Showing posts with label SCOPUS. Show all posts
Showing posts with label SCOPUS. Show all posts

Monday, 22 July 2024

विद्यापीठातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करावे: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. धनंजय सुतार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व गिरीश कुलकर्णी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.




कोल्हापूर, दि. २२ जुलै: शिवाजी विद्यापीठाचा लौकिक हा जागतिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या संशोधनाच्या दर्जामुळे सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे संशोधकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये आपले संशोधन प्रकाशित व्हावे, यासाठी दर्जेदार संशोधन करावे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकदिवसीय स्कोपस व निंबस यांविषयी जागरुकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, संशोधनासाठी विविध प्रकारची संदर्भसाधने हाताशी असणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने ग्रंथालये मौलिक भूमिका बजावतात. माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी संशोधकाला ग्रंथालयांत जाऊन दुर्मिळ आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचे संदर्भग्रंथ, शोधपत्रिका पाहाव्या लागत. त्यांच्या आधारे आवश्यक संदर्भ हाताने उतरून घ्यावे लागत. तथापि, आता आधुनिक काळात सर्व प्रकारचे ई-रिसोर्सेस उपलब्ध आहेत. ग्रंथालये ऑनलाईन झाली आहेत. सर्व संदर्भसाधने ऑनलाईन उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवरील कोणतीही माहिती, पुस्तक, संदर्भ क्षणात मिळविता येते. यामुळे संशोधनाचा दर्जा उंचावणे शक्य झाले आहे. हे दर्जानिश्चितीचे काम स्कोपस आणि निम्बससारखे निर्देशांक करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून संशोधक आपले संशोधन प्रकाशित करतात, तेव्हा स्कोपसमध्ये त्यांची नोंद होण्याची शक्यता वाढते. गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे सुमारे ९०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकांतून प्रकाशित झाले. त्यांनी सुमारे दीड लाख सायटेशन्स मिळाले. विद्यापीठाच्या एच-इंडेक्स १३५च्या घरात आहे, जो महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ही कामगिरी उंचावत ठेवण्यासाठी संशोधकांनी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठासह देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांचा संशोधकीय वेध घेतला असता भौतिकशास्त्र, मटेरियल सायन्स, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र अशा निवडक विषयांतील संशोधनाची संख्या अत्यधिक असल्याचे जाणवते. त्याचवेळी मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान शाखांकडील विषयांतील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी आहे. मराठीसारख्या विषयांचा अपवाद गृहित धरला तरीही या विद्याशाखांमधील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीने संशोधकांनी आणि विद्यापीठांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधनासाठी, विशेषतः संदर्भसाधनांच्या उपलब्धतेसाठी शिवाजी विद्यापीठाने भरीव तरतूद केली आहे, त्या साधनांचा संशोधक, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रुपाली भोसले व एस.डी. हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात मुंबईच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम टेक्नॉलॉजी (जिस्ट) या कंपनीचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी निम्बसच्या उपयोजनाविषयी, तर नवी दिल्लीच्या एल्सव्हियरच्या कस्टमर कन्सल्टंट ऐश्वर्या नायल यांनी स्कोपसच्या उपयोजनाविषयी उपस्थित संशोधक, विद्यार्थ्यांना अवगत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात, डॉ. वाय.जी. जाधव यांच्यासह ग्रंथालयातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, 30 August 2016

मटेरिअल सायन्सच्या संशोधनात शिवाजी विद्यापीठ देशात अग्रणी




संशोधन संस्थांच्या क्रमवारीत अकृषी विद्यापीठांत सहावे; राज्यातील पहिले स्थान पुनश्च अधोरेखित



कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: येथील शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली आगेकूच कायम राखताना देशातील आघाडीच्या ७० संशोधन संस्थांच्या यादीत १९वे, तर अकृषी विद्यापीठांत देशात सहावे स्थान प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे मटेरियल सायन्सच्या संशोधनात आघाडीच्या २५ संस्थांत चौथे, तर अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान प्राप्त केले आहे. संशोधनाच्या बाबतीतही शिवाजी विद्यापीठाचे राज्यातील अग्रस्थान या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 'करन्ट सायन्स' या जागतिक आघाडीच्या विज्ञान पत्रिकेच्या ताज्या अंकात ही क्रमवारी जाहीर झाली आहे.
'करन्ट सायन्स'च्या १० ऑगस्ट २०१६च्या अंकात 'मॅपिंग एक्सलन्स ॲन्ड डायव्हर्सिटी ऑफ रिसर्च परफॉर्मन्स इन इंडिया' हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये सायइमॅजो इन्स्टिट्यूशनल रँकिंग (एस.आय.आर.)साठी स्कोपसद्वारे गोळा करण्यात आलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे. ज्या संशोधन संस्थांमधून २२ महत्त्वाच्या विषयांचे ५००हून अधिक शोधनिबंध, रिव्ह्यू अथवा कॉन्फरन्स पेपर प्रकाशित झाले आहेत, अशा संस्थांचा विचार या क्रमवारीसाठी करण्यात आला. या २२ विषयांमध्ये अभियांत्रिकी, पदार्थविज्ञान व खगोल, संगणकशास्त्र, मटेरिअल सायन्स, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, रासायनिक अभियांत्रिकी, ऊर्जा, फार्माकोलॉजी, टॉक्सिकॉलॉजी ॲन्ड फार्मास्युटिक्स, कृषी व जैवविज्ञान, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स ॲन्ड मॉलेक्युलर बायोलॉजी, पर्यावरणशास्त्र, भूशास्त्र, इम्युनॉलॉजी व सूक्ष्मजीवशास्त्र, कला व मानव्यविद्या, आरोग्यविज्ञान, न्युरोसायन्स, नर्सिंग, मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश होता.
उपरोक्त निकषांवर भारतातील ७० आघाडीच्या संशोधन संस्थांची क्रमवारी निर्धारित करण्यात आली. कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ही संस्था या यादीत अग्रस्थानी आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाने २८७५.५ गुणांकनासह (एफ स्कोअर) १९ वे स्थान प्राप्त केले. केवळ अकृषी विद्यापीठांचा विचार केल्यास शिवाजी विद्यापीठाचा देशात सहावा क्रमांक लागतो. जाधवपूर विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठ ही पहिली पाच अकृषी विद्यापीठे आहेत. या यादीत शिवाजी विद्यापीठाखेरीज महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाचा ४६व्या स्थानी (एफ स्कोअर ५२३.४५) समावेश आहे.
मटेरिअल सायन्स संशोधनात देशातील अकृषी विद्यापीठांत अग्रस्थानी
या संशोधनाधारित क्रमवारीत मटेरिअल सायन्सच्या संशोधनात शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २५ संशोधन संस्थांच्या यादीत चौथे, तर अकृषी विद्यापीठांत देशात पहिले स्थान मिळविले आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या तीन संस्थांनी या क्रमवारीत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले आहेत. या यादीत स्थान मिळविणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. विद्यापीठाने या विषयातील ५६८ शोधनिबंध प्रकाशित केले आणि विद्यापीठाचा बेस्ट पेपर रेट २२.५ इतका सर्वोच्च आहे.
संशोधनाचा दर्जा पुनश्च अधोरेखित: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपला दर्जा व गुणवत्ता कायम राखली असल्याची बाब 'करन्ट सायन्स'ने जाहीर केलेल्या क्रमवारीमधून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अकृषी विद्यापीठांत देशात सहावे आणि राज्यात पहिले स्थान मिळवून शिवाजी विद्यापीठाने संशोधनाची संख्या व गुणवत्ता या दोन्ही बाबतीत संतुलन सांभाळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मटेरिअल सायन्सच्या संशोधनामध्ये अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान पटकावून या क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. याबद्दल विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि संशोधक विद्यार्थी हे सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.