Friday, 13 January 2017

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत

विद्यापीठाचे मोलाचे योगदान: आयुक्त पी. शिवशंकर






विद्यापीठात नूतन आर.ओ. जलशुद्धीकरण व बॉटलिंग प्रकल्पाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. १३ जानेवारी: विविध शासकीय योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत शिवाजी विद्यापीठ परिवाराचे सकारात्मक योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाने उभारलेल्या नूतन रिव्हर्स ऑस्मॉसिस (आर.ओ.) पद्धतीच्या जलशुद्धीकरण व बॉटलिंग प्रकल्पाचे उद्घाटन आज सकाळी श्री. शिवशंकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
P. Shivsankar (IAS)
श्री. शिवशंकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे शासनाला सदैव सहकार्य लाभले आहे. जलयुक्त विद्यापीठ मोहिमेची अंमलबजावणी असो, वृक्षारोपण मोहीम असो की स्वच्छ भारत, मतदार जागृती वा बेटी बचाओ अभियान असो, प्रत्येक उपक्रमात विद्यापीठ हिरीरीने अग्रभागी राहिले आहे. आता सुद्धा आर.ओ. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून विद्यापीठ स्वच्छ पाण्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण झाले आहे. स्वच्छ पाणी हा सर्वांचा हक्क आहे, असे आपण म्हणत असलो तरी, विद्यापीठाने त्या दिशेने टाकलेले पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संशोधनाबरोबरच त्याच्या उपयोजनातही विद्यापीठ अग्रेसर असल्याची प्रचिती या प्रकल्पाच्या माध्यमातून आल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाने निर्धारित मुदतीपेक्षा कमी कालावधीत या प्रकल्पाची उभारणी करून तो कार्यान्वित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, आर.ओ. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे; ते म्हणजे पाण्यावर सर्वांचा समान हक्क आहे आणि सर्वांना एकसारखेच शुद्ध पाणी मिळायला हवे, अशी भूमिका त्यामागे आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंपासून ते कर्मचाऱ्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांना अशा सर्वांनाच समान आणि चांगल्या दर्जाचे पाणी मिळावे, यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. यापुढे विद्यापीठातील अधिविभाग, प्रशासकीय विभाग, अतिथीगृह, कॅन्टीन, वसतिगृहे इतकेच नव्हे, तर अगदी कॅम्पसवर राहणाऱ्या परिवारांना सुद्धा या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरविण्यात येणार आहे.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, सुमारे ५००० लीटर प्रतितास इतकी उच्च शुद्धीकरण क्षमता असलेला हा प्रकल्प विद्यापीठाने स्वनिधीतून १७.५० लाख रुपयांत उभारला आहे. या जलशुद्धीकरण यंत्रणेबरोबरच सेमी-ऑटोमॅटिक प्रकारातील बॉटलिंग प्लँटही उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाद्वारे विद्यापीठातील प्रत्येक घटकाला शुद्ध पाण्याची हमी मिळणार आहे.
यावेळी या प्रकल्पाचे ऑपरेटर वैभव कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपकुलसचिव डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आभार मानले. प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्रभारी परीक्षा नियंत्रक जी.आर. पळसे यांच्यासह बिल्डींग वर्क्स कमिटीचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक, प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 12 January 2017

शिक्षणातूनच सामाजिक परिवर्तनाचे चक्र गतिमान: डॉ. पी. कन्नान



विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

 
शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. पी. कन्नान. सोबत अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी.एस. कांबळे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. बसवराज बन्नी आदी.


कोल्हापूर, दि.१२ जानेवारी: शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे चक्र गतिमान करणे शक्य असते आणि त्यातूनच जागतिक परिवर्तन घडवून आणता येते, असे प्रतिपादन विजापूर (कर्नाटक) येथील राज्य महिला विद्यापीठाचे इंग्रजी अधिविभागप्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक प्रा.डॉ. पी. कन्नान यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'आधुनिक भारताच्या विकासात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची प्रस्तुतता' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास आजपासून सुरवात झाली. या चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. कन्नान बोलत होते. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक तथा प्रभारी कुलगुरु डॉ. डी.आर. मोरे होते.
डॉ. पी. कन्नान
डॉ. कन्नान म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनाचे विविध प्रवाह समजून घेण्याकरिता आयुष्यातील बहुतेक वेळ विद्याभ्यासात घालविला. आणि त्यातूनच परिवर्तनासाठी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे सबलीकरण करणे ही महत्त्वाची गरज असल्याचे त्यांचे मत बनले होते. बाबासाहेबांनी आपल्या लिखाणातून भारताच्या खऱ्या सामाजिक इतिहासावर प्रकाशझोत टाला आहे. बिनतोड युक्तीवादांसह त्यांनी केलेल्या सैद्धांतिक मांडणीला आजही पर्याय नाही. पूर्वीच्या काळी सर्वांना शिक्षण घेणे शक्य नव्हते अशा विषमतेच्या परिस्थितीत त्यांनी केलेले सामाजिक, आर्थिक न्यायावरील कार्य फार महान आहे. ठरा-ठरा तास अभ्यास करणारे सर्जनशील वाचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. अर्थशास्त्राच्या प्रत्येक शाखेत त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. 
अध्यक्षीय भाषणा डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, ज्ञानाची ताकद काय असते, हे जगाला बाबासाहेबांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला. त्यामुळे समाजा खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिक्षण हे एकमेव स्रो आहे, हे लक्षात घेऊन राज्य केंद्र सरकार सातत्याने पुढाकार घे प्रयत्न करीत आहेत.
यावेळी अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.पी.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक केले.  डॉ.व्ही.पी.कट्टी यांनी त्रसंचालन केले. समन्वयक एस.टी. कोंबडे यांनी आभार मानले. यावेळी बल्लारी विद्यापीठाचे बसवराज एस. बन्नी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ. पाटील, डी.एम. भंडारी, डॉ. प्रविण के. जाधव, डॉ.आर.जी. दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. चर्चासत्रास विविध राज्यांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.