनॉलॉजीचे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम
चालविले जातात. त्यांनाही उत्तम प्रतिसाद आहे. अध्यासनाची स्वतंत्र इमारत
उभारण्याचेही प्रस्तावित आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन
आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहनही डॉ. ककडे यांनी या प्रसंगी केले.
डॉ. ककडे यांची ही सविस्तर मुलाखत शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ युट्यूब वाहिनीवर https://youtu.be/8NCkLSbGMIE या लिंकवर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment