Monday, 16 October 2017

स्त्रियांची प्रतिष्ठा जपण्यास यशवंतरावांचे सर्वोच्च प्राधान्य: प्रतापराव भोसले



 कोल्हापूर, १६ ऑक्टोबर: ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सार्वजनिक जीवनात वावरत असताना स्त्रियांची प्रतिष्ठा जपण्यास नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले, असे प्रतिपादन माजी खासदार प्रतापराव भोसले यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, यशवंतराव चव्हाण अध्यासन व गांधी अभ्साय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ''यशवंतराव चव्हाण: व्यक्ती, कार्य आणि विचार'' या विषयावर एक दिवसीय चर्चा व मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. १३) आयोजित करण्यात आला. त्यावेळी बीजभाषक व उद्घाटक या नात्याने श्री. भोसले बोलत होते.
श्री. भोसले यांचे यशवंतराव चव्हाण यांच्याशी अत्यंत सौहार्दाचे संबंध होते. त्यांनी आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी जागविताना त्यांच्या नैतिक राजकारणाचा पटच उभा केला. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाणांचे स्त्रियांची प्रतिष्ठा जपण्यास सर्वोच्च प्राधान्य होते. अगदी वेणूताईंशीही त्यांचे नाते साथीदाराचे होते. राजकीय स्पर्धेत, प्रचारात त्यांनी प्रतिस्पर्धी स्त्री उमेदवारांवर कधीही टीका केली नाही. प्रत्येक मतदारास चव्हाण स्वत: पत्र लिहित. त्यामुळे यशवंतरावांचे लोकांशी प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. संस्कृती व नितिमूल्यांच्या भक्कम पायावर चव्हाण साहेबांचे राजकारण उभे होते. त्याच बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या समाजकारणाचा व राजकारणाचा पाया रचला. त्याच भरभक्कम पायावर आजही महाराष्ट्राचे भरणपोषण होत आहे.
या उपक्रमांतर्गत दिवसभरात यशवंतराव चव्हाण यांच्या पैलूंवर चर्चा व मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये गौतमीपुत्र कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे सर्वसमावेश धोरणयाबद्दल, तर अशोक चौसाळकर यांनी राष्ट्रीय राजकारणातील यशवंतराव चव्हाण यांचे योगदान याबद्दल मुलाखत दिली. दुपारच्या सत्रात किशोर बेडकिहाळ यांनी ''समाजवादाचे चिंतन'' याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी यशवंतरावांचे भाषा, साहित्य, संस्कृती व शिक्षण यामधील योगदान प्रकट केले. डॉ. वसंत भोसले यांनी यशवंतरावांचे सामाजिक व कृषी या क्षेत्रांतील योगदान विस्तृत मुलाखतीद्वारे प्रकट केले.
उमेश गडेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. मेघा पानसरे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. दत्तात्रय घोलप, चेतन गळगे यांनी या मुलाखती घेतल्या. डॉ. भारती पाटील यांनी समारोपाचे भाषण केले.
शिवाजी विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश पवार व गांधी अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कार्यक्रमासाठी विविध अधिविभागातील विदयार्थी, प्राध्यापक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 13 October 2017

राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ प्रथम


मुंबई येथे कव्वाली सादरीकरण करीत असताना शिवाजी विद्यापीठाचा संघ.


शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. सुजीत जाधव, सुरेश मोरे आणि प्रथम क्रमांक विजेता शिवाजी विद्यापीठाचा कव्वाली संघ.


कोल्हापूर, दि. १३ ऑक्टोबर: मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने अत्यंत दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
भारतीय विद्यापीठ महासंघाच्या वतीने मुंबई विद्यापीठात १० ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश महाराष्ट्र या राज्यांतील एकूण दहा विद्यापीठांचे संघ सहभागी झाले. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला. आकर्षक चषक, प्रशस्तिपत्रक रोख पंचवीस हजार रुपये असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ संघाने सादर केलेल्या कव्वालीचे संगीत दिग्दर्शन सिद्धे जाधव (मुंबई) श्रीमती संपदा माने-कदम (मुंबई) यांनी केले. विजय जाधव वींद्र जाधव यांनी संगीत साथीदार म्हणून काम केले.


प्रिती मनवाडकर, प्रथम लाड, ऋषिकेश देशमाने, काजल नरूटे, केदार गुरव, संज्योती जगदाळे, निलंजय वड्डलवार, आदिती धनवाडे, जीवन पाटील, काजल धुर्वे या दहा जणांचा संघात समावेश होता. या संघाचा सराव व्यवस्था यासाठी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील यांनी परिश्रम घेतले. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.सुजित जाधव, सुरेश मोरे यांनी काम पाहिले. या यशाबद्दल कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.