कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे सर्वंकष योगदान आहेच;
त्याचप्रमाणे नवमहाराष्ट्र निर्मितीच्या प्रेरणाही त्यांच्या
साहित्याने, लोकलढ्याने महाराष्ट्राला प्रदान केल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ
साहित्यिक व संपादक उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने अण्णाभाऊंच्या ९६व्या जयंतीनिमित्त
आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटक या नात्याने बीजभाषण करताना
ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
उत्तम कांबळे म्हणाले,
चक्रधर स्वामींनी ज्ञानेश्वरांच्याही आधी महाराष्ट्राचा तोंडी भूगोल प्रथमच
सांगितला. त्या भूगोलामध्ये माणसं आणि निसर्ग यांना बसविण्याचे काम अण्णाभाऊ साठे
यांनी केले. 'महाराष्ट्राची परंपरा'
या लावणीत 'ही अवनी आदिवासींची, कोळी-भिल्लांची,
मांग-रामोश्यांची, कैक जमातींची...' असे सांगून 'परंपरा ज्यांची अपार, तीच शाहीर पुढे गाणार..' असे
स्पष्टपणे सांगितले. ही सर्व माणसं संयुक्त महाराष्ट्राचा आत्मा आहेत, याची जाणीव
अण्णाभाऊंनी करून दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ राजकीय, सांस्कृतिक उच्चभ्रू
वर्गाने सुरू केली, हे खरे असले तरी त्या चळवळीला लोकचळवळीत रुपांतरित करण्याचे
कार्य अण्णाभाऊंनी केले. रस्त्यावरच्या, तळागाळातल्या माणसाला त्याच्या इतिहासाची,
इतिहासातल्या स्फूर्तीस्थानांची, प्रेरणांची, विजयांची, युद्धांची आणि त्यातल्या
जखमांची जाणीव करून देऊन त्याला या चळवळीत सामील करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान
केले. फाटक्या-तुटक्या माणसाच्या हातात इतिहास देऊन त्याला लढ्यासाठी सज्ज
करण्याचे काम अण्णाभाऊंच्या शाहीरीनं केलं.
'माझी मैना...' या लावणीचा अभ्यासक रोमँटिक व अनरोमँटिक अशा दोन्ही अंगांनी अभ्यास करत
असले तरी या दोन्ही बाजू चुकीच्या आहेत, असं सांगून श्री. कांबळे म्हणाले, 'माझी मैना...' ही अण्णाभाऊंनी लिहीलेली
महाराष्ट्राची अव्वल दर्जाची राजकीय लावणी आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर
बेळगाव आणि सीमाभागाला उद्देशून लिहीलेली ती लावणी आहे. मैना आहे तिथेच राहिली आणि
मुंबई तेवढी महाराष्ट्रात आली. हा प्रदेश महाराष्ट्रात सामावू न शकल्याची वेदना या
लावणीतून ओसंडून वाहते. संयुक्त महाराष्ट्राचं चित्र जसं अण्णाभाऊंनी रेखाटलं,
तसंच नवमहाराष्ट्राबद्दलच्या अपेक्षाही त्यांनी 'जग बदल
घालुनि घाव...' या गीतामध्ये व्यक्त केल्या आहेत.
गुलामगिरीच्या विळख्यातून श्रमिकांना मुक्त करणारा, धनाढ्यांकडून पिळवणूक न होता,
धर्मांधांच्या कचाट्यातून सुटून समतेची प्रस्थापना करणारा, भेदभावरहित आणि एकजुटीच्या
रथावर आरुढ होऊन प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या नवमहाराष्ट्राचे स्वप्न अण्णाभाऊ
उराशी बाळगून होते.
श्री. कांबळे म्हणाले,
अण्णाभाऊंचं केवळ त्यांच्या साहित्याच्या अंगानं विश्लेषण करणं हा त्यांच्या
उर्वरित पैलूंवर मोठा अन्याय आहे. त्यांच्या लोकजीवनाचा, लोकलढ्यांचा अभ्यास
केल्याखेरीज अण्णाभाऊ खऱ्या अर्थानं समजणार नाहीत. केवळ लोकप्रियतेच्या अंगानं
त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणं चुकीचं आहे. अण्णाभाऊंच्या लढ्यातून निर्माण
झालेल्या प्रेरणा म्हणजे त्यांचे साहित्य आहे. त्या प्रेरणांचा अभ्यास केला
पाहिजे. केवळ त्यांचे साहित्य नव्हे, तर त्यांच्या सामाजिक चळवळींचा त्यातील
ताण्याबाण्यासह अभ्यास अध्यासनांच्या माध्यमातून व्हायला हवा. अण्णाभाऊंच्या
साहित्यातील भाषावैभव हे केवळ त्यांचेच आहे. त्यासारखी भाषा अन्यत्र कुठेही आढळत
नाही. या भाषावैभवाचा अभ्यासही साहित्य संशोधकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.
डी.आर. मोरे म्हणाले, अण्णाभाऊ खरे तर लौकिकार्थाने अल्पशिक्षित माणूस; पण, प्रचंड प्रज्ञेच्या बळावर त्यांनी चालविलेल्या चळवळी आणि केलेले लेखन
स्तिमित करणारे आहे. तळागाळातल्या लोकांना एकत्र येण्यासाठी प्रेरित करून
चालविलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता. या कामी अण्णाभाऊ यांच्यासह शाहीर अमर
शेख, शाहीर गव्हाणकर आदी शाहीरांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेतल्याखेरीज या
लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. किंबहुना, हा लढा उभारण्यात त्यांचे महान
योगदान होते.
कार्यक्रमात सुरवातीला
मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन
करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अध्यासनाचे संचालक डॉ. एम.एल. जाधव यांनी केले.
डॉ. शरद गायकवाड यांनी परिचय करून दिला. डॉ. सी.ए. लंगरे यांनी आभार मानले.
--००--
No comments:
Post a Comment