Tuesday, 23 August 2016

सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात ७५०० हून अधिक जणांचा उत्स्फूर्त सहभाग





कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात आज आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात ७५००हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आणि आपल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती दिली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे विद्यापीठात आज सकाळी ११ वाजता 'आझादी ७०- याद करो कुर्बानी' या उपक्रमांतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाने केलेल्या आवाहनाला विद्यार्थी-विद्यार्थिनींसह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवकांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे साडेसात हजारांहून अधिक लोक या प्रसंगी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात उपस्थित राहिले. 
विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. एन.व्ही. चिटणीस, निखील भगत, अंजली निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल पोतदार, स्नेहल पाटील, आरुषा पाटील या विद्यार्थिनींनी 'हम होंगे कामयाब..' आणि 'ऐ मेरे वतन के लोगों...' ही गीते सादर केली. मधुसुदन शिखरे (हार्मोनियम) व दीपक दाभाडे (तबला) यांनी संगीतसाथ केली. या गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन केले.
यावेळी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेसाठी आलेले रशियाचे प्रा. डी. सोकोलो यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

3 comments: