Wednesday 31 August 2016

शिवाजी विद्यापीठात मतदार जागृती रॅली



सुदृढ लोकशाहीसाठी मतदार नोंदणी करा
- डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: युवा विद्यार्थ्यांनी भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनी विद्यापीठाच्या नवमतदार नोंदणी कक्षाद्वारे तातडीने त्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी काल येथे केले
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाद्वारे काल विद्यापीठ परिसरातून मतदार जागृती फेरी काढण्यात आली. त्यावेळी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून नवमतदार जनजागृतीच्या कामी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश विद्यापीठे आणि महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र अधिविभागातर्फे आज नवमतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुदृढ लोकशाहीसाठी मतदार नोंदणी करण्याचे तसेच मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. भगवान माने, अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ. वासंती रासम यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी रॅलीचे स्वागत केले. याठिकाणी पुन्हा एकदा मतदार नोंदणीबाबत आवाहन करणाऱ्या घोषणा देण्यात येऊन रॅली विसर्जित करण्यात आली.

No comments:

Post a Comment