Wednesday, 31 August 2016

विद्यापीठात लवकरच पथदर्शी जैव ऊर्जा प्रकल्प: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे






कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात जैव-ऊर्जा व कचरा व्यवस्थापनावर आधारित आधुनिक पथदर्शी प्रकल्प लवकरच उभारण्यात येईल. त्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिले.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) आणि चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशीप (सीआयपीएल, मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठात आज 'जैविक ऊर्जा व कचरा व्यवस्थापन'विषयक विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या सादरीकरणास जिल्हाधिकारी अमित सैनी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. ज्योती जाधव, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारावर पर्यावरण सुसंगत व प्रदूषणविरहित प्रकल्पांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उद्योगांना अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञान यांच्यासंदर्भात अवगत करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. उद्योगांना उपयुक्त ठरेल, असे इनोव्हेशन ॲन्ड इनक्युबेशन तंत्रज्ञान सेंटर विद्यापीठात असावे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या व्यापक लाभासाठी नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे प्रकल्प राबविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्याचा विद्यापीठ परिक्षेत्रातील स्थानिक उद्योगांना लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सीआयपीएलचे संचालक रणजीत शेट्टी यांनी 'ग्रीन वेस्ट टू सॉलिड फ्युएल टू पॉवर' या विषयावर सादरीकरण केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात सीआयपीएल संस्थात्मक सामाजिक दायित्वाच्या (सी.एस.आर.) अंतर्गत पथदर्शी प्रकल्प उभा करून देईल. विद्यापीठातील कचरा, जैविक कचरा यामध्ये वापरण्यात येईल. या प्रकल्पात विद्यापीठाची नॉलेज पार्टनर म्हणून महत्त्वाची भूमिका राहील.
ते म्हणाले, सीआयपीएलच्या माध्यमातून सुप्रशासनाशी संबंधित मार्गदर्शन करण्याबरोबरच कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती करण्याचे ध्येय बाळगून अनेक प्रकारचे संशोधन करण्यात येत आहे. विशेषतः खेड्यांमध्ये चुलीच्या धुरामुळे महिलांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी प्रदूषणविरहित आणि किफायती तंत्रज्ञान निर्माण करण्यात येत आहे. यासाठी त्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता, आर्थिकदृष्ट्या किफायती, पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्हता या चार गोष्टी पायाभूत महत्त्वाच्या ठरणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे 'झिरो वेस्ट' तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे.
सुरवातीला डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment