Monday, 23 March 2020

शिवाजी विद्यापीठात शहीदांना अभिवादन



कोल्हापूर, दि. २३ मार्च: शिवाजी विद्यापीठात आज शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव उपस्थित होते.

Saturday, 21 March 2020

विद्यापीठाच्या ऑनलाइन सुविधांमुळे

विद्यार्थ्यांना घरी राहूनही अभ्यास करणे शक्य




कोल्हापूर, दि. २३ मार्च: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक यांना ३१ मार्चपर्यंत वर्गामध्ये एकत्र येऊन अध्यापन प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली आहे. तथापि, विद्यापीठाच्या ऑनलाईन सेवा-सुविधांमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अध्ययन प्रक्रिया सुरू ठेवणे शक्य झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत ऑनलाईन अभ्यासक्रम निर्मितीसह MOOC, MOODLE आदी ऑनलाईन उपलब्ध व्यासपीठांचा ऑनलाईन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरवात केली. वर्गामधील नियमित अध्यापनाला ऑनलाईन अध्ययनाची जोड लाभल्याने विद्यार्थ्यांना विषय समजावून घेणे आणि त्याचा सुनियोजितरित्या अभ्यास करणे शक्य झाले आहे. सद्यस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणांसह गर्दीची ठिकाणे टाळणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने शासन आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत वर्गातील अध्यापन बंद केले आहे. अशा वेळी ऑनलाइन व्यासपीठांवरील अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे. अनेक विद्यार्थी या सुविधांचा लाभ घेऊन आपल्या अभ्यासात खंड न पडू देण्याची दक्षता घेत आहेत.

MOOC, MOODLE चा वापर करण्याचे कुलगुरूंचे आवाहन
या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी असे म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षकांना सध्याच्या वर्क फ्रॉम होमचे आवाहन करीत असताना विद्यापीठ प्रशासनाने मूक (मासिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स) आणि मूडल (मॉड्युलर ऑब्जेक्ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग एन्व्हायर्नमेंट) या दोन ई-लर्निंग व्यासपीठांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ऑनलाइन मार्गदर्शन करावे, त्यासाठी आवश्यक ते प्रेझेंटेशन, नोट्स वगैरे सामग्रीची निर्मिती करावी, असे आवाहन केले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत थेट अध्यापन करता येत नसले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी म्हणून ऑनलाइन व्यासपीठांचा मुबलक वापर करावा, अशा सूचना शिक्षकांना देण्यात आल्या. त्यानुसार, बहुतेक शिक्षकांनी मूक, मुडलच्या आधारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनास प्रारंभही केला, ही समाधानाची बाब आहे. तथापि, अद्यापही जे विद्यार्थी ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करीत नसतील, त्यांनी सुद्धा मूक, मुडल या व्यासपीठांचा पुरेपूर वापर करून आपले शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले आहे.
या संदर्भ साहित्याबरोबरच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या स्वयम’ (SWAYAM) या उपक्रमाच्या लिंकही विद्यापीठाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणे करून त्यांना अभ्यासाचे लिखित तसेच ऑडिओ-व्हिज्युअल्सही उपलब्ध व्हावेत. स्वयम उपक्रमाच्या https://swayam.gov.in/ या मुख्य लिंकसह स्वयंप्रभाhttps://www.swayamprabha.gov.in/ या ३२ डीटीएच वाहिन्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याखेरीज इन्फ्लिबनेटचे मूक (http://ugcmoocs.inflibnet.ac.in/) आणि ई-पीजी पाठशाला
(http://epgp.inflibnet.ac.in/) हे अभ्यासविषयक साहित्यही एक्सेस करण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. त्यांचा लाभ घेण्याचे आवाहनही कुलगुरूंनी केले आहे.
या प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राने अन्य ऑनलाइन संदर्भ साहित्यही उपलब्ध केले आहे. या केंद्राच्या http://www.unishivaji.ac.in/library/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांसाठी अनेक अध्ययन-अध्यापनविषयक ऑनलाइन सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ज्ञानस्रोत केंद्राने ई-बुक्स, ई-डाटाबेस आणि ई-जर्नल्स आदींचे अनेक ऑनलाईन स्रोत विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत. http://www.unishivaji.ac.in/library/E-Books या लिंकद्वारे सायन्स डायरेक्ट, स्प्रिंजर, केंब्रिज आदी नामांकित प्रकाशकांचे ५७८ ई-बुक्स पूर्ण टेक्स्ट स्वरुपात वाचता येतात. http://www.unishivaji.ac.in/library/E-Journals या लिंकद्वारे विविध नामांकित प्रकाशकांचे ४४ ई-जर्नल्स अभ्यासता येतात. त्याचप्रमाणे http://www.unishivaji.ac.in/library/E-Databases या लिंकवर संशोधनासाठी अत्यावश्यक अशा सायफाइंडर, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, स्कोपस, जे-गेट ससोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, जे-गेट सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, इबिस्को डिस्कव्हरी सर्व्हिस आदी १८ ई-डाटाबेसचा अभ्यास करता येतो. याशिवाय INFED (इन्फ्लिबनेट एक्सेस मॅनेजमेंट फेडरेशन) अंतर्गत सहा नामांकित प्रकाशकांचे डाटाबेस विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा ज्ञानस्रोत केंद्राने http://www.unishivaji.ac.in/library/Resource-Centre-for-Inclusive-Education-(RCIE) या  लिंकद्वारे दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.







Saturday, 29 February 2020

विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटीचा निधी लवकरच: मंत्री श्री.उदय सामंत

कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या आढावा बैठकीत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत. सोबत (डावीकडून) जिल्हाधिकारी दौलत देसाई, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आदी.




कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या आढावा बैठकीत बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत. सोबत (डावीकडून) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील.


‘प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही प्रगतीपथावर’

कोल्हापूर, दि.29 फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रूपयांचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात आज मंत्री श्री.सामंत यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील प्राध्यापकांची 2900 रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही सुद्धा शासन स्तरावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत म्हणाले, सन 2010 पासून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या अध्यासनांचा आढावा घेऊन ती सुरळीत चालण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रूपये देण्यात येतील. त्या निधीचा विनियोग विद्यार्थीहित लक्षात घेऊन कशा प्रकारे करणार, त्याचे नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.
शासन आणि विद्यापीठे वेगळी नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून मंत्री श्री.सामंत म्हणाले, शासन आपल्या स्तरावरून विद्यापीठांची काळजी वाहात असताना विद्यापीठांनीही आपले उत्तरदायित्व योग्य प्रकारे सांभाळणे आवश्यक आहे. यापुढील कालखंडात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन विद्यापीठे व संस्थाचालक यांच्या विविध प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे धोरण अवलंबण्यात येईल, जेणे करून त्यांचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात येईल.
मंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या हद्दीत मराठी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असून सध्या तो विचार प्राथमिक अवस्थेत आहे. हा विचार पूर्णत: अराजकीय स्वरूपाचा असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा न पोहोचविता सीमाभागातील मराठी भाषेच्या शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी शिक्षण देण्यासाठी हे महाविद्यालय असावे, असा हेतू आहे. त्या दृष्टीने योग्य स्थळाची निवड करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना त्यांनी केली.
विद्यापीठामधील विविध प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच वर्षांच्या कालावधीत साधारणत: दहा कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करता येईल का, या दृष्टीनेही विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.
शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एक अग्रणी विद्यापीठ असून येथील ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी अँड डाटा सायन्सेस’चे राष्ट्रीय संस्थेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने सर्वसमावेशक स्वरूपाचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना मंत्री महोदयांनी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांना केली.
           
प्रायव्हेट सॅटेलाईट आणि टीचर्स ट्रेनिंगचा पायलट प्रोजेक्ट

यावेळी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी इस्त्रो आणि आय.आय.टी. (मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठाचा स्वत:चा खाजगी सॅटेलाईट विकसित करण्याचा मानस असल्याचे मंत्री उदय सामंत यांना सांगितले. त्यावर, हा चांगला उपक्रम असून त्यासंदर्भात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, शिवाजी विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच महाविद्यालये निवडून त्याठिकाणी सॅटेलाईट अगर नेटवर्कच्या माध्यमातून टीचर्स ट्रेनिंगचा पायलट प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने तयारी करावी, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ.शिंदे, प्र-कुलगुरू डॉ.शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाविषयी पॉवरपॉइंट सादरीकरण केले. कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
बैठकीला आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, कोल्हापूरचे विभागीय सहसंचालक डॉ.अशोक उबाळे, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीनंतर मंत्री श्री. सामंत यांनी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात संस्थाचालकांशीही संवाद साधला.


Wednesday, 26 February 2020

लोककला हेच आपल्या संस्कृतीचे संचित: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात चित्रकार भास्कर हांडे यांच्या अक्षरचित्राच्या प्रतिकृतीचे अनावरण करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. मेघा पानसरे, डॉ. रणधीर शिंदे, किरण गुरव.


शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अंजली निगवेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. मेघा पानसरे, किरण गुरव.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे आयोजित लोककला महोत्सवात धनगरी ओव्या सादर करताना कुरळप (जि. सांगली) येथील श्री बिरदेव भैरुसिद्ध ओवीकार मंडळाचे लोककलाकार.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे आयोजित लोककला महोत्सवात गजनृत्य सादर करताना आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा गजनृत्य वालूग मंडळाचे लोककलावंत.



कोल्हापूर, दि. 26 फेब्रुवारी: लोककला हेच आपल्या संस्कृतीचे संचित असून पारंपरि लोककलेचा वारसा जपण्याबरोबरच त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित विशेष लोककला महोत्सव अत्यंत स्तुत्य स्वरुपाचा आहे, असे कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 'लोकसाहित्य: उत्सव मराठीचा' या लोककला महोत्सवाचे आयोजन वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाच्या द्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ.शिंदे बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ.शिंदे म्हणाले, प्रमाण भाषेचे अवडंबर माजविताना बोली भाषा, लोकभाषा, मातृभाषा यांकडे संकुचित पध्दतीने पाहिले जाते. हा संकुचित दृष्टीकोन दूर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. मातृभाषेचे जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. लोकसंगीत, लोककला आणि लोकसाहित्य हा आपला वारसा आहे. त्याकडे काही तरी ग्राम्य म्हणून पाहणे उचित नाही, ते ल्या संस्कृतीचे खरे संचित आहे, या भावनेतून त्याकडे पाहिले जाणे आवश्यक आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. त्यानुसार आपला हा वारसा आपण विसरुन चालणार नाही. तथापि, लोककलांचे संवर्धन करण्याची आपली जबबादारी आहेच, मात्र त्याच वेळी आजच्या काळात विवेकवादाला नकार देणे हे सुद्धा योग्य होणार नाही.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आपल्या संस्कृतीचा ठेवा असलेल्या कलाविष्कारांचा काळाबरोबर ऱ्हास हो नये. सोशल मीडियाच्या काळामध्ये या कलाविष्कारांचे जतन करण्यासाठी त्यांचे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सुवातीला कवी कुसुमाग्रज आणि सरोजिनी बाबर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी चित्रकार भास्कर हांडे यांनी अक्षरचित्र रेखाटन केलेल्या प्रतिमेचे अनावरण कुलगुरू डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, या लोककला महोत्सवामध्ये जात्यावरील ओव्या, धनगरी व्या, गजनृत्य, गण-गवळण, लावणी बैठकीची लावणी, भेदिक शाहिरी, राष्ट्रीय शाहिरी, झिम्मा फुगडी, पोतराज, वासुदेव यांचे वैविध्यपूर्ण द्धतीने सादरीकरण करण्यात आले.
मराठी अधिविभागाप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी स्वागत प्रास्ताविक केले, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी संगीत नाटयशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.अंजली निगवेकर, विदेशी भाषा अधिविभागप्रमुख डॉ.मेघा पानसरे, साहित्यिक किरण गुरव यांच्यासह मराठी भाषा आणि लोककलाप्रेमी जनता, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.