संशोधन संस्थांच्या क्रमवारीत अकृषी विद्यापीठांत सहावे; राज्यातील पहिले स्थान पुनश्च
अधोरेखित
कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: येथील शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली
आगेकूच कायम राखताना देशातील आघाडीच्या ७० संशोधन संस्थांच्या यादीत १९वे, तर
अकृषी विद्यापीठांत देशात सहावे स्थान प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे मटेरियल
सायन्सच्या संशोधनात आघाडीच्या २५ संस्थांत चौथे, तर अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान प्राप्त केले आहे. संशोधनाच्या बाबतीतही शिवाजी विद्यापीठाचे
राज्यातील अग्रस्थान या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 'करन्ट सायन्स' या जागतिक आघाडीच्या
विज्ञान पत्रिकेच्या ताज्या अंकात ही क्रमवारी जाहीर झाली आहे.
'करन्ट सायन्स'च्या १० ऑगस्ट २०१६च्या अंकात 'मॅपिंग एक्सलन्स ॲन्ड
डायव्हर्सिटी ऑफ रिसर्च परफॉर्मन्स इन इंडिया' हा विशेष लेख
प्रकाशित झाला आहे. यामध्ये सायइमॅजो इन्स्टिट्यूशनल रँकिंग (एस.आय.आर.)साठी स्कोपसद्वारे
गोळा करण्यात आलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला आहे. ज्या संशोधन संस्थांमधून २२
महत्त्वाच्या विषयांचे ५००हून अधिक शोधनिबंध, रिव्ह्यू अथवा कॉन्फरन्स पेपर
प्रकाशित झाले आहेत, अशा संस्थांचा विचार या क्रमवारीसाठी करण्यात आला. या २२
विषयांमध्ये अभियांत्रिकी, पदार्थविज्ञान व खगोल, संगणकशास्त्र, मटेरिअल सायन्स,
रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, रासायनिक अभियांत्रिकी, ऊर्जा, फार्माकोलॉजी, टॉक्सिकॉलॉजी
ॲन्ड फार्मास्युटिक्स, कृषी व जैवविज्ञान, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स ॲन्ड
मॉलेक्युलर बायोलॉजी, पर्यावरणशास्त्र, भूशास्त्र, इम्युनॉलॉजी व
सूक्ष्मजीवशास्त्र, कला व मानव्यविद्या, आरोग्यविज्ञान, न्युरोसायन्स, नर्सिंग,
मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश होता.
उपरोक्त निकषांवर भारतातील
७० आघाडीच्या संशोधन संस्थांची क्रमवारी निर्धारित करण्यात आली. कौन्सिल ऑफ सायंटिफिक
ॲन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ही संस्था या यादीत अग्रस्थानी आहे. त्यात शिवाजी
विद्यापीठाने २८७५.५ गुणांकनासह (एफ स्कोअर) १९ वे स्थान प्राप्त केले. केवळ अकृषी
विद्यापीठांचा विचार केल्यास शिवाजी विद्यापीठाचा देशात सहावा क्रमांक लागतो.
जाधवपूर विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि
अण्णा विद्यापीठ ही पहिली पाच अकृषी विद्यापीठे आहेत. या यादीत शिवाजी
विद्यापीठाखेरीज महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठाचा ४६व्या स्थानी (एफ स्कोअर
५२३.४५) समावेश आहे.
मटेरिअल सायन्स
संशोधनात देशातील अकृषी विद्यापीठांत अग्रस्थानी
या संशोधनाधारित क्रमवारीत मटेरिअल
सायन्सच्या संशोधनात शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २५ संशोधन संस्थांच्या
यादीत चौथे, तर अकृषी विद्यापीठांत देशात पहिले स्थान मिळविले आहे. कौन्सिल ऑफ
सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंडियन
असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या तीन संस्थांनी या क्रमवारीत अनुक्रमे पहिले
तीन क्रमांक मिळविले आहेत. या यादीत स्थान मिळविणारे शिवाजी विद्यापीठ हे
राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. विद्यापीठाने या विषयातील ५६८ शोधनिबंध प्रकाशित
केले आणि विद्यापीठाचा बेस्ट पेपर रेट २२.५ इतका सर्वोच्च आहे.
संशोधनाचा दर्जा
पुनश्च अधोरेखित: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठाने
संशोधनाच्या क्षेत्रातील आपला दर्जा व गुणवत्ता कायम राखली असल्याची बाब 'करन्ट सायन्स'ने जाहीर केलेल्या
क्रमवारीमधून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अकृषी विद्यापीठांत देशात सहावे आणि
राज्यात पहिले स्थान मिळवून शिवाजी विद्यापीठाने संशोधनाची संख्या व गुणवत्ता या
दोन्ही बाबतीत संतुलन सांभाळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मटेरिअल
सायन्सच्या संशोधनामध्ये अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान पटकावून या क्षेत्रातील आपले
प्रभुत्व सिद्ध केले आहे. याबद्दल विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि संशोधक
विद्यार्थी हे सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
Very Happy to learn the Growing graph of MY UNIVERSITY
ReplyDeleteGreat achievement Dr.Devanand.congratulations
ReplyDeleteGreat achievement Dr.Devanand.congratulations
ReplyDelete