Monday, 22 July 2024

विद्यापीठातील संशोधकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करावे: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. धनंजय सुतार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व गिरीश कुलकर्णी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित स्कोपस व निम्बसविषयी जागरुकता कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.




कोल्हापूर, दि. २२ जुलै: शिवाजी विद्यापीठाचा लौकिक हा जागतिक स्तरावर प्रकाशित होणाऱ्या संशोधनाच्या दर्जामुळे सातत्याने उंचावत आहे. त्यामुळे संशोधकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये आपले संशोधन प्रकाशित व्हावे, यासाठी दर्जेदार संशोधन करावे, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकदिवसीय स्कोपस व निंबस यांविषयी जागरुकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, संशोधनासाठी विविध प्रकारची संदर्भसाधने हाताशी असणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने ग्रंथालये मौलिक भूमिका बजावतात. माहिती तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी संशोधकाला ग्रंथालयांत जाऊन दुर्मिळ आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचे संदर्भग्रंथ, शोधपत्रिका पाहाव्या लागत. त्यांच्या आधारे आवश्यक संदर्भ हाताने उतरून घ्यावे लागत. तथापि, आता आधुनिक काळात सर्व प्रकारचे ई-रिसोर्सेस उपलब्ध आहेत. ग्रंथालये ऑनलाईन झाली आहेत. सर्व संदर्भसाधने ऑनलाईन उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवरील कोणतीही माहिती, पुस्तक, संदर्भ क्षणात मिळविता येते. यामुळे संशोधनाचा दर्जा उंचावणे शक्य झाले आहे. हे दर्जानिश्चितीचे काम स्कोपस आणि निम्बससारखे निर्देशांक करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांतून संशोधक आपले संशोधन प्रकाशित करतात, तेव्हा स्कोपसमध्ये त्यांची नोंद होण्याची शक्यता वाढते. गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे सुमारे ९०० शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकांतून प्रकाशित झाले. त्यांनी सुमारे दीड लाख सायटेशन्स मिळाले. विद्यापीठाच्या एच-इंडेक्स १३५च्या घरात आहे, जो महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ही कामगिरी उंचावत ठेवण्यासाठी संशोधकांनी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठासह देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांचा संशोधकीय वेध घेतला असता भौतिकशास्त्र, मटेरियल सायन्स, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र अशा निवडक विषयांतील संशोधनाची संख्या अत्यधिक असल्याचे जाणवते. त्याचवेळी मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान शाखांकडील विषयांतील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी आहे. मराठीसारख्या विषयांचा अपवाद गृहित धरला तरीही या विद्याशाखांमधील संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या दृष्टीने संशोधकांनी आणि विद्यापीठांनीही प्रयत्न करण्याची गरज आहे. संशोधनासाठी, विशेषतः संदर्भसाधनांच्या उपलब्धतेसाठी शिवाजी विद्यापीठाने भरीव तरतूद केली आहे, त्या साधनांचा संशोधक, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रुपाली भोसले व एस.डी. हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी आभार मानले.

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात मुंबईच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम टेक्नॉलॉजी (जिस्ट) या कंपनीचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी निम्बसच्या उपयोजनाविषयी, तर नवी दिल्लीच्या एल्सव्हियरच्या कस्टमर कन्सल्टंट ऐश्वर्या नायल यांनी स्कोपसच्या उपयोजनाविषयी उपस्थित संशोधक, विद्यार्थ्यांना अवगत केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात, डॉ. वाय.जी. जाधव यांच्यासह ग्रंथालयातील सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment