Wednesday, 15 January 2020

‘खेती करो हरिनाम की, मनवा...’

शिवाजी विद्यापीठात कबीरपंथी भजनांच्या सादरीकरणासाठी आलेल्या आष्टा व दुधगाव येथील लोककलाकारांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे.


शिवाजी विद्यापीठात कबीरपंथी भजन सादर करताना आष्टा व दुधगाव येथील भजनी मंडळांचे कलाकार.

कबीरपंथी भजनांच्या सादरीकरणाने विद्यापीठ परिसर नादमय
कोल्हापूर, दि. १५ जानेवारी: “खेती करो हरी नाम की मनवा, खेती करो हरी नाम की। पईसा ना लागे रुपिया ना लागे, कवडी न लागे फुटकी।। मन के बैल सुरत पोहावे, रसि लगाऊँ गुरू ग्यान की। कहत कबीरा सुन भाई साधु, भक्ति करो हरीहर की।। या आणि यासारख्या कबीराच्या दोह्यांनी आज शिवाजी विद्यापीठाचा परिसर नादमय होऊन गेला.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत आज सकाळी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील हिरवळीवर आष्टा येथील कबीरपंथी भजनी मंडळाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिंदे यावेळी म्हणाले की, कबीर आणि तुकाराम यांचा काळ वेगळा असला तरी त्यांची भाषा, वेदना आणि संवेदना एकच आहे. ते दोघेही सर्वसामान्याची भाषा बोलतात आणि सर्वसामान्यासाठी आवाज उठवितात. त्यामुळे त्यांच्याशी आपण पटकन जोडले जातो. या दोघांचे हे वैशिष्ट्य व्यक्तीगतरित्या मला खूप भावते. महाराष्ट्रामध्ये कबीराचे दोहे पारंपरिक पद्धतीने जपले गेले आहेत. त्यांना आज शिवाजी विद्यापीठाच्या व्यासपीठावरुन सादर करताना अत्यंत आनंद होतो आहे. भारतीय लोककलेचा हा एक लुप्त होत चाललेला कलाप्रकार सादर करणाऱ्या कलावंतांना विद्यापीठात आणल्याबद्दल मराठी अधिविभागाचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी आष्टा येथील नवनाथ भजनी मंडळाच्या विष्णू आबा थोरात, नारायण गाडगे, भारती मस्के, अजय गस्ती, विजय दत्तू टोमके यांनी तर दुधगाव येथील कबीरपंथी भजनी मंडळाच्या अविनाश कुदळे, भरमू भाऊ गाजी, कृष्णा आंबी, शिवाजी गवळी, मारुती गवळी, धोंडीराम सपकाळ या कलाकारांनी कबीरपंथी तसेच वारकरी संप्रदायातील भजनांचे अत्यंत सुंदर सादरीकरण केले. मराठी अधिविभागातील डॉ. नंदकुमार मोरे यांनी या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी परिश्रम घेतले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. वैभव ढेरे, डॉ. पी.बी. बिलावर आदी उपस्थित होते.

Tuesday, 14 January 2020

‘जलयुक्त विद्यापीठ’ संकल्पनेवर विद्यापीठाची दिनदर्शिका

शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह अन्य अधिकारी.


शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०च्या दैनंदिनीचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह अन्य अधिकारी.

सन २०२०च्या दैनंदिनी - दिनदर्शिकेचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर, दि. १४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठ गेल्या चार वर्षांपासून विविध विषयांवर आधारित दिनदर्शिका सादर करीत आहे. त्याचप्रमाणे दैनंदिनीही पाच वर्षांपासून प्रकाशित करण्यात येत आहे. जलयुक्त शिवाजी विद्यापीठया विषयावर आधारित सन २०२० ची दिनदर्शिका सादर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दैनंदिनीचे स्वरुपही अधिक आकर्षक करण्यात आले आहे. या दोन्ही उपक्रमांचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता तथा दैनंदिनी समितीच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसी संचालक डॉ. आर.के. कामत, डॉ. विजय ककडे, डॉ. अक्षय सरवदे, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विभा अंत्रेडी, माणिक कदम, डॉ. पी.एस. पांडव, डॉ. वैभव ढेरे आदी उपस्थित होते.
--००--

Friday, 10 January 2020

समकालीन राजकीय समस्यांचा विद्यापीठीय व्यवस्थेने वेध घेणे आवश्यक: खासदार प्रा. संजय मंडलिक



शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनपर मार्गदर्शन करताना खासदार प्रा. संजय मंडलिक. व्यासपीठावर डॉ. रविंद्र भणगे, प्रा. भारती पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, डॉ. विलास आवारी, डॉ. बाळासाहेब भोसले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

राज्यशास्त्र अधिविभागाच्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर, दि. १० जानेवारी: सद्यस्थितीत राजकीय क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील समकालीन समस्यांचा विद्यापीठीय व्यवस्थेने वेध घेऊन त्या अनुषंगाने संशोधक व विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रेरित करावे आणि नागरिकांना सुजाण बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्यशास्त्रातील समकालीन समस्या या विषयावर आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद यांचे ३७ वे अधिवेशन अशा संयुक्त समारंभाचे उद्घाटक म्हणून प्रा. मंडलिक बोलत होते. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
प्रा. मंडलिक म्हणाले, सध्या देशभरात एक प्रकारचे अनिश्चिततेचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजमाध्यमांमुळे वस्तुस्थिती आणि विपर्यास यातील भेद लक्षात न आल्याने गोंधळात भर पडते आहे. या पार्श्वभूमीवर या साऱ्या वातावरणामध्ये समाजाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाची आहे. विभागाच्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीचे योग्य आकलन करता आले, तर त्याचे प्रतिबिंब त्यांचा अभ्यास व संशोधनात उमटेल. त्या दृष्टीने विभागाने समकालीन समस्यांचा वेध घेऊन एकूणच राजकारणाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेणेही आवश्यक आहे. माध्यमांनीही ही सारी परिस्थिती संयमाने हाताळणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे माजी विद्यार्थी असलेल्या प्रा. मंडलिक यांनी आपल्या विद्यार्थी दशेतल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, खरे तर विद्यापीठीय राजकारणात स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून प्रवेश करण्यासाठी म्हणून कायद्याचा अभ्यास सोडून राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरूच ठेवले, मात्र इथल्या शिक्षकांनी अभ्यासाची कास मला सोडू दिली नाही. पहिल्या वर्षी बी प्लस एका टक्क्याने हुकला. दुसऱ्या वर्षी तो प्राप्त करण्यासाठी डी.यु. पवार सर, शिवाजीराव मोरे सर आदींनी प्रोत्साहित केले. या शिक्षकांमुळेच माझ्यासह प्रा. जयंत पाटील, वैभव नायकवडी, प्रा. भणगे वगैरे आम्ही प्राध्यापक होऊ शकलो. याच कालखंडात आमची राजकीय दृष्टीने शैक्षणिक जडणघडण झाली. इथल्या मार्गदर्शनामुळेच सहकार, समाजकारण आणि राजकारणात यशस्वी होऊ शकलो. राज्यशास्त्र विभागात मिळालेल्या आत्मविश्वासामुळेच संसदेत प्रश्न विचारण्याची ताकद माझ्यात निर्माण झाली. त्याबद्दल मी या विभागाचा सदैव कृतज्ञ आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, राज्यशास्त्र हा काही एकल पद्धतीने शिकण्याचा अगर शिकविण्याचा विषय नाही. राज्यशास्त्राच्या विविध शाखा अन्य अनेक विषयांना जाऊन मिळाल्या आहेत. समकाळात तर डिजीटल पॉलिटिक्स ते अॅनालिटिक्स अशी माहिती संवाद तंत्रज्ञानाची जोड देऊन या विषयाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. गणितापासून ते संख्याशास्त्रासारख्या विषयांची या विश्लेषणासाठी मदत घेतली जात आहेत, त्याला आता या नवतंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. रविंद्र भणगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. बाळासाहेब भोसले यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर अधिवेशनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. विलास आवारी आणि राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य प्रमोद पवार उपस्थित होते. यावेळी परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, संशोधक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 8 January 2020

विठुमाऊलीच्या गजरात ग्रंथदिंडीने

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास प्रारंभ







कोल्हापूर, दि. ८ जानेवारी: पारंपरिक वारकरी भजने, विठुमाऊलीचा गजर अन् त्याला टाळ मृदुंगाची साथ अशा अत्यंत भक्तीमय, उत्साही वातावरणात निघालेल्या ग्रंथदिंडीने शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आज उद्घाटन झाले. आजपासून पुढे पंधरवडाभर मराठी भाषेच्या अनुषंगाने अनेकविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन मराठी अधिविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, डॉ. नंदकुमार मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पूजनाने ग्रंथदिंडीस प्रारंभ करण्यात आला.
या ग्रंथदिंडीत विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर, महादेव रामचंद्र यादव ग्रुप भजनी मंडळ, टोप, पांडुरंगनगरी महिला भजनी मंडळ, कोल्हापूर यांच्यासह महे, कसबा बीड, कासारवाडी, पाचगाव, प्रयाग चिखली, सिद्धनेर्ली, हणमंतवाडी या ठिकाणच्या भजनी मंडळांसह सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील तीस विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. मुख्य इमारतीपासून ते वि.स. खांडेकर भाषा भवनपर्यंत निघालेल्या या दिंडीमुळे विद्यापीठातील अवघे वातावरण नादमय होऊन निघाले. दिंडी भाषा भवन येथे पोहोचल्यानंतर सभागृहामध्येही पारंपरिक वारकरी भजनांचेही मोठ्या भक्तीमय वातावरणात सादरीकरण झाले.
या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत ग्रंथ प्रकाशन, युनिकोड कार्यशाळा, लेखक-विद्यार्ती संवाद, परिसंवाद, प्रमाण मराछठी लेखन कार्यशाळा आणि म.सु. पाटील समीक्षा पुरस्कार वितरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिव्यांगांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची निर्मिती आवश्यक: डॉ. ताहा हाजिक

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांगविषयक एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना गोव्याच्या सामाजिक कल्याण संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ताहा हाजिक. 


शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांगविषयक एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना गोव्याच्या सामाजिक कल्याण संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ताहा हाजिक. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. नमिता खोत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. सारा डुव्हल आदी.

कोल्हापूर, दि. जानेवारी: विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्माण करण्याची अत्यंत निकड आहे, असे प्रतिपादन गोवा येथील सामाजिक कल्याण संचालनालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. ताहा हाजिक यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रो केंद्र समावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि ग्रंथालय माहितीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'डेव्हलपमेंट ऑफ ॲक्सेसिबल लायब्ररी फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज' या विषयावर विद्यापीठ, महाविद्यालयीन, सार्वजनिक ग्रंथपाल यांच्यासाठी आज एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हाजिक बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षस्थानी होते.  युएसए येथील फुलब्राईट स्कॉलर डॉ.सारा डुव्हल यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. हाजिक म्हणाले, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी शासनाचे बंधन आहे, म्हणून नव्हे; तर दिव्यांगांप्रती सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन  मिळेल.  उच्च शिक्षण प्रणालीमध्ये ग्रंथालय हा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे. आजच्या काळात, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिजीटल ग्रंथालये, मोबाईल ग्रंथालये, सर्वसमावेशक ग्रंथालये, प्रवेश करण्यायोग्य ग्रंथालये असणे गरजेचे आहे. सर्व शैक्षणिक संस्था तथा महाविद्यालयांच्या ग्रंथालयांमध्ये दिव्यांगांना सहज उपलब्ध होणारे अभ्यासक्रमांचे साहित्य असले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांनी पुढाकार घे दिव्यांगासाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज ग्रंथालये निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.  मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि सामाजिक जबाबदारी म्हणून दिव्यांगांना ज्ञान प्रदान करण्यासाठी सर्व आवश्यक ते प्रयत्नही त्यांनी करायला हवेत.
याप्रसंगी सा़वित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे धनंजय भोले, बुकशेअर इंडिया (पुणे)च्या श्रीमती झैनाब चिनीकमवाला हे तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक संस्थेतील ग्रंथालया दिव्यांगांसाठी पूर्णस्वरूपी सुसज्ज असे दालन तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यापीठाच्या ग्रंथपाल तथा रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुजिव एज्युकेशनच्या समन्वयक डॉ. नमिता खोत यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रम समन्वयक डॉ. डी.बी.सुतार यांनी परिच करून दिला. संघटन सचिव डॉ. पी.बी. बिलावर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सी.ए. लंगरे, डॉ. एम.एस. वासवानी, उपकुलसचिव डॉ.एन.जे.बनसोडे, विलास सोयम यांच्यासह विविध राज्यातील सार्वजनिक तथा महाविद्यालयीन ग्रंथपाल दिव्यांग विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.