Wednesday, 28 December 2016

स्थानिक राजकारणात महिलांची भूमिका निर्णायक

विद्यापीठातील महिला सरपंच कार्यशाळेत सूर




कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: स्थानिक राजकारणात महिला आता निर्णायक भूमिका बजावत असून स्थानिक राजकारणाचा अजेंडा त्यांनी बदलून टाकला आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागात आयोजित महिला सरपंच व विद्यार्थी यांच्या कार्यशाळेप्रसंगी झालेल्या संवादात व्यक्त झाला. प्रा.डॉ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा झाली.
अधिविभागातर्फे 'महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेचा पुनर्विचार' या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २७) रंगलेल्या या संवाद कार्यक्रमात महिला सरपंचांनी त्यांच्या र्तृत्वाच्या आत्मकथा मांडल्या. यामधून महिला निर्णयकर्त्या आहेत, आणि त्यांनी स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकला असून ही त्यांच्या सत्तासंघर्षाची चित्तवेधक कथा आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. महिला नेतृत्वाच्या जडणघडणीच्या अभ्यासाच्या दृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरली.
कार्यशाळेमध्ये करवीर तालुक्यातील १५ महिला सरपंचांनी सहभाग घेतला. कार्यशाळे विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. भगवान माने प्रा. डॉ. रविंद्र भणगे यांनी चर्चा केली. संशोधक विद्यार्थी सचिन मरळे अजित डवरी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यशाळेसाठी विभागातील संशोधक विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.

Tuesday, 27 December 2016

शेतीजीवनाची दुरवस्था माझ्या लेखनाच्या केंद्रस्थानी: भास्कर चंदनशीव




कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: शेती जीवनाच्या दुरवस्थेचे चित्रण हा माझ्या कथेचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथालेखक भास्कर चंदनशीव यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात साहित्य अकादमीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कथासंधी या कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर सभागृहात झालेल्या कथासंधी उपक्रमांतर्गत श्री. चंदनशीव यांनी श्रोत्यांशी मुक्त संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी आपल्या लाल चिखल या कथेची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखविली. ते म्हणाले, वास्तव आणि कल्पित यांच्या सरमिसळीतून माझी कथा साकार झाली आहे. ग्रामीण शेती जीवनाच्या दुरवस्थेने मला, माझ्यातील कथालेखकाला अस्वस्थ केले. त्या अस्वस्थतेचा हुंकार माझ्या लेखनात स्वाभाविकपणे प्रकटला. महात्मा फुले, महर्षी वि.रा. शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव आहेच, पण त्याच बरोबर शेतीसंस्कृतीची परखड चिकित्साही माझ्या कथालेखनात आहे.
यावेळी श्री. चंदनशीव यांनी त्यांचा एकूण लेखन प्रवास, तीमधील टप्पे व लेखन प्रेरणा याविषयी श्रोत्यांशी संवाद साधला. साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी परिचय करून दिला. लाल चिखल कथेचे वाचन डॉ. राजन गवस यांनी केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. मेघा पानसरे, डॉ. सी.ए. लंगरे, आप्पासाहेब खोत, किरण गुरव आदी उपस्थित होते.

Monday, 26 December 2016

‘जलयुक्त विद्यापीठ’ मोहिमेची ‘युनिव्हर्सिटी न्यूज’कडून दखल





कोल्हापूर, दि. २६ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या पावसाळ्यात कॅम्पसवर राबविलेल्याजलयुक्त विद्यापीठ या जलसंधारण मोहिमेची असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजकडून (ए.आय.यू.) दखल घेण्यात आली आहे. ए.आय.यू.च्या युनिव्हर्सिटी न्यूज या साप्ताहिकाच्या ताज्या अंकात या विषयी लेख प्रकाशित झाला आहे.
युनिव्हर्सिटी न्यूजचा नोव्हेंबर २८-डिसेंबर ४, २०१६ (खंड ५४, क्र. ४८) या कालावधीतील अंकात वॉटर कॉन्झर्व्हेशन इन कॅम्पस: ॲन इनिशिएटिव्ह ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी या शीर्षकाचा लेख प्रकाशित झाला आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी विद्यापीठात जलव्यवस्थापनाची केलेली कामे सर्वच विद्यापीठांसाठी आदर्शवत आहेत, असे यात म्हटले आहे.
शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी कॅम्पसमध्ये जलसंधारणाची अनेक कामे केली. यामध्ये दोन विहीरींच्या पुनरुज्जीवनासह तीन शेततळ्यांच्या कामाचा मुख्यत्वे समावेश होता. या कामी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध महाविद्यालयांचे शारिरीक शिक्षण संचालक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे पहिल्या पावसातच विद्यापीठ कॅम्पसवर ३० कोटी लीटर पाणी साठविण्यात यश आले. शिवाजी विद्यापीठाची ही जलयुक्त कॅम्पस मोहिमेची यशोगाथा जिल्हा प्रशासनासह सर्वच पातळ्यांवर वाखाणली गेली. माध्यमांनीही या कामाची प्रशंसा केली.
विद्यापीठाच्या या कामाची आता थेट ए.आय.यू.ने दखल घेतल्यामुळे अधिक उत्तम काम करण्यास बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.