Thursday, 26 September 2019

‘असेल तिथे, दिसेल त्याला’ कौशल्य प्रदानाचा उपक्रम अभिनव: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

'असेल तिथे, दिसेल त्याला' कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांच्यासमवेत कौशल्य प्रदाते आणि उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी.


शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित 'असेल तिथे, दिसेल त्याला' कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींना कौशल्य प्रदान करताना प्रशिक्षक.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित 'असेल तिथे, दिसेल त्याला' कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींना कौशल्य प्रदान करताना प्रशिक्षक.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित 'असेल तिथे, दिसेल त्याला' कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींना कौशल्य प्रदान करताना प्रशिक्षक.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित 'असेल तिथे, दिसेल त्याला' कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींना कौशल्य प्रदान करताना प्रशिक्षक.


कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: ‘असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण हा अत्यंत अभिनव स्वरुपाचा उपक्रम असून दर आठवड्याला विद्यापीठात तो सातत्याने राबविला गेल्यास अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आज विद्यापीठ परिसरात असेल तिथे, दिसेल त्याला कौशल्य प्रशिक्षण या अभिनव उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. त्याचे औपचारिक उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रातर्फे या उपक्रमामध्ये सातत्य राहण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एकदा विद्यापीठातील सर्व वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसाठी तसेच केंद्रामध्ये सुद्धा इच्छुक विद्यार्थ्यांसाठी आठवड्याला एक या प्रमाणे कौशल्य प्रदान उपक्रम राबविण्यात यावा. विद्यार्थ्यांनी सुद्धा केंद्राच्या या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर म्हणाले, विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाच्या बरोबरीने विविध कौशल्ये ज्ञात असावीत, यादृष्टीने विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत सातत्याने कौशल्यविषयक उपक्रम राबविले आहेत. त्याचे अत्यंत सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. या केंद्राकडून भावी काळातही विद्यार्थ्यांसाठी असे नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव या उपक्रमाविषयी माहिती देताना म्हणाले, विद्यापीठाच्या या परिसरात विद्यार्थी, पालक, कर्मचारी, शिक्षक अगर नागरिक असा चार किंवा अधिक जणांचा समूह असेल, त्याला जाग्यावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी इन्फोसिसच्या माध्यमातून ट्रेन द ट्रेनर्स कार्यशाळेतून प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षक ही कौशल्ये प्रदान करणार आहेत. प्राथमिक स्तरावर सॉफ्ट स्कील प्रदान करण्यात येणार आहेत. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे हे देशातील पहिले विद्यापीठ असेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रशिक्षकांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी अधिसभा सदस्य पंकज मेहता, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. के.व्ही. मारुलकर, डॉ. केबी. पाटील, डॉ. गजानन राशिनकर, एम.व्ही. चव्हाण, शिवप्रसाद शेटे, विजयकुमार मुत्नाळे, विजय तिवारी, शिवप्रसाद बेकनाळकर, श्री. लिटॉन आदींसह १५ प्रशिक्षक उपस्थित होते.
या प्रशिक्षणानंतर लगेचच मुख्य प्रशासकीय इमारतीपासूनच प्रशिक्षण उपक्रमास सुरवात झाली. प्रशिक्षकांनी सामोऱ्या आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंट संदर्भात मार्गदर्शन दिले.


Wednesday, 25 September 2019

यशस्वी होण्यासाठी प्रेरणेचा स्रोत स्वतःमध्येच शोधा: डॉ. अभिनव देशमुख

शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित विशेष व्याख्यनात मार्गदर्शन करताना कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख.


शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित विशेष व्याख्यनात मार्गदर्शन करताना कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख.


शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्रात विशेष व्याख्यान



कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: स्वतःच्या प्रेरणेचा स्रोत बाहेर नव्हे, तर तुमच्या आतमध्ये शोधा, तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होण्याची गुरूकिल्ली तुमच्या हाती येईल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या सेवा-पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित सन २०१९-२०च्या उद्घाटन समारंभात स्पर्धा परीक्षा आणि रोजगार संधी व आव्हाने या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. देशमुख म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना आपण बाहेरच्या जगामध्ये प्रेरणेचे स्रोत शोधत असतो. ते स्वाभाविकही आहे. तथापि, अशा प्रेरणास्रोतांचा प्रभाव कालांतराने ओसरतो. मात्र, तुमच्या स्वयंप्रेरणेचा स्रोत नेमका कोणता आहे, हे जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात शोधले आणि तो तुम्हाला गवसला, की त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्हाला यशाचा मार्ग सापडतो. त्यावेळी कोणत्याही बाह्यप्रेरणेची अजिबातच गरज राहात नाही.

स्पर्धा परीक्षा हेच केवळ आपले जीवन नाही, त्यापलिकडेही खूप मोठे जग आहे. त्याचा विचार सातत्याने आपल्या मनात जागृत असला पाहिजे असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, स्पर्धा परीक्षा असो, अगर कोणतीही नोकरी, या बाबी केवळ साधन आहेत. अंतिमतः आपल्या समाजाप्रती, देशाप्रती आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या निभावणे, हे खरे साध्य आहे, याचे भान स्पर्धा परीक्षार्थींनी सदैव बाळगावे. लाखो परीक्षार्थींमधून अवघ्या काही शे जणांची निवड स्पर्धा परीक्षांतून होत असते. तथापि, हे आकडेवारीचे वास्तव असूनही कोणत्याही वशिलेबाजीविना आणि पारदर्शक पद्धतीने केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या बळावर उमेदवाराची निवड करणाऱ्या युपीएससीसारख्या यंत्रणेवर परीक्षार्थींचा विश्वास असतो आणि म्हणूनच तिकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे तयारी करतानाही गुणवत्ता संवर्धनावरच भर देण्याची गरज असते.
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात करीत असतानाच आपल्याला कोणत्या स्तरापर्यंत जावयाचे आहे, याचा निर्णय घेऊन त्या दिशेने तयारी करावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, स्वतःचा कल तपासून अगदी शास्त्रीय पद्धतीने स्वयंमूल्यमापन केल्यानंतरच परीक्षार्थीला कोणती परीक्षा द्यावयाची अगर कोणत्या क्षेत्राकडे जावयाचे, याचा निर्णय घेणे सोयीचे असते. अन्यथा मनामध्ये केवळ संभ्रम निर्माण होत राहतो आणि त्याची परिणती अपयशामध्ये होत असते. त्यामुळे हे क्षेत्र निर्धारणही फार महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षेचा अभ्यास ही तर अत्यंत मूलभूत पायरी आहे. या अभ्यासाचे स्टडी मटेरियलही बऱ्यापैकी ठरलेले असते. त्यामुळे या परीक्षांमध्ये अन्य उमेदवारांच्या तुलनेत आपल्याला आघाडी मिळवायची असेल तर आपण जी माहिती, घटना वाचतो, त्यांचे सखोल विश्लेषण करणे आणि वाचलेल्या संकल्पनांचे उपयोजन सांगता येणे या बाबींना अतिशय महत्त्व आहे. घटना-माहिती-ज्ञान-शहाणपण हे चार टप्पे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असतात. केवळ एखादी घटना अगर प्रसंग माहिती झाल्यानंतर त्याची कारणमीमांसा करण्याच्या दृष्टीने आपण विचार, चिंतन करणार नाही, तोपर्यंत आपल्या विवेचनामध्ये सखोलता येणार नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातही आपण ही विश्लेषणक्षमता विकसित करण्याची सवय लावून घ्यायला हवी. तरच अखेरीस ज्ञान आणि शहाणपण आपल्यामध्ये येईल.
स्पर्धा परीक्षांकडे केवळ ग्लॅमर आणि भरपूर पैसा मिळविण्याचे साधन म्हणून जर कोणी पाहात असेल तर कृपया हा तुमचा मार्ग नाही, हे लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षेनंतरचे आयुष्य हे सन्माननीय मध्यमवर्गाचे आहे आणि इथे तुम्ही समाजाप्रती बांधिलकी निभावण्यासाठी अथक आणि अखंड मेहनत करण्याच्या इराद्याने आणि तयारीनेच आले पाहिजे, असे आवाहनही डॉ. देशमुख यांनी या प्रसंगी केले. यावेळी त्यांना आपल्या एमबीबीएस डॉक्टर होण्यापासून ते युपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवासही अतिशय ओघवत्या शब्दांत उलगडला.
यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. पी.एस. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अमित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिन कदम यांनी आभार मानले.

Saturday, 21 September 2019

शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’ मानांकन

देशातील चौथे, तर राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ


शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्रदान करताना ट्यू सूद कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी. सोबत (डावीकडून) डॉ. आर.के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अजित थिटे, अनिल साळवी.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्रदान करताना ट्यू सूद कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी. सोबत (डावीकडून)  डॉ. डी.के. गायकवाड, परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. आर.के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अजित थिटे, अनिल साळवी, सुजीत पाटील, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. नमिता खोत.

शिवाजी विद्यापीठाला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याची पत्रकार परिषदेत घोषणा करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. आर.के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आदी.


कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर: जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन (आय.एस.ओ.) या संस्थेकडून येथील शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी आयएसओ- ९००१:२०१५ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. आयएसओ प्रमाणपत्रामुळे शिवाजी विद्यापीठाने चालविलेल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ट्यू सूद साऊथ एशिया प्रा.लि. कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय वृद्धी) अनिल साळवी आणि कोल्हापूर विभागाचे शाखाधिकारी सुजीत पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक प्रशासन, अभ्यासक्रमांची रचना व निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन प्रकल्प, शैक्षणिक उपयोजन व नवतंत्रज्ञानाचा वापर, मूल्यांकन व मूल्यमापन, संबंधित घटकांशी सहसंबंध, परीक्षाविषयक कार्यपद्धती व सुधारणा, निकालाची प्रक्रिया तसेच पदवी प्रदान प्रक्रिया आदी विविध बाबींची सर्वंकष पाहणी करून आयएसओविषयक पाहणी करणाऱ्या संस्थेने शिवाजी विद्यापीठाला आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेल्या विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. पण, संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातील पहिलेच ठरले आहे, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. लवकरच येऊ घातलेल्या नॅक पाहणीच्या अनुषंगाने या प्रमाणपत्राचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (आयक्यूएसी) अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दर्जावृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासूनच ही प्रक्रिया सुरू झाली, ती आजतागायत अव्याहतपणाने सुरू आहे. ही प्रक्रिया निरंतर असून ती तशीच सुरू राहण्यासाठी आयएसओसारख्या बाह्य यंत्रणेची तिच्यावर नजर असणे महत्त्वाचे आहे. आता या मानांकनामुळे एक टप्पा आपण गाठला आहे. इथून पुढे हा दर्जा उंचावत नेण्याची जबाबदारी सर्वच संबंधित घटकांवर आहे. त्या जाणीवेतून या पुढील काळात काम होत राहणे आवश्यक आहे. विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन संलग्नित महाविद्यालये सुद्धा आयएसओला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यापीठाच्या आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत म्हणाले, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही संस्था जगभरातील विविध वस्तू, सेवा आणि संस्था यांच्याशी निगडित गुणवत्तेचे, दर्जाचे मूल्यांकन करणारी आघाडीची आणि अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे. परिमाणकारकता, कार्यक्षमता आणि कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त उत्पादकता अशा विविध निकषांवर गुणवत्तेचे निर्धारण या संस्थेकडून करण्यात येते. जगात आणि देशात आयएसओ सर्टिफिकेशन करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तथापि, गुणवत्तेसाठी अत्यंत आग्रही असणाऱ्या जर्मनीच्या ट्यू सूद (TUV SUD) या कंपनीकडून तपासणी करवून घेण्यास शिवाजी विद्यापीठाने प्राधान्य दिले, हे यातले महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. सध्याचे प्रमाणपत्र हे ९ सप्टेंबर २०१९ ते ८ सप्टेंबर २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीचे आहे. मात्र, ही प्रक्रिया एवढ्यावरच थांबणारी नसून या कंपनीकडून वर्षातून दोनदा विद्यापीठाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने सुमारे ३७ तज्ज्ञ अंतर्गत तपासनीसांची (इंटर्नल ऑडिटर) फळी निर्माण केली आहे. अन्य कोणत्याही विद्यापीठात इतकी सशक्त टीम असत नाही, हे सुद्धा शिवाजी विद्यापीठाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
या पत्रकार परिषदेत स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय येवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अजित थिटे आदी उपस्थित होते.

Friday, 20 September 2019

अतिक्लिष्ट भू-पर्यावरणीय समस्येच्या विश्लेषणाची भूगोलात क्षमता: डॉ. रविंद्र जायभाय



शिवाजी विद्यापीठाच्या भूगाल अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. रविंद्र जायभाय. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. अरुण पाटील, डॉ. सचिन पन्हाळकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. संभाजी शिंदे.

कोल्हापूर, दि. २० सप्टेंबर: अत्यंत क्लिष्ट भू-पर्यावरणीय समस्येचे विश्लेषण करण्याची क्षमता ही भूगोल विषयाच्या तज्ज्ञ व संशोधकांची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. रविंद्र जायभाय यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठ भूगोल शिक्षक संघाच्या सहकार्याने आयोजित भू-पर्यावरणीय समस्या आणि शाश्वत विकास या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस आजपासून प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटक या नात्याने डॉ. जायभाय बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
Dr. Ravindra Jaibhai
डॉ. जायभाय म्हणाले, भूगोल विषयाकडे केवळ सामान्यज्ञानाचा विषय म्हणून पाहण्याची आपल्याला सवय आहे. प्रत्यक्षात पूर, दुष्काळ आदींसारख्या अनेक भू-पर्यावरणीय समस्यांचे नेमके विश्लेषण करण्याची क्षमता त्यात आहे. कला आणि शास्त्र यांचा संगम या विषयात आहे. मानव व पर्यावरण यांच्यातील नातेसंबंधाचे, त्यांतील समस्यांचे विवेचन व निराकरण भूगोलाद्वारेच शक्य आहे. या विषयाच्या अभ्यासकांमध्ये दोन प्रवाह आहेत. एक प्रवाह सैद्धांतिक बाबींवर काम करतो, तर दुसरा प्रादेशिक प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देतो. सैद्धांतिक पद्धतीने ज्या प्रश्नांची सोडवणूक करता येऊ शकत नाही, त्यांना प्रादेशिक पद्धतीनेच भिडावे लागते. क्लिष्ट समस्यांच्या निराकरणासाठी या दोन्हींची सांगड घालून संशोधकाला विश्लेषण करावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, स्थानिक भू-पर्यावरणीय समस्यांच्या निराकरणाला प्राधान्य देऊन जागतिक स्तरावर त्यांना स्थान मिळवून देण्याचे काम भूगोलतज्ज्ञांनी करण्याची गरज आहे. भूगोलाचे काम केवळ माहिती, आकडेवारी गोळा करण्याचे नाही. तर त्या माहितीचे सर्वंकष विश्लेषण करून भू-पर्यावरणीय प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी काम करणे अभिप्रेत आहे. डॉ. सचिन पन्हाळकर व डॉ. जरग यांनी काही वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या भू-पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास व विश्लेषण करून आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रसिद्ध केला. या संशोधनाचे जागतिक स्तरावर कौतुक झालेच, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या या संशोधनाची दखल घेतली आहे. त्यामुळे संशोधन स्तरावरील दर्जावृद्धीसाठी काम करण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आंतरविद्याशाखीय सहकार्य वृद्धीची देखील मोठी गरज आहे.
Dr. D.T. Shirke
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. समन्वयक डॉ. संभाजी शिंदे यांनी स्वागत केले. अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर भूगोल शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण पाटील उपस्थित होते. डॉ. डी.एच. पवार यांनी आभार मानले. यावेळी माजी भूगोल विभाग प्रमुख डॉ. के.सी. रमोत्रा, डॉ. अंबादास जाधव यांच्यासह भूगोल अधिविभागातील शिक्षक, हिमाचल प्रदेश गोवा, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील साधन व्यक्ती व संशोधक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Thursday, 19 September 2019

कर्नाटकातील साहित्य चळवळीवर आंबेडकरांचा मोठा प्रभाव: डॉ. चंद्रकांत वाघमारे

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. चंद्रकांत वाघमारे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अनिल सपकाळ व डॉ. रणधीर शिंदे.



कोल्हापूर, दि. १९ सप्टेंबर: कर्नाटकातील समग्र साहित्य चळवळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे, असे प्रतिपादन बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव परिषद शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना मराठी व कन्नड साहित्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.

Dr. Chandrakant Waghmare
डॉ. वाघमारे म्हणाले, या देशातील एकही राज्य असे नाही की जेथील बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पडला नाही. कन्नड साहित्य आणि साहित्यिक सुद्धा त्याला अपवाद नाहीत. कुवेंपू यांच्यापासून शिवराम कारंथ, गिरीश कर्नाड, गोपाळकृष्ण अडिग आदी साहित्यिकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक जाणीवा, समताधिष्ठित समाजरचनेचा आग्रह आदी विचारांचा प्रभाव पडला. या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतींमधून पाहावयास मिळते.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, दलित बंडाय चळवळीमध्ये फूट पडून दलित आणि बंडाय असे दोन स्वतंत्र प्रवाह असले तरी त्यांच्यावरील बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव कायम आहे. दलित साहित्य चळवळीवर हा प्रभाव अधिक प्रकर्षाने जाणवतो, तर बंडाय साहित्य चळवळीवर त्या बरोबरीने बसवण्णा, मार्क्सवाद, लोहियावाद, पेरियार आदी विचारांचाही पगडा जाणवतो. तरीही अंतिमतः शोषणाविरुद्ध, शोषक व्यवस्थेविरुद्ध आवाज बुलंद करणे त्याचप्रमाणे सनातनी विचारांना विरोध करून समताधिष्ठित समाजरचनेचा आग्रह धरणे, हेच दोन्ही साहित्यिक चळवळींचे ध्येय आहे.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, साहित्यिकांमध्ये, विचारवंतांमध्ये मतभेद असले तरी त्यांच्यात कायमस्वरुपी फूट पडणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने घातक ठरते. त्यामुळे परंपरागत सनातन व्यवस्थेविरुद्ध पुरोगामी साहित्यिक विचारवंत यांनी व्यापक समाजहिताची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने एकत्र येण्याची मोठी गरज आज निर्माण झाली आहे.
यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

तर्कनिष्ठ चिकित्सा हा राजा ढाले यांच्या साहित्याचा महत्त्वाचा गुणविशेष: डॉ. अनिल सपकाळ

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. अनिल सपकाळ. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. श्रीकृष्ण महाजन व डॉ. रणधीर शिंदे.



कोल्हापूर, दि. १९ सप्टेंबर: तर्कनिष्ठ चिकित्सा हा राजा ढाले यांच्या साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा गुणविशेष आहे. त्यांच्या साहित्याचे समकालीन संदर्भांच्या अनुषंगाने आकलन व अध्ययन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अनिल सपकाळ यांनी आज येथे केले.
Dr. Anil Sapkal
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव परिषद शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना राजा ढाले यांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.
डॉ. सपकाळ म्हणाले, उपेक्षित, वंचित अशा समाजव्यवस्थेतून पुढे येऊन सामाजिक न्यायासाठी वैचारिक, धार्मिक आणि साहित्यिक अशा विविध पातळ्यांवर राजा ढाले यांनी प्रस्थापितांविरोधात संघर्ष पुकारला. भाषिक आणि सांस्कृतिक व्यवहाराच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तीत्वाला अनेक कंगोरे आहेत. त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या अभिव्यक्तीची दिशा ही एकमेकांपासून अभिन्न आहे. त्यांच्या जीवनातल्या चढउतारांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक निर्मितीमध्ये पडल्याचे दिसून येते. कलावंताचे सृजन आणि कार्यकर्त्याची बंडखोरी यांची व्यामिश्रता आणि विजिगिषु वृत्ती ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व प्रकारच्या साहित्यकृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब आढळते, असे त्यांनी सांगितले.
प्रस्थापित वाङ्मय व्यवहार व संस्कृतीला आव्हान देणारी बंडखोरी राजा ढालेंमध्ये असल्याचे सांगून डॉ. सपकाळ म्हणाले, महानगरीय संवेदनांचे पडघम वाजविणाऱ्या प्रस्थापितांच्या सांस्कृतिक राजकारणाला राजा ढाले यांनी जबरदस्त आव्हान दिले. त्या विरोधात लघु अनियतकालिकांच्या राजकारणाने प्रत्युत्तर देताना सत्यकथेची होळी करण्यापर्यंत त्यांची बंडखोरी गेली. प्रस्थापितांच्या या वाङ्मयीन व्यवहारात होत असलेल्या उपेक्षेमुळे आणि आपले स्थान शोधण्याच्या प्रयत्नात ही सारी बंडखोरी त्यांनी केली. त्यातून त्यांनी स्वतःची प्रस्थापित व्यवस्थेविरोधात तिरकस अशी स्वतःची शैली विकसित केली. तथापि, या बंडखोरीतून उदयास आलेल्या लघु अनियतकालिक चळवळीमध्येही जात-जाणिवांच्या अभावामुळे पुढे देशीवादाला खतपाणी मिळाले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राजा ढाले यांचे काव्य हे अंतर्बाह्य एकरुप आणि रुपनिष्ठ असल्याचे सांगून डॉ. सपकाळ म्हणाले, रुपनिष्ठ जाणिवांशी जोडलेल्या राजाभाऊंच्या काव्यात लयबद्धता, लयतत्त्व प्रकर्षाने आढळते. कविता हा त्यांचा महत्त्वाचा चिकित्सा विषय होता. नव्वदोत्तर कालखंडात ते रुपबंधाकडून आशयाग्रहाकडे वळलेले दिसतात. सर्व साहित्य, भाषणे यांतून त्यांनी आशयात्मकतेसाठी सातत्याने आग्रही प्रतिपादन केले. शोषणाच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी साहित्य समीक्षेच्या माध्यमातून भाषिक व्यवहाराला दिलेले योगदान ओलांडून मराठी भाषेच्या अभ्यासकाला पुढे जाता येणार नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, राजा ढाले यांनी मराठी साहित्यविश्वाला अत्यंत व्यापक स्वरुपाचे योगदान दिले. आंबेडकरवाद आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाया घेऊन त्यांनी मराठी साहित्याची अभिनव पद्धतीने मांडणी केली. परंपरेला नाकारताना विद्रोहाची पेरणी करत असतानाही त्यांनी साहित्यिक भान हरपू दिले नाही. त्यांची सारी साहित्य निर्मिती अस्वस्थतेतून झाली. बंडखोर कार्यकर्ता असूनही कवितेमधील निरागस भाव जपण्याचे त्यांचे भान आणि कौशल्य वादातीत होते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. पी.एस. कांबळे, प्रा. विनय कांबळे, प्रा. अमर कांबळे, प्रा. युवराज देवाळे, नामदेव कांबळे यांच्यासह शिक्षक, नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 16 September 2019

जागतिक ओझोन दिनानिमित्त

शिवाजी विद्यापीठात पथनाट्य

जागतिक ओझोन दिनानिमित्त विशेष पथनाट्याचे सादरीकरण करताना शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे विद्यार्थी.


जागतिक ओझोन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष पथनाट्य सादरीकरण पाहताना कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. आर.के. कामत आदी.

पथनाट्य सादरीकरणानंतर सादरकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी.

कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: जागतिक ओझोन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे विशेष पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक तापमानवाढीच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात येतो. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाद्वारेही विविध उपक्रम, स्पर्धा आदींच्या माध्यमातून याविषयी जागृती करण्यात येते. आज ओझोन दिनाचे औचित्य साधून या अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर वन-वणवा हे पथनाट्य सादर केले. वृक्षतोड रोखून रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. सादरीकरणानंतर श्री. कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना अधिक प्रभावी सादरीकरणासाठी मौलिक टीप्स दिल्या.
या पथनाट्याचे लेखन डॉ. योजना पाटील यांनी केले, तर अस्मिता पाटील, अभिजीत मोरे यांनी गीतलेखन केले. या पथनाट्यात राहुल घट्टे, अनुजा जाधव, वैशाली देसाई, रुपाली उपळकर, मयुरी गोसावी, ज्योती कांबळे, महेश चव्हाण, अक्षय पाटील आणि प्रेरणा घेवारी यांनी पथनाट्यात काम केले.
यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, पर्यावरण अधिविभाग प्रमुख डॉ. पी.डी. राऊत, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत, डॉ. आसावरी जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.