Saturday, 17 June 2017

ज्ञानसंस्कार वृद्धीसाठी शिष्यवृत्ती प्रोत्साहनाचे माध्यम: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने डीकेटीई इचलकरंजी येथे झालेल्या शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात शिष्यवृत्ती प्राप्त महाविद्यालयातील प्राचार्यांच्या सत्कार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद बी. शिंदे, डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, शिवाजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांच्यासमवेत उपस्थित महाविद्यालयांचे प्राचार्य.

शिवाजी विद्यापीठाचा गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ डीकेटीईमध्ये उत्साहात

कोल्हापूर, दि. १७ जून: ज्ञानसंस्कार वृद्धीसाठी शिष्यवृत्ती हे प्रोत्साहनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य व प्रेरित करणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा उद्देश आहे तसेच येत्या काळात महाविद्यालयातील संशोधनात्मक कार्य पाहून 'रिसर्च परफॉर्मिग कॉलेज' म्हणून महाविद्यालयांचा गौरव करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज केले. इचलकरंजी येथील डीकेटीई महाविद्यालयात झालेल्या शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठ आणि डीकेटीईचे टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने डीकेटीईच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ (शैक्षणिक वर्ष २०१६-१७) गटनिहाय गुणवत्ताप्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या सत्कार समारंभ आज सकाळी संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गेली १९ वर्षे शिवाजी विद्यापीठाने विद्यापीठातील जे विद्यार्थी अभ्यासक्रमामध्ये पहिल्या, दुसऱ्या व अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत येतात त्यांच्यासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरू केली आहे. अधिकाधिक गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार व्हावेत, हा हेतू यामागे आहे. या योजनेअंतर्गत शहरी, निमशहरी व ग्रामीण गटातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता शिष्यवृत्ती संपादन केलेली आहे, अशा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यामागे गुणवत्ता वर्धित करण्याचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमात कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, शिक्षण शास्त्र व विधी विद्याशाखांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला. डीकेटीईचे संचालक प्रा. डॉ. पी.व्ही. कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कल्लाप्पाणा आवाडे यांनी डीकेटीईची स्थापना व वस्त्रोद्योगाच्या प्रगतीचा इतिहास सांगितला.
संस्थेचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन प्रा. डॉ. यु. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर शैक्षणिक प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांनी स्विकारला.
कार्यक्रमामध्ये डीकेटीईचे प्रशाकीय उपसंचालक डॉ. यु.जे. पाटील, शैक्षणिक उपसंचालक डॉ. सौ. एल.एस. आडमुठे, शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, घाळी कॉलेजचे प्राचार्य एम. आर. पाटील, तासगाव कॉलेजचे प्राचार्य आर. आर. कुंभार, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होणगेकर, एएससी कॉलेज, पलूसचे प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. गुणगौरव समारंभ डीकेटीईच्या एतिहासिक दरबार हॉलमध्ये संपन्न झालेबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. डॉ. यु. जे. पाटील यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांच्यासह विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते. प्रा. एस. जी. कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले.


Saturday, 10 June 2017

आपत्ती व्यवस्थापनविषयक जागृतीसाठी स्वयंसेवकांनी प्रशिक्षणाचा वापर करावा: मंत्री चंद्रकांतदादा पाटील




Minister Chandrakandada Patil speaking at 'Avhan-2017' Concluding ceremony

NSS Team from Satara district

NSS Team from Pune District

'आव्हान-२०१७' राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचा समारोप
Minister Shri. Chandrakantdada patil
कोल्हापूर, दि. १० जून: ‘आव्हान प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षित झालेल्या युवकांनी आपापल्या जिल्ह्यांतील गावागावांतून, शाळा-महाविद्यालयांतून आपत्ती व्यवस्थापनविषयक जागृतीसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या आव्हान-२०१७ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर सौ. हसिना फरास, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) निरीक्षक एस.डी. इंगळे उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले, दुर्घटना होऊ नये, यासाठी दक्षता बाळगणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहेच, पण त्याच्या इतकेच आपत्तीच्या क्षणी आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असणे हेही महत्त्वाचे आहे. आव्हान हा मा. कुलपती कार्यालयाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या चॅन्सलर्स ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आता आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या परिसरातील अन्य युवकांना करून द्यायला हवा, जेणे करून त्यांनाही आपत्तीच्या प्रसंगी कशा प्रकारे निर्णय घ्यावेत किंवा आपद्ग्रस्तांना सुरक्षितपणे कशी मदत करता येईल, याची माहिती होईल. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी आपल्या कारकीर्दीतील गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना आणि त्यानंतरच्या कालखंडातील बचाव व मदत कार्य, माळीण दुर्घटनेनंतर झालेले गावाच्या पुनर्वसनाचे कार्य तसेच ठाणे येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतून पाच शालेय विद्यार्थ्यांना २४ तासांनंतरही वाचविण्यात आलेले यश असे प्रसंग सांगून आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व शिबिरार्थींना सांगितले. देशाच्या आपत्ती व्यवस्थापनात अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या एन.डी.आर.एफ.च्या जवानांचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
Shri. Avinash Subhedar
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती दिली. ते म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनात तत्काळ मदत (Rescue), त्यानंतर निवारा व अन्य मदत (Relief) आणि त्यानंतर पुनर्वसन (Rehabilitation) हे तीन घटक महत्त्वाचे असतात. यापैकी पहिल्या तत्काळ मदतीच्या प्रसंगी आव्हानसारख्या शिबिरांतून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत १२९ गावांत पूरस्थिती येण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील स्थानिक २५ ते ५० वयोगटातील नागरिकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. त्यापैकी ५० गावांतील नागरिकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
Vice Chancellor Dr. Devanand Shinde
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भाषणात आपत्तीप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. विद्यापीठ एनएसएसच्या माध्यमातून एक व्यक्ती, एक पेंडी, एक मूठ धान्य असे उपक्रम राबवून गतवर्षी दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व जनावरे यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे शेततळी, छोटे बंधारे यांच्या बांधकामात श्रमदानातून योगदान देत असल्याचेही सांगितले.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या माध्यमविद्या या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. काल शहरातून काढण्यात आलेल्या जागृती फेरीदरम्यान सोलापूर विद्यापीठाची स्वयंसेवक विद्या कदम हिने आपत्ती निधी गोळा केला. कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र वडजे यांनी तो जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आव्हान-२०१७मधील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी मा. राज्यपाल तथा कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. डॉ. डी.के. गायकवाड यांनी आव्हान-२०१७चे अहवाल वाचन केले. डॉ. तृप्ती करेकट्टी आणि नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
राष्ट्राला मदतीसाठी तत्पर असावे
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती हे काही अपरिहार्य कारणामुळे आजच्या समारोप समारंभाला उपस्थित राहू शकले नाही. तथापि, त्यांनी शिबिरार्थींना विशेष शुभसंदेश पाठवून प्रोत्साहित केले. या शिबिराचे यजमानपद यशस्वीरित्या भूषविल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे सुरवातीलाच अभिनंदन केले आहे, तसेच, चॅन्सलर्स ब्रिगेडच्या भेटीसाठी उपस्थित राहू न शकल्याची खंतही व्यक्त केली आहे. त्यात आव्हान आणि एकूणच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्राला जेव्हाही कधी त्यांच्या सेवेची गरज भासेल, तेव्हा ती बजावण्यासाठी तत्पर असावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
पुणे व सातारा जिल्हा सर्वोत्कृष्ट
आव्हान-२०१७मध्ये प्रशिक्षणात पुणे व सातारा जिल्ह्याचे संघ अनुक्रमे सर्वोत्कृष्ट ठरले. त्यांना बेस्ट कॉन्टिन्जेन्ट फिरता चषक प्रदान करण्यात आला. बेस्ट कॉन्टिन्जेन्ट लीडरसाठीचा फिरता चषक नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रा. अतुल अकोठोर आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. सारिका पेरणे यांना देण्यात आला. बेस्ट एनएसएस व्हॉलंटिअरसाठीचा फिरता चषक चौघांना देण्यात आला. यामध्ये महेश गणेश बन (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), कुणाल मानकर (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), हर्षा सुनिल भट्ट (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) आणि सामिका सावंत (बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली) यांचा समावेश आहे. जनजागृती फेरीमधील सर्वोत्कृष्ट सहभागासाठीचा फिरता चषक मुंबई विद्यापीठाने पटकावला.

Friday, 9 June 2017

राज्यभरातील स्वयंसेवकांकडून रॅलीद्वारे

आपत्ती व्यवस्थापनविषयक जनजागृती









कोल्हापूर, दि. ९ जून:  शिवाजी विद्यापीठात गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या आव्हान-२०१७ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या समारोप समारंभाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थींनी कोल्हापूर शहरातून मोठ्या जल्लोषात रॅली काढून नागरिकांत आपत्ती व्यवस्थापनापासून ते लेक वाचवा अभियानापर्यंत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली. पावसाचा शिडकावा सुरू असतानाही स्वयंसेवकांचा उत्साह कमी झाला नाही, हे विशेष!
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ. वासंती रासम, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एस.डी. इंगळे यांच्यासह एनडीआरएफचे जवान, एनएसएसचे जिल्हा संपर्क अधिकारी, विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी, सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आव्हान-२०१७मध्ये राज्यभरातील चौदा विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे १२०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. दि. १ जूनपासून गेल्या नऊ दिवसांत भूमी, जल आदी ठिकाणी उद्भवणाऱ्या विविध आपत्ती आणि त्यांचे व्यवस्थापन, मदतकार्य, पुनर्वसन आदींविषयी एनडीआरएफच्या जवानांच्या सहकार्याने अत्यंत उत्तम प्रशिक्षण या स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. या कालावधीतील संपूर्ण प्रशिक्षणावर आधारित लेखी, प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षाही आज सकाळी घेण्यात आली. त्यानंतर आज सायंकाळी आपत्ती व्यवस्थासह विविध सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जगजागृतीपर रॅली शहरातून काढण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून प्रारंभ झाल्यानंतर मालती अपार्टमेंट, आईचा पुतळा व सायबरमार्गे ही रॅली पुन्हा विद्यापीठात प्रविष्ट होऊन तिची सांगता करण्यात आली.
ढोलताशांच्या गजरात आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सुरू झालेल्या रॅलीच्या अग्रस्थानी एनडीआरएफचे आपत्ती व्यवस्थापन सामग्रीने सुसज्ज वाहन होते. त्याबरोबर एनडीआरएफचे जवानही रॅलीच्या अग्रणी होते. या रॅलीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, जिजाऊ, तानाजी मालुसरे, संत गाडगेबाबा आदी विविध वेशभूषा केल्या होत्या. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण व संवर्धन, स्त्री-भ्रूण हत्याविरोधी बेटी बचाओ अभियान, वृक्षसंवर्धन, महिला सन्मान, ग्लोबल वॉर्मिंग, मतदार जागृती, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, लष्करी जवानांचा सन्मान अशा अनेक विषयांबाबत प्रबोधन करणारे फलक घेऊन स्वयंसेवक रॅलीत सहभागी झाले होते. आपापल्या विद्यापीठ परिक्षेत्रातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाविष्कारही काही संघांनी सादर केले. या रॅलीमुळे आव्हान-२०१७मधील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष अगदी टीपेला पोहोचल्याचे दिसून आले.

राज्यपालांच्या उपस्थितीत उद्या सांगता
या दहा दिवसीय शिबिराचा समारोप समारंभ उद्या (दि. १० जून) सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती श्री. चे. विद्यासागर राव, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर हसिना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या लोककला केंद्रात होणार आहे. यावेळी कुलपतींच्या हस्ते उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट संघ आदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतीचे भूमीपूजन आणि विद्यापीठाच्या परिसरात साकारलेल्या चॅन्सलर्स कोकोनट गार्डनचे डिजीटल उद्घाटन कुलपतींच्या हस्ते होणार आहे.