Thursday 4 August 2016

अमृत देशमुख यांचे कुलगुरूंकडून अभिनंदन



पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे व विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव.


कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: येथील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी विशेष पारितोषिक देऊन गौरव केल्याबद्दल आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे त्यांचे अभिनंदन केले.
श्री. देशमुख यांनी राजारामपुरी ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ठेवलेला वचक, विविध गुन्ह्यांचा लावलेला छडा तसेच अवैध धंदे व गुंडगिरीवरील अंकुश या बाबतीत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांचा विशेष पारितोषिक देऊन नुकताच गौरव केला. शिवाजी विद्यापीठ हे सुद्धा राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. श्री. देशमुख आणि ठाण्यातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विद्यापीठास नेहमीच सहकार्य लाभत असते. त्यामुळे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी श्री. देशमुख यांचा विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि अभिनंदनाचे पत्र देऊन विद्यापीठ कार्यालयात अगत्यपूर्वक सत्कार केला.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मी स्वतः पोलीसाचा मुलगा असल्यामुळे या सत्काराला भावनिक पदर आहे, हा भाग वेगळा! तथापि, पोलीसांच्या आयुष्यात असे कौतुकाचे क्षण कमीच वाट्याला येत असतात. श्री. देशमुख यांनी बजावलेली कामगिरी आणि वरिष्ठांनी स्वतःहून त्यांचे केलेले कौतुक या दोन्ही गोष्टी अभिमान वाटाव्या अशाच आहेत. यापुढील काळातही श्री. देशमुख यांच्या हातून अधिकाधिक चांगली समाजसेवा घडत राहो आणि असे अनेक कौतुकाचे क्षण त्यांच्या वाट्याला यावेत, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
विद्यापीठाने आपुलकीने केलेल्या या सत्कारामुळे आपण भारावून गेलो आहोत, अशी भावना  श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment