Tuesday, 14 March 2017

यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तीमत्त्वात सभ्यता, सुसंस्कृतता, अभिजातता यांचा संगम : विजय कुवळेकर



ग्रंथांनी रचलेला महापुरूष: यशवंतराव चव्हाण ग्रंथाचे विद्यापीठात प्रकाशन
 
'ग्रंथांनी रचलेला महापुरूष: यशवंतराव चव्हाण' या ग्रंथाचे प्रकाशन करताना पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विजय कुवळेकर यांच्यासह अण्णासाहेब चव्हाण, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. आनंद पाटील आणि डॉ. जे.एफ. पाटील.

Vijay Kuwalekar


कोल्हापूर, दि. १४ मार्च: सभ्यता, सुसंस्कृतता आणि अभिजातता यांचा तिहेरी संगम यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तीमत्त्वात आढळतो. त्याचे प्रतिबिंब ग्रंथांनी रचलेला महापुरूष या ग्रंथात पानोपानी आढळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि येथील आनंद ग्रंथसागर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथांनी रचलेला महापुरूष: यशवंतराव चव्हाण या डॉ. आनंद पाटील यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
Vijay Kuwalekar
यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राने राज्यापुरते संकुचित करून ठेवले, हे दुर्दैव असून त्या विचारसरणीतून बाहेर काढणारा हा एक वेगळा वाङ्मयीन चरित्रग्रंथ असल्याचे सांगून श्री. कुवळेकर म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरील असामान्य नेत्याचे विचारचरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून साकारले आहे. आजकाल वाचणारे नेते कमी होताहेत, साऱ्यांनाच यशाचे शॉर्टकट हवे आहेत, सभ्यता, सुसंक्तपणाची पातळी खालावते आहे. या पार्श्वभूमीवर स्वखर्चाने आठ हजारांहून अधिक ग्रंथ खरेदी करून त्यांचे वाचन करणारा आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा आपल्या राष्ट्रासाठी वापर करणारा यशवंतरावांसारखा दुर्मिळ नेता आपल्याला लाभला. यशवंतरावांनी त्यांच्या हयातीत अनेक मोठमोठी पदे भूषविली, त्यातून ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाले नाहीत; तथापि, वाचनामुळं ते वैचारिक आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या मात्र अत्यंत समृद्ध झाले.
ग्रंथातून वाचलेले तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे यशवंतराव, असा उल्लेख करून श्री. कुवळेकर म्हणाले, कुणब्याचा पोर ते देशाचा उपपंतप्रधान अशी मजल मारणाऱ्या यशवंतरावांची मुळे मातीत घट्ट रोवलेली होती. वाचनाने आकाशाला गवसणी घालण्याचे बळ त्यांच्या पंखांत निर्माण केले. त्यांच्या व्यक्तीमत्त्वात आढळणाऱ्या मानवतावादी विचारसरणीची बीजे वाचनानेच निर्माण केली. सातत्यपूर्ण वाचनामुळेच यशवंतरावांच्या प्रतिपादनात कधीही पुनरावृत्ती आढळत नाही. महान होऊनही विनम्र असण्याचे आणि संयत पद्धतीने व्यक्त होण्याचे मूळही त्यातच आढळते. वाचनानेच यशवंतरावांसारखा निष्कलंक चारित्र्याचा पारदर्शक आणि निखळ माणूस घडला, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, अप्रतिम वक्तृत्व आणि अफाट वाचन असणाऱ्या यशवंतरावांची कामगिरी अतुलनीय आहे. त्यांच्यापूर्वी आणि नंतरही असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व आणि नेतृत्व महाराष्ट्रात निर्माण झाले नाही, होणार नाही.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीचे यशवंतराव चव्हाण शिल्पकार होते. नितीमूल्यांबद्दल अत्यंत आग्रही असणाऱ्या या नेत्याने तितक्याच सचोटीने विविध क्षेत्रांत कार्य केले आणि त्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला. ग्रंथवाचनाने माणूस मोठा नव्हे, तर शहाणा निश्चित होतो, असे मानणाऱ्यापैकी ते होते. सर्वच क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचनाचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करायला हवी.
यावेळी डॉ. जे.एफ. पाटील यांनी ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त केले. लेखक डॉ. आनंद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर, अध्यासनाचे संचालक डॉ. ए.एम. गुरव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. बी.पी. साबळे यांच्यासह अनेक शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 8 March 2017

माजी कुलगुरू प्रा. धनागरे, ज्येष्ठ विचारवंत प्रा. किरवले यांना विद्यापीठात आदरांजली


Prof. Dr. D.N. Dhanagare
Dr. Krishna Kirwale


कोल्हापूर, दि. ८ मार्च: शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचा विद्वान समाजशास्त्रज्ञ हरपला, अशा शोकभावना आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनामुळे मराठी दलित साहित्याचा एक साक्षेपी संशोधक व निष्ठावान आंबेडकरी विचारवंत हरपला, अशा शब्दांत आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. धनागरे आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनाबद्दल विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. धनागरे यांच्या रुपाने शिवाजी विद्यापीठास आंतरराष्ट्रीय ख्यातीचा थोर समाजशास्त्रज्ञ कुलगुरू म्हणून लाभला. समाजशास्त्राबरोबरच लोकप्रशासन आणि शेतकरी चळवळ या विषयांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. कुलगुरू म्हणून विद्यापीठाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
डॉ. किरवले यांच्यात आणि आपल्यात अनेक साम्यस्थळे असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आम्ही दोघेही मराठवाड्याचे, दोघेही औरंगाबाद विद्यापीठात शिकलो आणि डॉ. गंगाधर पानतावणे आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे आम्हाला जोडणारे दुवा होते. डॉ. किरवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती विद्यापीठ स्तरावर साजरी करण्याचा कार्यक्रम ठरवून तो यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.
यावेळी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. दीक्षित म्हणाले, भाषा भवन तलाव, जैवतंत्रज्ञान विभाग या बाबींचे खरे शिल्पकार डॉ. धनागरे होते. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विद्यार्थी वसतिगृह मेस सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तुकाराम पालखीचे विद्यापीठ कार्यक्षेत्रात स्वागत करण्याचा परिपाठही त्यांनीच सुरू केल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
डॉ. डी.टी. शिर्के यांनीही धनागरे सरांनी एखाद्या फोल्डरवर सुस्पष्ट शेरे कसे असावेत, याचा वस्तुपाठ घालून दिल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. किरवले यांनी नेहमी विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. श्रीमती. यु.ए. अरविंदेकर, शंकरराव कुलकर्णी, डॉ. निशा मुडे-पवार, वसंतराव मगदूम, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. एस.आर. यादव आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 1 March 2017

खासदार संभाजीराजे यांनी जागविल्या क्रिकेटच्या आठवणी

शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय विद्यापीठ कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन



मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन



मान्यवरांना संचालनाद्वारे मानवंदना देताना सागर पवार यांच्या नेतृत्वाखालील यजमान शिवाजी विद्यापीठाचा क्रिकेट संघ.



खासदार संभाजीराजे यांना शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर बॅटिंग करण्याचा मोह आवरला नाही.




कोल्हापूर, दि. १ मार्च: क्रिकेट हे माझं पॅशन आहे. शिवाजी विद्यापीठाच्या याच मैदानावर मी क्रिकेट खेळलो. कित्येक सामन्यांचा आनंद घेतला. सागर पवारसारखा क्रिकेटपटू मित्र याच मैदानावर लाभला, अशा आठवणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज जागविल्या. निमित्त होते शिवाजी विद्यापीठात आयोजित अखिल महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे! खासदार संभाजीराजे यांनी यावेळी मैदानात उतरून आपल्या बॅटिंगची चुणूकही उपस्थितांना दाखविली.
शिवाजी विद्यापीठाच्या मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज सकाळी या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
केवळ क्रिकेटवरील प्रेमापोटी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मोह आपण टाळू शकलो नसल्याचे सांगून खासदार संभाजीराजे म्हणाले, राजाराम महाविद्यालयात शिकत असताना विद्यापीठाचे क्रिकेट मैदान हे आमच्या आवडीचे ठिकाण होते. कधी खेळायला, तरी कधी सामने पाहायला या मैदानात आम्ही नेहमी येत असू. आज स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येथे येण्याचा आनंद वेगळा आहे. कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना चालना देण्याच्या दृष्टीने अशा स्पर्धांचे आयोजन विद्यापीठ पातळीवर होणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. अशा स्पर्धा नियमितपणे आयोजित व्हाव्यात, या दृष्टीने सरकारच्या स्तरावर काही धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असेल, तर त्यासाठी आपण विद्यापीठास सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, लहानपणी मनमोकळेपणाने खेळांचा आनंद घेणारे आपण नोकरी-व्यवसायात आलो की, खेळ आणि खिलाडूवृत्ती या दोन्ही गोष्टी विसरून जातो. तसे होता कामा नये. खिलाडूवृत्तीची जोपासना प्रत्येकाने आयुष्यभर करणे गरजेचे आहे. यशापयशाच्या पलिकडे स्पर्धेचा विचार करावा. शिवाजी विद्यापीठातील ही स्पर्धा स्नेहबंधाचा उत्सव बनावा, अशी अपेक्षा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजवंदनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यानंतर क्रिकेट स्पर्धेत सहभागी विद्यापीठांच्या संघांनी संचालनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. सागर पवार यांनी संघांना शिस्त व अनुशासनाची शपथ दिली. यावेळी शिवाजी विद्यापीठातील निवृत्त ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला. नांदेडच्या संघाने कोल्हापूर संघातील क्रिकेटपटू अजय आयरेकर यांचा त्यांच्या आतिथ्यशीलतेबद्दल सत्कार केला. क्रीडा अधिविभागातील शशिकांत दाभाडे यांनी खास स्पर्धेसाठी सजविलेल्या दुचाकीचे अनावरणही खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, पी.ए. तथा बाबा सावंत, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांच्यासह अधिकारी, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजे मैदानात!
मुख्य कार्यक्रमानंतर खासदार संभाजीराजे यांनी मैदानात उतरून आपल्या क्रिकेटवरील प्रभुत्वाचे दर्शन घडविले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्या गोलंदाजीचा त्यांनी लीलया सामना केला. राजेंची बॅटिंग पाहून कुलगुरू डॉ. शिंदे यांनीही बॅट हाती घेऊन काही चेंडू टोलविले. यावेळी सागर पवार या विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या आपल्या मित्राच्या अंगी राष्ट्रीय क्रिकेट संघात जाण्याइतकी क्षमता होती, असे जाहीर कौतुकोद्गार खासदार संभाजीराजे यांनी काढले.

Monday, 27 February 2017

बाबासाहेबांमुळेच सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाला धार: डॉ. तापती बसू यांचे प्रतिपादन



शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ


Dr. Tapati Basu

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: देशात राजकीय स्वातंत्र्याची चळवळ जोमात असताना सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाला धार प्राप्त करून देण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भारतीय समाजावर त्यांचे हे थोर उपकार आहेत, असे प्रतिपादन कोलकता विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रा.डॉ. तापती बसू यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागातर्फे आजपासून आयसीएसएसआर पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वृत्तपत्रीय दृष्टीकोन आणि त्याचे वर्तमानकालीन प्रयोजन या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. बसू बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर काशी बनारस विश्वविद्यालयाचे माजी वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. राम मोहन पाठक, शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. वीरबाला अग्रवाल, आग्रा येथील डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. गिरीजा शंकर, पुणे विद्यापीठाचे माजी वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉ. किरण ठाकूर, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे माजी वृत्तपत्रविद्या विभाग प्रमुख डॉ. विजय धारूरकर, म्हैसूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ.बी.पी. महेशचंद्र गुरू, औरंगाबाद विद्यापीठाचे डॉ. सुरेश पुरी, खुल्ताबाद येथील चिस्तीया महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. गणी पटेल उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये सांगताना डॉ. बसू म्हणाल्या, बाबासाहेबांच्या प्रत्येक वृत्तपत्राच्या नावातच त्यांच्या मनाशी असलेले हेतू सामोरे येतात आणि त्याचबरोबर देशाच्या सामाजिक न्यायाची होत जाणारी किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी प्रगतीही दृष्टोत्पत्तीस येते. पहिला मूकनायक हा दलित, शोषित, पिडित जनतेचा अर्थात ज्या समाजाला स्वतःचा आवाज नव्हता, अशा समाजाला स्वतःचा आवाज मिळवून देणारा हा मूकनायक होता. बहिष्कृत भारतहा भारतामधील एक षष्टमांश बहिष्कृत जनतेच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा होता. त्यानंतर जनतामधून भारतीय जनतेमध्ये एकता व एकात्मतेची जाणीव पेरण्याचा प्रयत्न होता, तर अखेरच्या प्रबुद्ध भारतमधून त्यांचे प्रज्ञाशील भारताचे स्वप्न अधोरेखित होते. डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता ही अशा प्रकारे देशाच्या सामाजिक न्याय प्रस्थापनेमधील सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा आहे.
त्या म्हणाल्या, भारतातील पत्रकारितेचा इतिहास म्हणजे काँग्रेसने चालविलेल्या वृत्तपत्रांचा इतिहास आहे. या काँग्रेसवादी वृत्तपत्रांचा विरोध पत्करून बाबासाहेबांनी सामाजिक स्वातंत्र्याचा संघर्ष अथकपणे चालविला. टिळक हयात असताना केसरी वृत्तपत्राने बाबासाहेबांनी पैसे देण्याची तयारी दाखवूनही मूकनायकची जाहिरात छापण्यास नकार दिला. दलित वृत्तपत्राच्या जाहिरातीला सुद्धा अस्पृश्यतेची वागणूक देण्याच्या काळात बाबासाहेबांनी ज्या प्रखर ध्येयनिष्ठेने आपली पत्रकारिता चालविली, तिला देशाच्या इतिहासात तोड नाही. बंगाली पत्रकारिता बाबासाहेबांच्या पत्रकारितेची सदैव प्रशंसक राहिली असल्याचेही त्यांनी या प्रसंगी नमूद केले.
मराठी पत्रकारिता ही हिंदी पत्रकारितेसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगून यावेळी डॉ. राम मोहन पाठक म्हणाले, बंगाली व मराठी पत्रकारितेचे हिंदी पत्रकारितेमध्ये सामाजिक प्रेरणा निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. यामध्ये बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे योगदान मोलाचे आहे. बाबासाहेब भाषिक पत्रकारितेचे महत्त्व जाणून होते. समाजातल्या अशिक्षित, दलित, शोषित जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक मराठी पत्रकारिता केली. त्यांच्या या पत्रकारितेनेच देशातील दलित पत्रकारितेला कृती कार्यक्रम देण्याचे काम केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. राम मोहन पाठक, डॉ. वीरबाला अग्रवाल, डॉ. किरण ठाकूर आणि डॉ. विजय धारूरकर यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ.ओंकार काकडे, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, डॉ. वासंती रासम, डॉ. ज.रा. दाभोळे आदी उपस्थित होते.