विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी
'इन्फोसिस'मधील प्रशिक्षणाचा वापर करावा
- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत केवळ देशातच नव्हे, तर जगातील अग्रगण्य अशा इन्फोसिस या कंपनीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षकांना प्रशिक्षणाची संधी मिळणे ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब आहे. या संधीचे संबंधित शिक्षकांनी सोने करावे आणि आपण मिळविलेल्या ज्ञानाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल सायंकाळी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि
इन्फोसिस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते ३० ऑगस्ट या कालावधीत म्हैसूर
येथे 'ट्रेनर्स ट्रेनिंग' कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी विद्यापीठातील तसेच
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील कौशल्य व उद्योजकता केंद्राचे ५० समन्वयक
शिक्षक काल रात्री रवाना झाले. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह अन्य
अधिकाऱ्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना
कुलगुरू बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, इन्फोसिससारख्या माहिती
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसमवेत शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य
कराराअंतर्गत विद्यापीठातील निवडक शिक्षकांना थेट कंपनीच्या कार्यस्थळावर
प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार प्रथम संधी मिळालेल्या या ५०
जणांच्या चमूने त्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. इन्फोसिसमध्ये शिवाजी विद्यापीठाचा
लौकिक वृद्धिंगत करण्याबरोबरच तेथे प्राप्त केलेल्या ज्ञानाचा विद्यापीठाच्या
कार्यक्षेत्रातील अन्य शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी योग्य उपयोजन करावे, असे
आवाहनही त्यांनी केले.
म्हैसूर येथे आयोजित या नऊ
दिवसीय ट्रेनर्स ट्रेनिंगमध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांत माहिती
तंत्रज्ञानविषयक (आयसीटी) कौशल्य विकास करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार
आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेल्यांमध्ये ३९ शिक्षक कला,
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधील असून दहा जण व्यावसायिक महाविद्यालयांमधील
आहेत. प्रशिक्षणार्थींमध्ये सहा महिलांचाही सहभाग आहे. सहभागी प्रशिक्षणार्थी
शिक्षक परतल्यानंतर संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये
प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास
केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी
संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी
अजित चौगुले, इंटरनेट सेलचे प्रमुख डॉ. मिलींद जोशी, महाराष्ट्र शासनाच्या रोजगार
व स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक संचालक सचिव जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment