Wednesday, 19 February 2020

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत अन्य मान्यवर.


शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत अन्य अधिकारी.

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त सादरीकरण करताना विद्यार्थिनींचे झांजपथक.



कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज शिवजयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
विद्यापीठात आज सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांच्यासह मान्यवरांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी भवनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या झांज, ढोलताशा व लेझीम पथकांनी यावेळी मान्यवरांसमोर नेत्रदीपक सादरीकरण करून वातावरणात रंग भरला. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. अभय जायभाये, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, आयक्यूएसी संचालक डॉ. आर.के. कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या समन्वयक डॉ. नमिता खोत यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत रविदास यांना अभिवादन
दरम्यान, या कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींनाही अभिवादन करण्यात आले.

Tuesday, 18 February 2020

जीवनशैलीत पूरक बदलांनी ‘पीसीओडी’वर मात शक्य: डॉ. सचिन कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना प्रख्यात वंध्यत्व व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी. व्यासपीठावर (डावीकडून) अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. एस.एम. गायकवाड.


कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: जीवनशैलीमध्ये पूरक बदल आणि योग्य आहार व नियमित व्यायामाने वजन कमी करणे या बाबींच्या सहाय्याने महिलांना पॉलिसिस्टीक ओव्हरियन आजारांवर (पीसीओडी) निश्चितपणे मात करता येते, असे प्रतिपादन येथील प्रिस्टीन महिला हॉस्पिटलचे प्रख्यात वंध्यत्व व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेमध्ये तरुण महिलांमधील प्रजननविषयक सर्वसाधारण समस्या आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान देताना डॉ. कुलकर्णी बोलत होते. प्राणीशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखा विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत होते.
डॉ. सचिन कुलकर्णी यांनी आपल्या सुमारे दोन तासांच्या भाषणामध्ये स्त्री-आरोग्य, त्याविषयीचे समज-गैरसमज, मासिक पाळी, स्त्री-पुरूषांतील वंध्यत्व समस्या, त्यासंदर्भातील जागृतीची गरज आणि आधुनिक तंत्रज्ञान आदी बाबींविषयी अत्यंत सहजसोप्या भाषेत प्रबोधन केले. व्याख्यानाला विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती.
Dr. Sachin Kulkarni
डॉ. कुलकर्णी म्हणाले, स्त्री-पुरूषांतील शारीरिक व लैंगिक बदल हे नैसर्गिक आहेत. त्याविषयी मनामध्ये विनाकारण गैरसमज आणि संकोच बाळगण्याची अजिबात गरज नाही. शरीरामधील संप्रेरकांच्या पातळीमधील बदल सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांना कारणीभूत ठरतो. वाढलेले वजन आणि मासिक पाळी यांचा थेट संबंध आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे दोन ते सात दिवस या दरम्यान असणारी मासिक पाळी आणि साधारण २१ ते ३५ दिवसांचे पाळीचे चक्र या बाबी अत्यंत सर्वसाधारण आहेत, हे लक्षात घ्यावे. त्यापेक्षा कमी अगर अधिक कालावधी असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. दहावी-बारावीच्या परीक्षांच्या कालखंडात मानसिक ताणतणाव, सारीरिक श्रम कमी होणे, हालचालीचा अभाव आणि बसल्या जागी खाणे यांचा परिणाम आरोग्याच्या समस्या उद्भवण्यात होतो. मुलींमध्ये वजन वाढल्याने त्यांच्यात पाळीविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राखणे हाच या सर्व समस्यांवरचा महत्त्वाचा उपाय असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, विवाह ठरविला जात असताना वधू-वरांनी अन्य कोणत्याही बाबींपेक्षा मूल केव्हा होऊ द्यायचे, याविषयी खुलेपणाने चर्चा करणे आजघडीला खूप गरजेचे आहे. त्या दृष्टीने निरोधाच्या साधनांची निवड वैद्यकीय सल्ल्याने करणे अधिक श्रेयस्कर ठरते. प्रसुती ठरवित असताना महिलांनी त्यांची अँटी-म्युलेरियन हार्मोन (ए.एम.एच.) चाचणी जरुर करून घ्यावी. ती वैद्यकीय तज्ज्ञांकडूनही करून घेता येते अगर आपली आई अथवा मावशी यांची मासिक पाळी कधी समाप्त झाली, यावरुनही त्याचा आडाखा बांधता येतो. ज्यांची एएमएच मुदत अलीकडे असेल, त्यांनी आधी मूल होऊ द्यावे आणि मग करिअर करावे आणि ज्यांचा कालावधी अधिक आहे, त्या महिला प्रसुती थोडी लांबवू शकतात. तथापि, कोणत्याही महिलेने प्रसुतीला आपल्या करिअरमधला अडथळा मानू नये कारण प्रजननातून मिळणारा सृजनाचा जीवनानंद तुम्हाला अन्य कोणत्याही गोष्टीतून मिळू शकत नाही. तसेच विवाह शक्यतो नात्यांतर्गत करू नयेत कारण नात्यातील विवाहातून जन्मणारी सुमारे तीस टक्के बालके सव्यंग जन्मतात. नात्याबाहेरील विवाहात हे प्रमाण अडीच टक्के इतकेच आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
विवाहेच्छु महिलांनी विवाहाआधी किमान एक वर्षभर फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी-१२ या गोळ्यांचा कोर्स करावा. त्याचप्रमाणे आहारामध्ये नेहमीच कॅल्शियम व प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असेल, याची दक्षता घ्यावी. महिलांनी विशेषतः आपल्या हिमोग्लोबिन व थायरॉईडच्या पातळीची नित्य तपासणी करीत राहावे, असा सल्लाही डॉ. कुलकर्णी यांनी दिला. त्यांनी यावेळी आयव्हीएफ तंत्रज्ञानाची सर्वंकष माहिती दिली, त्याचप्रमाणे उपस्थितांच्या शंकांना उत्तरेही दिली.
अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत म्हणाले, महिला आणि पुरूष या दोघांमध्येही जीवनशैलीशी निगडित वंध्यत्व समस्या दिसून येतात. त्यावर वैद्यकीय शास्त्राने उपाय शोधून दिले आहेतच, पण केवळ जीवनशैली बदलून सुद्धा त्यावर मात करता येते, हे या व्याख्यानातून स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे एम्ब्रियॉलॉजी ही ज्ञानशाखा या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. त्या शाखेचा एखादा लघु अभ्यासक्रम विभागात सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. एस.एम. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने यांनी परिचय करून दिला. डॉ. एम.पी. भिलावे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ए.डी. जाधव, डॉ. श्रीमती एम.व्ही. वाळवेकर, डॉ. एन.ए. कांबळे, डॉ. एस.आर. यनकंची, डॉ. ए.ए. देशमुख यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

डॉ. मेघा पानसरे, किरण गुरव यांचा विद्यापीठात गौरव

महाराष्ट्र शासनाच्या सन २०१८साठीच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ. मेघा पानसरे यांचा शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे ग्रंथभेट देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीक़डून) डॉ. व्ही.एन. शिंदे, किरण गुरव, परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील. 


महाराष्ट्र शासनाच्या सन २०१८साठीच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त करणारे किरण गुरव यांचा शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे ग्रंथभेट देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीक़डून) डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. मेघा पानसरे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील.


वाङ्मय पुरस्कारांमुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: डॉ. मेघा पानसरे आणि किरण गुरव यांच्या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे वाङ्मय पुरस्कार एकाच वेळी मिळाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल सायंकाळी येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०१८ नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यामध्ये डॉ. पानसरे आणि श्री. गुरव यांच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर झाले. शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा अधिविभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांच्या सोविएत रशियन कथाया कथासंग्रहाला प्रौढ वाङ्मय- अनुवादित प्रकारातील पुस्तकासाठी देण्यात येणारा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, तर विद्यापीठात अधीक्षकपदी कार्यरत असणाऱ्या किरण गुरव यांच्या जुगाड या कादंबरीस ह.ना. आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त काल त्यांचा विद्यापीठ प्रशासनातर्फे गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठातील दोन सहकाऱ्यांना एकाच वेळी राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त होण्याला विशेष महत्त्व आहे. साहित्यिक अभिव्यक्तीच्या बाबतीत शिवाजी विद्यापीठातील शिक्षक आणि प्रशासकीय सेवक या दोन्ही स्तरांवरील सजगता यातून अधोरेखित होते. डॉ. पानसरे यांनी मराठी आणि रशियन या दोन भाषांच्या दरम्यान संवादाचा पूल उभारण्याची मोलाची कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गौरवही झाला आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असताना आपला वेळ लेखन अभिव्यक्तीच्या कामी सत्कारणी लावून किरण गुरव यांनी सुद्धा मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही बाब अभिमानास्पद आहे.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, लेखनासारख्या सर्जनशील प्रांतामध्ये विद्यापीठातील सहकारी दमदार आणि लक्षणीय कामगिरी करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांच्या या लेखनकार्याची शासन स्तरावरुन दखल घेतली जाणे, हे त्याहून अधिक गौरवास्पद आहे. विद्यापीठातील अन्य शिक्षक, सेवक यांच्यासाठी सुद्धा ही बाब आदर्शवत स्वरुपाची असून त्यांनीही आपल्यातील सर्जनशीलतेला वाव देण्याची गरज आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन डॉ. पानसरे आणि श्री. गुरव यांचा गौरव करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, 12 February 2020

महापूर काळात विद्यापीठ सेवकांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती : कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे

 विद्यापीठाने प्रशस्तीपत्रे देऊन केला गौरव

कोल्हापूर, दि. १२ फेब्रुवारी : शिवाजी विद्यापीठाच्या सेवकांची ‍विद्यापीठाबरोबरच समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची प्रचिती गतवर्षी महापूरस्थितीच्या कालावधीत आली. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानांद शिंदे यांनी काल सायंकाळी केले
       शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा  दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे कौतुक आणि गतवर्षी महापूर काळामध्ये पूरग्रस्तांना विविध माध्यमांतून दिलासा देण्यासाठी झटलेले  शिक्षक व प्रशासकीय सेवक यांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम काम सायंकाळी राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 शिवाजी विद्यापीठाने महापूर काळाता चालविलेल्या मदत व पुनर्वसन शिबिरात सक्रिय योगदान देणाऱ्या शिक्षक व सेवकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करताना कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे. सोबत परीक्षा संचालक गजानन पळसे आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.
       कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रत्यंतर पूरकाळात आले. कोणत्याही कार्यालयीन आदेशाखेरीज केवळ सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून सर्व सहकारी विद्यापीठात उपस्थित होते. येथे सुरु केलेल्या शिबीरामध्ये सक्रिय योगदान दिले. अगदी रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर अडकून पडलेल्या नागरिकांना शिबीरात दाखल केले. पडेल ती जबाबदारी पेलली. कोल्हापूर शहराला कॅम्पसवरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असो, अगर जनावरांना वैरण उपलब्ध करणे असो, सर्वच पातळयांवर विद्यापीठातील सहकाऱ्यांनी एकादिलाने काम केले, याचा अभिमान वाटतो.
       कुलगुरु डॉ. शिंदे पुढे म्हणाले, दीक्षान्त समारंभ यशस्वी करण्यासाठी सुध्दा विद्यापीठातील सर्व सहकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्याची पोचपावती मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘विश्वविद्यालय में अनुशासन दिखा |’ या लेखी प्रतिक्रियेतून आपल्याला मिळाली आहे. प्रमुख पाहुणे प्रा. भूषण पटवर्धन यांनीही अत्यंत नियोजनबध्द व देखणा कार्यक्रम आयोजित केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या साऱ्याचे श्रेय विद्यापीठातील सर्व सहकाऱ्यांना जाते.
       यावेळी कुलगुरु डॉ. शिंदे यांच्या हस्ते  दीक्षान्त समारंभासाठी नियुक्त केलेल्या सर्व समितींचे प्रमुख व सदस्य आणि महापूर काळात ज्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला ते शिक्षक व सेवक यांना प्रशस्तीपत्रे प्रदान करुन गौरविण्यात आले.
       यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुनिता वांगीकर यांनी सुत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

Friday, 7 February 2020

विद्यापीठाच्या कॉफी टेबल बुकचे कुलपतींच्या हस्ते प्रकाशन

शिवाजी विद्यापीठाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करताना कुलपती भगतसिंह कोश्यारी. सोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रा. भूषण पटवर्धन यांच्यासह अन्य मान्यवर.

कोल्हापूर, दि. ७ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सचित्र माहितीचा समावेश असलेल्या कॉफीटेबल बुकचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी कुलपती श्री. कोश्यारी काल येथे उपस्थित होते. समारंभापूर्वी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या दालनामध्ये कुलपतींच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या पिक्चरेस्क् शिवाजी युनिव्हर्सिटी या कॉफी टेबल बुकचे (मर्यादित आवृत्ती) प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कुलपती श्री. कोश्यारी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने या कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून विद्यापीठ परिसराचे इतके सुंदर चित्रण केले आहे की ते पुनःपुन्हा पाहात राहावेसे वाटते. मुख्य प्रशासकीय इमारतीपासून अन्य इमारती, जैवविविधता, मोर व पक्षीवैभव, जलसंवर्धन, सोयीसुविधा इत्यादी सर्वंकष माहिती केवळ छायाचित्रांच्या माध्यमातून अभ्यागतांना मिळू शकते. विद्यापीठाचे कॉफीटेबल बुक करण्याचा हा उपक्रम खरेच अनुकरणीय आहे.
यावेळी दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. भूषण पटवर्धन, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमित कुलकर्णी, धैर्यशील पाटील, संजय जाधव आदी उपस्थित होते.

Wednesday, 5 February 2020

शिवाजी विद्यापीठात ग्रंथ महोत्सवास उत्साही सुरवात

शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) परीक्षा संचालक गजानन पळसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन.


शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत (डावीकडून) अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, परीक्षा संचालक गजानन पळसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी स्टॉलवरील पुस्तकांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. नमिता खोत, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत.

कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवात देशभरातील अनेक मान्यवर प्रकाशकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या स्टॉलवर अभ्यासक्रमातील अनेकविध विषयांच्या संदर्भग्रंथांसह महत्त्वाच्या अवांतर वाचनासाठीही हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोरील आमराईमध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. यंदा ग्रंथ प्रदर्शनाचे १४ वे वर्ष आहे. प्रदर्शनात सुमारे ३३ स्टॉल मांडण्यात आले आहेत.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या क्रमांक १ च्या स्टॉलचे फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या छायाचित्रांना कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनही करण्यात आले. कुलगुरूंसह सर्व मान्यवरांनी यावेळी सर्व स्टॉलधारक प्रकाशक व अन्य सहभागींची सदिच्छा भेट घेऊन त्यांना विद्यापीठाची दैनंदिनी भेट देऊन स्वागत केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. एस.व्ही. थोरात, इंटरनेट विभागाचे समन्वयक डॉ. मिलींद जोशी, परीक्षा विभागाचे उपकुलसचिव एन.एम. आकुलवार, सहाय्यक कुलसचिव निवास माने यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रेड फेअर स्टार्ट-अप-२०२०

ट्रेड फेअरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या फूड स्टॉलचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. नमिता खोत, डॉ. बारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव व महेश चव्हाण.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग व व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष अनुभव मिळावेत आणि त्यांच्यातून चांगले उद्योजक-व्यावसायिक घडावेत, यासाठी गतवर्षीपासून विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठीही काही स्टॉल घेऊन त्यांचे कौशल्य सर्वांसमोर प्रदर्शित करण्याची संधी देण्यास सुरवात करण्यात आली. यंदाही या उपक्रमाची व्याप्ती वाढवून कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राने एमबीए युनिटच्या सहकार्याने ट्रेड फेअर स्टार्टअप-२०२०चे आयोजन केले आहे. याअंतर्गत एकूण १० स्टॉल घेण्यात आले असून त्यातील आठ विविध खाद्यपदार्थांचे तर सेंद्रिय गूळ आणि कोल्हापुरी चप्पलचा प्रत्येकी एक स्टॉल आहे. यात एमबीए, कॉमर्स, रसायनशास्त्र आणि फूड टेक्नॉलॉजीच्या सुमारे ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या फेअरचे नियोजन समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, श्रीमती डॉ. इंगवले व कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण यांनी केले आहे.

गीत-बहारला जल्लोषी प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त समारंभानिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित 'गीत-बहार' या कार्यक्रमात सिद्धराज या दिव्यांग (अंध) विद्यार्थ्याच्या सादरीकरणाने भारावलेल्या कुलगुरूंसह सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गीत-बहार या विद्यार्थ्यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले. अत्यंत बहारदार झालेल्या आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादाने उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरवात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सूर निरागस हो... या गीताने झाली. सिद्धराज या दिव्यांग (अंध) विद्यार्थ्याने ही सुरवातच इतकी खणखणीत केली की, कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह मान्यवरांनी गीत संपताच व्यासपीठावर जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.
सच्च्या गुणवत्तेला कोणत्याही मर्यादा नसतात. शारिरीक अगर अन्य कोणतेही व्यंग तुमच्या अभिव्यक्तीमधील अडथळा ठरू शकत नाही, हे सिद्धराजने खऱ्या अर्थाने सिद्ध केले आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.
त्यानंतर कार्यक्रमात अधीर मन झाले.., जीव रंगला.., मोह मोह के धागे, मला वेड लागले प्रेमाचे, नैनो में बदरा छाए, पहला नशा, डिपाडी डिपांग, एकवीरेची पाहात होते वाट, रश्के कमर अशी गीते विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस या प्रकारे सादर केली. या गायक विद्यार्थ्यांत सिद्धराज पाटील याच्यासह गीता रणवाडकर, विनायक लोहार, हर्षदा परीट, भावना हांडे, रोहित कांबळे यांचा समावेश होता. त्यांना अमित साळोखे, ओंकार गुरव, विक्रम परीट, संदेश कायंदे यांनी अतिशय उत्कृष्ट संगीतसाथ केली. आदित्य मैंदर्गीकर यांनी निवेदन केले. या कार्यक्रमानंतर विभागाच्याच विद्यार्थ्यांनी शिरियल फिरियल ही पार्सिकल लघुनाटिका सादर केली. तिलाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि निखील भगत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.


Tuesday, 4 February 2020

‘शिवरायांची कीर्ती सांगे, आईच माझा गुरू!’

छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे तैलचित्र कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करताना वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत यांच्यासह अन्य मान्यवर.



तैलचित्राविषयी माहिती देताना वसंतराव मुळीक
जे.बी. सुतार यांनी रेखाटलेले भव्य तैलचित्र शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आले.

राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवराय यांचे तैलचित्र विद्यापीठाकडे सुपूर्द; मराठा महासंघाचा उपक्रम

कोल्हापूर, दि. ४ फेब्रुवारी: राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे संस्कार आणि प्रेरणा यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. माँसाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच या देशाला शिवछत्रपतींसारखा युगपुरूष लाभला. त्यामुळे या दोघांचेही महात्म्य अधोरेखित करणारे तैलचित्र शिवाजी विद्यापीठाला प्रदान करताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज येथे काढले.
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शिवभक्त लोकआंदोलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात (दीक्षान्त सभागृह) लावण्यासाठी म्हणून राजमाता जिजाऊ आणि शिवराय यांची चित्रकृती आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. शिवरायांची कीर्ती सांगे, आईच माझा गुरू या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असणारी ही चित्रकृती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार जे.बी. सुतार यांच्याकडून श्री. मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी विशेषत्वाने करवून घेतली आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी रेखाटलेल्या या तैलचित्राचा आकार ८X१० फूट इतका भव्य आहे.

श्री. मुळीक म्हणाले, हजारो शब्द जो परिणाम साधणार नाहीत, ते काम एखादे सुंदर चित्र करू शकते. म्हणून या चित्राच्या हजारो प्रती घरोघरी पोहोचविण्यात आल्या आहेत. ही अद्वितिय चित्रकृती तिच्या लौकिकाला साजेशा योग्य ठिकाणी लावली जावी, या भावनेतून शिवाजी विद्यापीठाकडे ती सुपूर्द करण्यात आली आहे.
यावेळी इंद्रजीत सावंत म्हणाले, छत्रपती शिवराय हे जसे आपल्या सर्वांचे दैवत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाविषयीही सर्व शिवप्रेमींमध्ये आपुलकीची, प्रेमाची व आदराची भावना आहे. त्याचप्रमाणे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी छत्रपतींचा मूळ इतिहास सांगणारी विविध कागदपत्रे जगासमोर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे ही चित्रकृती शिवाजी विद्यापीठात असण्याला एक वेगळे औचित्य व महत्त्व आहे. त्यातून जिजाऊंचे शिवरायांना घडविण्यातील योगदान तर विद्यार्थ्यांसमोर येत राहीलच; शिवाय, महाराजांप्रमाणे कर्तबगारी गाजविण्याची प्रेरणाही देत राहील, अशी भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी हे तैलचित्र विद्यापीठाकडे सुपूर्द केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यापीठासाठी तसेच व्यक्तीगतरित्या माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा असा चिरस्मरणीय क्षण आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांना त्यांच्या वाटचालीमध्ये सातत्याने योग्य दिग्दर्शन केले. शिवरायांच्या जडणघडणीत त्यांचा किती मोलाचा वाटा आहे, हे प्रत्ययकारकपणे दर्शविणारे हे जे.बी. सुतार यांचे एक अप्रतिम तैलचित्र आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक आणि बारकाव्यांनिशी अत्यंत जिवंत वाटाव्यात, अशा व्यक्तीरेखा रेखाटल्या आहेत. या तैलचित्राला राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात लावून योग्य तो सन्मान केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्यासह इतिहास संशोधक गणेश नेर्लेकर-देसाई, शशिकांत पाटील, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, इंद्रजीत माने, अवधूत पाटील, शरद साळुंखे, कृष्णाजी हरुगडे, गुरुदास जाधव आदी उपस्थित होते.