कोल्हापूर, दि. ११ ऑगस्ट: ज्ञानाची आणि विज्ञानाची कास धरून प्रकाशाच्या दिशेचे यात्री व्हा, यश
सावलीसारखे तुमच्या पाठीशी राहील. याउलट यशाच्या मागे धावू लागाल, तर ते
हुलकावण्याच देत राहील, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांनी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठात नव्याने प्रविष्ट
झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष स्वागत कार्यक्रमात संबोधित करताना ते
बोलत होते.
सुमारे दीड तास कुलगुरू डॉ.
शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या व्यक्तीगत आयुष्यातले अनुभव,
उदाहरणे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. ते म्हणाले, आयुष्यामध्ये यश
आणि समाधान या अत्यंत सापेक्ष गोष्टी आहेत. त्यांचे मोजमाप किती आणि कशावरुन करावयाचे,
हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. त्यामुळे चांगल्या गोष्टी करीत जाणे, चांगले मित्र
मिळवित जाणे आणि नातेसंबंध प्रस्थापित करीत राहणे हा सुद्धा यशाचा महत्त्वाचा भाग
आहे. आपण यशस्वी होत असताना त्यामागे किती जणांचे हात आणि सदिच्छा आहेत, यावर त्या
यशाचे महत्त्व अवलंबून असते. त्यामुळे चांगले काम करीत गेले की आपोआपच चांगली
माणसे आयुष्यात जोडली जातात. जेव्हा मनुष्य जन्मतो, तेव्हा श्वास घेतो पण,
त्याच्याकडे नाव नसते; आणि मरतो तेव्हा मात्र श्वास
संपतो, पण नाव मागे कसे राखायचे, हे जिवंतपणीच्या आपल्या वर्तनावर अवलंबून असते. आयुष्यात
लौकिकार्थाने कितीही मोठे यश मिळवा, पण एक चांगला, सच्चा माणूस म्हणून आपली ओळख
निर्माण करा. तुमच्याबरोबर शिवाजी विद्यापीठाचे नावही उज्ज्वल करा, असे आवाहन
त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. शिंदे पुढे
म्हणाले, शिक्षण म्हणजे नेमके काय, शिक्षणाचा हेतू काय, या प्रश्नांच्या उत्तरांचा
वेध स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत तपशीलवार घेतला आहे. त्यांच्याच एका वाक्यात
सांगायचे झाल्यास, "The idea of all education, all training, should be the man-making." मानव निर्मितीचे ध्येय साऱ्या शिक्षणाच्या मुळाशी असले पाहिजे. मानव
निर्मिती या शब्दातून अखिल विश्वामध्ये मानवतावादाची प्रस्थापना, मानवी मूल्यांची
जोपासना करणाऱ्या समाजाची निर्मिती स्वामी विवेकानंदांना शिक्षणातून अभिप्रेत आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून समता,
स्वातंत्र्य, बंधुता व सहिष्णुता याच मानवी मूल्यांची देणगी भारतीय समाजाला प्रदान
केली आहे. त्यांची जाणीव असणाऱ्या व्यक्तींचा सजग समूह निर्माण करणे, हे शिक्षणाचे
खरे उपयोजन आहे. असे शिक्षण घेण्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावेत.
त्याचप्रमाणे संशोधन व विकास, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या
चतुःसूत्रीच्या बळावर उत्तम शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी व्हावे, असा मूलमंत्रही
त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. भाषणाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी
विद्यापीठाच्या सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे
म्हणाले, अनेक संकटांचा सामना करुन स्वराज्य निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे
नाव लाभलेल्या विद्यापीठात आपण शिक्षण घेतो आहोत, याचा अभिमान विद्यार्थ्यांनी
बाळगला पाहिजे. त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेत संघर्षांशी दोन हात करीत यशाची
पताका फडकविण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. त्याचवेळी आपली कर्तव्ये व जबाबदारी यांचेही भान बाळगले पाहिजे. परिपूर्ण विद्यार्थी
व आदर्श नागरिक बनण्यासाठी शिस्तीचे पालन करावे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक मंत्र लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे - आपल्याला जे अवघड वाटते, ते सोपे करावे, जे सोपे वाटते, ते सहज करावे, जे सहज करता येते, ते सुंदर करावे, जे सुंदर करता येते, ते जतन करावे आणि जे जतन करता येते, ते योग्य ठिकाणी, योग्य वेळी वापरावे. आणि
या विद्यापीठाचे आदर्श विद्यार्थी म्हणून भावी आयुष्यात वावरावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ.
डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी श्री. अजित चौगुले, प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ.
पी.एस. पांडव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, एन.एस.एस. प्रमुख डॉ.
डी.के. गायकवाड, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, कौशल्य व उद्योजकता विकास कक्षाचे
समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, प्लेसमेंट कक्षाचे समन्वयक डॉ. पी.एन. भोसले, क्रीडा
अधिविभाग प्रमुख पी.टी. गायकवाड, विद्यार्थी वसतिगृहाचे मुख्य रेक्टर डॉ. जी.बी.
कोळेकर, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या मुख्य रेक्टर डॉ. (श्रीमती) पी.एस. पवार, डॉ.
पी.व्ही. अनभुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती व्ही.ए. रानडे, डॉ. भगवान माने आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम
वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment