Friday, 12 July 2024

बहुविद्याशाखीय संशोधनाचा अंगिकार आवश्यक : डॉ. नानासाहेब थोरात

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना जागतिक ख्यातीचे संशोधक डॉ. नानासाहेब थोरात

कोल्हापूर, ता. १२ जुलै: विविध विद्याशाखांमधील संशोधकांनी सद्यस्थितीत बहुविद्याशाखीय संशोधनाचा अंगिकार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, मेरी क्युरी फेलो आणि आयर्लंड येथील लिमरिक विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नानासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागात बहुविद्याशाखीय संशोधन कारकीर्दीच्या दिशाया विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभागप्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे होते.

डॉ. नानासाहेब थोरात यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाने बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. कर्करोगाच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संशोधनाविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहायला हवे. विज्ञान विषयांइतकेच तत्त्वज्ञान आणि सामाजिक शास्त्रांतील ज्ञान व संशोधनही महत्त्वाचे आहे. एका विषयामध्ये तज्ज्ञ होणे गरजेचे आहेच; पण, अन्य विषयांमधील प्रवाह समजावून घेण्यास आणि बहुविध अवांतर वाचनासही प्राधान्य द्यावे. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास बाळगून विविध विद्याशाखांमध्ये संयुक्त संशोधन सहकार्य वृद्धिंगत होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आतापासूनच बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाचे धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. सोनकवडे यांनी अध्यक्षीय भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधन क्षेत्रात जागतिक भरारी शकतो, याचे डॉ. थोरात उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आता बहुविद्याशाखीय शिक्षण व संशोधनाला मोठे महत्त्व दिले आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ करण्यापेक्षा धाडसी निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. जागतिक स्तरावर उपलब्ध संशोधन संधी मिळविण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे यायला हवे.

यावेळी डॉ. थोरात यांनी विद्यार्थ्यांचे शंकासमाधान केले. कार्यक्रमास डॉ. केशव राजपुरे, डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. एच.एम. यादव, डॉ. एस.पी. दास, डॉ. ए.आर. पाटील यांच्यासह अधिविभागातील विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. व्ही. एस. कुंभार प्रास्ताविक व परिचय करून दिला. साधना परीट व साक्षी काळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एस. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment