Tuesday 2 August 2016

'ग्यान' उपक्रमांतर्गत इतिहास अधिविभागातर्फे

प्रा. स्टुअर्ट गॉर्डन यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन



'१८व्या शतकातील दख्खन' या विषयावर करणार नऊ दिवस मार्गदर्शन



कोल्हापूर, दि. २ ऑगस्ट: केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या 'ग्यान' (GIAN) उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात '१८व्या शतकातील दख्खन' या विषयावर मराठ्यांच्या इतिहासाचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक, संशोधक प्रा. स्टुअर्ट गॉर्डन मार्गदर्शन करणार आहेत. गुरूवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी तीन वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेस प्रारंभ होणार आहे. दि. ४ ते १२ ऑगस्ट या कालावधीत ही कार्यशाळा विद्यापीठाच्या व्हर्च्युअल क्लासरुममध्ये होईल.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. स्टुअर्ट गॉर्डन अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात कार्यरत आहेत. ‘दक्षिण आशियाचा इतिहास’ हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय असला तरी मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या खास आवडीचा आणि व्यासंगाचा विषय आहे. केंब्रिज विद्यापीठाने प्रकाशित केलेला त्यांचा ‘द मराठाज् (१६००–१८१८)’ हा ग्रंथ जागतिक मान्यता प्राप्त आहे. याशिवाय त्यांचा “व्हेन एशिया वॉज  द वर्ल्ड' हा ग्रंथ देखील मध्ययुगीन कालखंडातील प्रवास वर्णनांचा चिकित्सक आढावा घेतो, आणि त्याची कोरियन, चिनी, इटालियन, अरेबिक इ. भाषांतरे झालेली आहे. त्यांचा ‘मराठा, मेरोडर्स ॲन्ड स्टेट-फॉर्मेशन इन एटीन्थ सेंच्युरी इंडिया' हा ऑक्सफर्डने प्रकाशित केलेला ग्रंथही विख्यात आहे.
मराठ्यांच्या आणि दख्खनच्या इतिहासातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा प्रा.गॉर्डन यांनी अतिशय सखोल आणि सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. याशिवाय भारतातील संस्थानी राजवटी, लष्कराचा इतिहास, विविध जाती-जमातींच्या इतिहास, स्त्रियांचा इतिहास इ. अनेक विषयांवर त्यांनी अत्यंत मौलिक संशोधन केले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या 'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात होणारी ही तिसरी व्याख्यानमाला आहे. यापूर्वी अमेरिकेतील डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांनी 'जीआयएस प्रणाली आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन' या विषयावर तर थायलंडच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी मॅकेट्रॉनिक्स या विषयावर कार्यशाळा घेतल्या होत्या. इतिहास अधिविभागातर्फे होणाऱ्या या कार्यशाळेसही विद्यार्थी, संशोधकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

No comments:

Post a Comment