Tuesday, 23 July 2024

डॉ. बाळकृष्ण यांच्याकडून कोल्हापूरचे शैक्षणिक-सांस्कृतिक जीवन समृद्ध: डॉ. अरूण भोसले

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. अरूण भोसले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. अरूण भोसले. मंचावर (डॉवीकडून) ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व डॉ. अवनीश पाटील.


कोल्हापूर, दि. २३ जुलै: प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी कोल्हापूरचे शैक्षणिक-सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्याची अजरामर कामगिरी बजावली आहे, असे गौरवोद्गार इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. अरूण भोसले यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचार्य बाळकृष्ण व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ. भोसले बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी डॉ. बाळकृष्ण यांच्या जीवनकार्याचा आपल्या व्याख्यानात साक्षेपी वेध घेतला. ते म्हणाले, स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या व्यासंगी विद्वत्तेचा लौकिक प्रस्थापित करणारे डॉ. बाळकृष्ण हे महान संशोधक होते. राजर्षी शाहू महाराजांच्या निमंत्रणाचा मान राखून पंजाबमधून कोल्हापूर येथे राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारणारे बाळकृष्ण स्वतःला मराठा म्हणवून घेत, इतकी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा होती. बहुआयामी व्यक्तीमत्त्वाच्या डॉ. बाळकृष्ण यांनी कोल्हापूरला महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याबरोबरच येथे आर्य समाजाच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक प्रबोधन चळवळीचेही केंद्र बनविले. त्याचप्रमाणे १९३२ ते १९४० या अवघ्या आठ वर्षांच्या कालावधीत चार खंडांमध्ये शिवाजी द ग्रेट हे महान चरित्र साकारले, ही त्यांची फार मोलाची देणगी महाराष्ट्राला आहे. शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्यनिर्मिती हे प्रखर राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असल्याचे ते मानत. बाळकृष्ण यांनी कोल्हापूरमध्ये इतिहास संशोधकांची वैभवशाली परंपरा निर्माण केली. यामध्ये विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अ.रा. कुलकर्णी यांचा समावेश आहे.

डॉ. बाळकृष्ण यांनी राजाराम महाविद्यालयाला मुंबई इलाख्यातील नामवंत महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त करून देण्याची मोलाची कामगिरी केल्याचे सांगून डॉ. भोसले म्हणाले, ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले आणि १५ मे रोजी बाळकृष्ण यांनी राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा भार स्वीकारला. त्यावेळी येथे केवळ इंटरपर्यंत शिक्षण होते आणि विद्यार्थीसंख्या अवघी १७० होती. पुढे प्राचार्यांनी इतिहासासह विविध विषयांच्या ऑनर्सपर्यंतच्या शिक्षणाची सोय केली. विज्ञान शाखेसह एम.ए., एम.एस्सी. सुरू केले. १९३१ साली महाविद्यालयाने सुवर्णमहोत्सव साजरा केला, त्यावेळी विद्यार्थीसंख्येच्या बाबतीत महाविद्यालय मुंबई इलाख्यात सहाव्या, तर गुणवत्तेच्या बाबतीत पहिल्या तीनमध्ये होते. कोल्हापूरमध्ये विधी आणि शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये सुरू करण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला. १९३५ साली त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचे डोळस स्वप्न पाहिले. विद्यापीठाचे भौगोलिक स्थान कोठे असावे इथपासून ते विद्यापीठाच्या परिसरात कोणकोणत्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध असावे, या साऱ्याचा आराखडा त्यांनी निर्धारित केलेला होता. त्यानुसारच शिवाजी विद्यापीठ अस्तित्वात आले, मात्र ते पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. मात्र, यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई या त्यांच्या दोन शिष्योत्तमांनी ते साकार केले, याची नोंद घ्यायला हवी.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा आपण सध्या करतो आहोत. पण सुमारे शतकभरापूर्वी शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन आधुनिक प्रवाह आणणारे विद्वान म्हणजे डॉ. बाळकृष्ण होते. बाळकृष्ण यांच्या जीवनचरित्राविषयी अधिक सखोल संशोधन करण्याची गरज आहे. डॉ. भोसले यांच्या व्याख्यानाची पुस्तिका करण्याबरोबरच डॉ. बाळकृष्ण यांचा चरित्रग्रंथही निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिवचरित्राचा महाप्रकल्प डॉ. बाळकृष्ण यांनी अथक परिश्रमांनी साकारल्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जसिंगराव पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. ते म्हणाले, सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचे भव्य स्वप्न पाहणाऱ्या डॉ. बाळकृष्ण यांनी लिहीलेल्या शिवाजी द ग्रेटया महाग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, शिवचरित्राने आणि त्यांच्या कार्याने भारावलेल्या डॉ. बाळ कृष्ण यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात या महाग्रंथाचा संकल्प सोडला. १९३२ ते १९४० या कालावधीत त्यांनी या चार खंडांत विभागलेल्या सुमारे १६३५ पृष्ठसंख्येच्या महाग्रंथाचे लेखन पूर्ण केले. कित्येकदा अंगात प्रचंड ताप असतानाही त्यांनी हे लेखन पूर्ण करण्याचा ध्यास सोडला नाही. शिवछत्रपतींविषयी वाटणारा भक्तीभाव व त्यातून निर्माण झालेली त्यांची मिशनरी वृत्ती या गुणांच्या जोरावर त्यांनी दम्यासारख्या रोगाशी झुंज देत आपले जिवितकर्तव्य पूर्ण केले. डॉ. बाळकृष्णांच्या शिवचरित्राचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते मुख्यतः डच, पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच आदी युरोपियन भाषांमधील संदर्भ व कागदपत्रांवर आधारित आहे. विशेषतः हेग व बटव्हिया येथून डच साधने मिळवून शिवचरित्रात मोलाची भर घालणारे ते पहिले इतिहासकार आहेत. शिवाजी विद्यापीठाची स्थापना आणि शिवचरित्र ही बाळकृष्णांनी पाहिलेली दोन स्वप्ने होती. त्यातील शिवचरित्राचे स्वप्न त्यांच्या हयातीत, तर विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्या मृत्योपरांत साकार झाले.

कार्यक्रमात सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. आर.बी. पाटील, डॉ. एम.ए. लोहार, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. दत्ता मचाले यांच्यासह विविध महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

No comments:

Post a Comment