Thursday, 17 December 2020

कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससोबत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

कराड येथे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीसमवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार झाला. या प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. डी.के. अग्रवाल, डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. अतुल भोसले, कृष्णा इन्स्टिट्यूटचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एम.व्ही. घोरपडे आणि डॉ. एस.व्ही. काकडे.


कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) समवेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा लाभ शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह संशोधकांना मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज कराड येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठ आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी यांच्या दरम्यान आज सकाळी कराड येथे सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा इन्स्टिट्यूटचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. अतुल भोसले उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांमधील संशोधक शिक्षक व विद्यार्थी यांच्यादरम्यान संशोधकीय सहकार्य निर्माण होऊ शकणार आहे. विशेषतः शिवाजी विद्यापीठातील एम.एस्सी. इन मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता होऊ शकेल. यामध्ये न्यूरोसायन्स, कर्करोग संशोधन इत्यादीविषयक संशोधन करता येईल. त्याचप्रमाणे कृष्णा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना बायोइन्फॉर्मेटिक्स, मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल मायक्रोबायॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, पश्चिम घाटातील जैवविविधता तसेच सामाजिक शास्त्रांमधीलही वैद्यकीय क्षेत्राला पूरक अशा क्षेत्रांबाबत अभ्यास करणे शक्य होईल. त्याखेरीज फॅकल्टी-स्टुडंट्स एक्स्चेंज, विविध संयुक्त शैक्षणिक व संशोधकीय उपक्रम, संयुक्त प्रकाशने, डाटा एक्स्चेंज, ग्रंथालयीन सहकार्य अशा अनेक दिशांनी ही सहकार्यवृद्धी होणे अभिप्रेत आहे.

कृष्णा इन्स्टिट्यूटचे कुलपती डॉ. भोसले म्हणाले, शिवाजी विद्यापीठासमवेत होत असलेला हा सामंजस्य करार दूरगामी महत्त्वाचा असून त्याचा दोन्ही संस्थांना संशोधनात्मक दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. भविष्यात या माध्यमातून दोन्ही संस्थांच्या दरम्यान सहकार्याची आणखी नवनवीन क्षेत्रे उघडली जातील आणि हे सहकार्य अखंडित राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि कृष्णा इन्स्टिट्यूटचे कुलसचिव डॉ. एम.व्ही. घोरपडे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी कृष्णा इन्स्टिट्यूटचे अतिरिक्त संचालक (संशोधन) डॉ. डी.के. अग्रवाल, अलाईड सायन्सेस विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.सी. काळे, डी.ए. माने, समन्वयक डॉ. के.डी. सोनवणे उपस्थित होते. सुरवातीला डॉ. एस.व्ही. काकडे यांनी स्वागत केले. डॉ. डी.के. अग्रवाल यांनी आभार मानले.

Tuesday, 15 December 2020

जीवाणूंमधील प्रतिजैविक प्रतिकारक्षमतेला कारणीभूत एन्झाईमचा शोध

शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण संशोधन

 

विविध प्रकारच्या जीवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्या एन्झाईम्सची प्रतिरुपे


सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. के.डी. सोनवणे यांची विशेष मुलाखत. (व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. १५ डिसेंबर: विविध रोगांना कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंमध्ये निर्माण होत असलेली प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही आज जागतिक स्तरावर भेडसावणारी एक प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे. या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागाच्या संशोधकांनी अत्यंत मूलभूत स्वरुपाचे संशोधन केले असून जीवाणूंमधील ही प्रतिजैविक प्रतिकारक्षमता निष्प्रभ करणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. या संदर्भातील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.

Dr. K.D. Sonawane

शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागातील संशोधक प्रा. डॉ. के.डी. सोनवणे आणि त्यांच्या चमूने अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (ए.एम.आर.) या संदर्भात हे संशोधन केले आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. सोनावणे म्हणाले, साधा ताप किंवा सर्दी झाली तरी ती कशामुळे झाली, याचा विचार न करता अँटिबायोटिक (प्रतिजैविक) औषधे घेतली जातात. ही सवय घातक आहे. मुळात आपल्याला झालेला संसर्ग या जीवाणूमुळे आहे, विषाणूमुळे आहे की अन्य बुरशीजन्य स्वरुपाचा आहे, हे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न होत असते. त्यानंतर औषधाचा प्रकार व मात्रा डॉक्टर ठरवित असतात. ती औषधे अगर प्रतिजैविके त्याच प्रमाणात घ्यावयाची असतात. पण, तसे न करता लोक स्वतःच स्वतःचे उपचार करू लागतात आणि त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम संभवतात. केवळ जीवाणूजन्य आजारांवर प्रतिजैविके उपयुक्त असतात, मात्र सर्वच आजारांवर त्याचा प्रयोग केला जातो, हेही घातक आहे. या औषधांचा अतिप्रमाणात अगर अयोग्य वापर केला असता विविध रोगांना कारक असणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये प्रतिजैविक प्रतिकारक्षमता (अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स) निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सन २०१४मध्ये प्रकाशित एका अहवालात, सध्या वापरात असलेली प्रतिजैविके काही वर्षांनंतर लाभदायक अगर परिणामकारक ठरू शकणार नाहीत, असा इशारा दिला आहे. या जागतिक स्तरावर निर्माण होऊ घातलेल्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या विषयावरील संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाद्वारे हाती घेण्यात आले.

काय आहे संशोधन?

डॉ. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवाणूंमध्ये ही प्रतिजैविक प्रतिकारक्षमता कशी निर्माण होते, या दिशेने संशोधन केंद्रित करण्यात आले. या अंतर्गत जीवाणूंत प्रतिरोध निर्माण करणारे एक नवीन वितंचक (एन्झाईम) आढळून आले. त्या एन्झाईमचा सर्वंकष अभ्यास या संशोधनांतर्गत करण्यात आला. इतकेच नव्हे, तर त्या एन्झाईमचा प्रतिरोध करू शकणाऱ्या सेंद्रिय रेणूचाही (इन्हिबिटर) सूक्ष्मजीवशास्त्रीय व बायोइन्फॉर्मेटिक्स पद्धतींचा वापर करून शोध लावण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या रोगाच्या जीवाणूत प्रतिजैविक प्रतिकारक्षमता आढळल्यास त्यावर मात करण्यासाठी सदर संशोधन अत्यंत प्रभावी ठरणार आहे. सदरबाबतचे प्रोटीन सिंथेसिस व मॉलेक्युलर जेनेटिक स्तरावर देखील संशोधन करण्यात आले आहे.

सदर संशोधन जर्नल ऑफ सेल्युलर बायोकेमिस्ट्री, ब्राझिलियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी, प्लॉस वन, जर्नल ऑफ प्लँट बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी, जर्नल ऑफ प्रोटीन्स अँड प्रोटीओमिक्स आणि जर्नल ऑफ इथनोफार्मोकोलॉजी इत्यादी संशोधन पत्रिकांतून प्रकाशित झाले आहे. डॉ. सोनवणे यांच्यासमवेत डॉ. ऋषिकेश परुळेकर, डॉ. अस्मिता कांबळे, डॉ. एस.आर. वाघमारे, डॉ.एन.एच. नदाफ आणि सागर बराले या संशोधकांचे यात योगदान आहे.

संशोधनाची उपयुक्तता

शिवाजी विद्यापीठात झालेले हे संशोधन जीवाणूंत निर्माण होत असलेल्या प्रतिजैविक प्रतिकारक्षमता समजून घेणे व निष्प्रभ करण्याच्या दृष्टीने जागतिक स्तरावर अत्यंत उपयुक्त आहे. मानव, प्राणी व वनस्पती यांच्यावरील विविध रोगांवरील उपचारांसाठी प्रभावी ठरणारे आहे, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

भविष्यवेधी संशोधन: कुलगुरू डॉ. शिर्के

डॉ. के.डी. सोनवणे आणि त्यांच्या संशोधक चमूने जागतिक स्तरावर जगाला भेडसावू शकणाऱ्या एका महत्त्वपूर्ण आरोग्य समस्येचा वेध घेतला आहे. जीवाणूंमध्ये निर्माण होणारी प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही भविष्यात मानवी आरोग्यासमोरील मोठी आव्हानात्मक समस्या आहे. त्यावरील उपायांसंदर्भातील हे संशोधन भविष्यवेधी स्वरुपाचे आहे. या पुढील काळातही या संशोधकांकडून असेच संशोधन होत राहावे, यासाठी विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य त्यांना लाभत राहील, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केली.

रेशीम शेतीविषयक मार्गदर्शनातून शिवाजी विद्यापीठाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान

केंद्रीय रेशीम संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून गौरवोद्गार

 

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासमवेत केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. पंकज तिवारी, सहसंचालक डॉ. एम. मूर्ती व डॉ. शिवकुमार हुक्केरी, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने, व डॉ. ए.डी. जाधव आदी.


कोल्हापूर, दि. १५ डिसेंबर: रेशीम शेतीविषयक माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून त्यांना सातत्याने आवश्यक मार्गदर्शन पुरविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचे ग्रामीण विकासात मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी नुकतेच काढले.

केंद्रीय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्था तसेच केंद्रीय रेशीम मंडळ, म्हैसूर येथील संचालक डॉ. पंकज तिवारी, सहसंचालक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. मूर्ती आणि सहसंचालक (यांत्रिकीकरण) डॉ. शिवकुमार हुक्केरी यांनी नुकतीच (दि. १० व ११ डिसेंबर) शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स आणि इनक्युबेशन इन सेरिकल्चरला भेट दिली. येथे सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विविध प्रक्षेत्रांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे कागल येथील रेशीम यांत्रिकीकरणासाठी लागणाऱ्या मशीन तयार करणाऱ्या प्रकल्पांना भेटी दिल्या.

विद्यापीठाच्या रेशीमशास्त्र विभागामार्फत मार्गदर्शन प्राप्त यळगूड (ता. हातकणंगले) येथील आप्पासो झुंजार, राजेंद्र बागल यांच्या रेशीम शेतीला भेट देऊन पाहणी केली. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील रेशीमशास्त्रविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांकडील कोषाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी पडत असल्याबद्दल या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या रेशीमशास्त्र पदविका, पदव्युत्तर पदविका प्रशिक्षण उपयुक्त ठरत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. विद्यापीठाच्या या सेरिकल्चर इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण संकल्पना आदींना भविष्यात सहकार्य करण्याविषयी सदर शिष्टमंडळाने अनुकूलता दर्शविली. जिल्हा नियोजन समिती, केंद्रीय रेशीम मंडळ, वस्त्र मंत्रालय यांच्या सहकार्याने तुती लागवड ते कापड निर्मिती असे एकात्मिक मॉडेल विद्यापीठात उभे करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची तयारी सदर अधिकाऱ्यांनी दर्शविली.

सदर अधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रसंगी प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने, रेशीमशास्त्र सेंटरचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव उपस्थित होते.

Monday, 14 December 2020

विद्यापीठ कायद्यात योग्य सुधारणांसाठी चांगल्या सूचनांचे स्वागत: डॉ. सुखदेव थोरात

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमासंदर्भात गठित उपसमितीच्या बैठकीस संबोधित करताना अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात.

शिवाजी विद्यापीठात विद्यापीठ कायदा मूल्यमापन समितीच्या दोनदिवसीय बैठकीस प्रारंभ


कोल्हापूर, दि. १४ डिसेंबर: केंद्राच्या नूतन शैक्षणिक धोरणानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक विद्यापीठे कायद्यामध्ये योग्य सुधारणा करण्यासाठी सर्व चांगल्या सूचनांचे स्वागत असून त्यातील अधिकाधिक सूचनांचा अंगिकार करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे ऑनलाईन संवाद साधताना दिली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम-२०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी डॉ. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मूल्यमापन समिती ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या उपसमितीच्या दोनदिवसीय बैठकांना आज सकाळी विद्यापीठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीने प्रारंभ झाला. त्यावेळी औपचारिक उद्घाटनपर संबोधन डॉ. थोरात यांनी केले.

डॉ. थोरात म्हणाले, सदर समितीकडे राज्य शासनाने अत्यंत जबाबदारीचे काम सोपविलेले आहे. आतापर्यंत समितीला सुमारे २५० विविध सूचना प्राप्त झाल्या आहेत. आणखीही सूचना विविध घटकांकडून येत्या दोन दिवसांत अपेक्षित आहेत. त्या लक्षात घेऊन त्यांचा सांगोपांग अभ्यास करण्याचे काम समितीला करावयाचे आहे. विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी सर्व संबंधित घटकांचे सदर कायद्याच्या अनुषंगाने गेल्या वर्षभरातील अनुभव, अडचणी विचारात घेऊन त्यांनी केलेल्या सूचनांवर विचारविनिमय करण्यात येईल. कायद्याच्या सर्वच घटकांचे पुनरावलोकन याअंतर्गत करावे लागणार आहे. त्या दृष्टीने या घटकांच्या लेखी सूचनांचा विचार करून त्यातील योग्य व चांगल्या सूचना विचारात घेऊन कायद्यात सुधारणा सुचविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुणे विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी संयोजन केले. या बैठकीस कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह समितीचे सदस्य मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, डॉ. राजन वेळूकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्रा, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ, विल्सन महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. टी.ए. शिवारे हे सदस्य उपस्थित होते. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अधिकारी, शिक्षकही यावेळी उपस्थित होते. दिवसभरात समिती सदस्यांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत संवाद साधला.

उद्या (दि. १५) विद्यार्थी संघटनांसमवेत चर्चा

सदर समिती उद्या (दि. १५ डिसेंबर) सकाळी ११ ते ११.३० या कालावधीत विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहे.  ज्या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींना उपस्थित राहावयाचे आहे, त्यांनी संघटनेच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना उपस्थित राहता येईल. तत्पूर्वी, संबंधित संघटनेस महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६मध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने काही सूचना असल्यास त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या वेबसाईटवर नोंदवाव्यात. तसेच, सदर सूचना लेखी स्वरुपात सदर बैठकीवेळी सभागृहात समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

Friday, 11 December 2020

डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वीकारला प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार

 

शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे त्यांच्या दालनात ग्रंथभेट देऊन स्वागत करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आपल्या कुटुंबियांच्या साक्षीने शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारला.



डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, त्यांचे कुटुंबिय आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, त्यांचे कुटुंबिय आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, त्यांचे कुटुंबिय आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, त्यांचे कुटुंबिय आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


अभिनंदनासाठी गर्दी टाळण्याचे प्र-कुलगुरूंचे आवाहन

कोल्हापूर, दि. ११ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे सातवे प्र-कुलगुरू म्हणून प्रा. डॉ. पी.एस. पाटील यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार कुटुंबियांच्या साक्षीने स्वीकारला.

आज सकाळी डॉ. पाटील यांनी प्रथेप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर डॉ. बापूजी साळुंखे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी सौ. शिल्पा पाटील आणि मुलगे अखिलेश व आर्यन होते. त्यांच्यासह त्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेश केला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी डॉ. पाटील यांचे त्यांच्या दालनात स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी ग्रंथभेट देऊन स्वागत केले. डॉ. पाटील हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्याने या प्रसंगी त्यांचे पदार्थविज्ञान व नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

दरम्यान, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर, अभिनंदनासाठी शिक्षक, विद्यार्थी, मान्यवर, नागरिकांनी विद्यापीठ कार्यालयात गर्दी करण्याचे टाळून शक्यतो दूरध्वनी, एसएमएस तसेच provc@unishivaji.ac.in या ई-मेलद्वारे आपल्या शुभेच्छा कळवाव्यात, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी केले आहे.

माजी कुलगुरू डॉ. के.बी. पवार यांच्या आठवणींचा गहिवर

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.बी. पवार यांचे जावई. विद्यापीठ प्रांगणातील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा हा डॉ. पवार यांच्या कारकीर्दीत सन १९८८मध्ये उभारण्यात आला. कर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना डॉ. पवार यांच्या आठवणीने डॉ. पाटील गहिवरले. सासऱ्यांच्या कारकीर्दीत साकारलेल्या पुतळ्यास अभिवादन करून जावयाने आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ करण्याचा योग यामुळे जुळून आला, अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

 

Thursday, 10 December 2020

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पी.एस. पाटील

 

शिवाजी विद्यापीठाचे नूतन प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे.



प्र-कुलगुरूपदी निवडीनंतर डॉ. पी.एस. पाटील यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)


डॉ. पाटील शिवाजी विद्यापीठाचेच विद्यार्थी


कोल्हापूर, दि. १० डिसेंबर
: येथील शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रमोद शंकरराव तथा पी.एस. पाटील यांची आज शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाकडून आज सायंकाळी ई-मेलद्वारे या नियुक्तीची माहिती विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाली. शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डॉ. पाटील हे विद्यापीठाचे सातवे प्र-कुलगुरू आहेत.

Dr. P.S. Patil
दुंडगे (ता. चंदगड) येथे दि. ९ जानेवारी १९६५ रोजी जन्मलेल्या डॉ. पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. तेथीलच विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञान विषयात बी.एस्सी. केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. व पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. पाटील हे विद्यापीठात सुमारे ३० वर्षे अध्यापन व संशोधन करीत आहेत. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रभारी संचालक म्हणून ते काम पाहताहेत. अमेरिकेतील स्टॅनफॉर्ड विद्यापीठातर्फे नुकतीच जगभरातील आघाडीच्या संशोधकांची जी क्रमवारी जाहीर केली, त्यामध्ये डॉ. पाटील हे अप्लाईड सायन्समध्ये देशातील पाचवे, तर जगातील ३९१ क्रमांकाचे आघाडीचे संशोधक ठरले आहेत. सन २०१८ मध्ये मटेरियल सायन्स विषयातील देशातील टॉप-१० संशोधकांमध्ये त्यांची गणना झाली. त्यांना आऊटस्टँडिंग रिसर्च फॅकल्टी पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुमारे ६ कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सुमारे ५०० आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित आहेत. जर्मनीमधील डॅड (DAAD) फेलोशीप आणि दक्षिण कोरियातील ब्रेनपूल फेलोशीप या प्रतिष्ठित फेलोशीप त्यांना मिळाल्या आहेत.

दरम्यान, आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठात ही बातमी समजताच कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. पी.एस. पाटील यांचे अभिनंदन व स्वागत केले.

दर्जेदार अध्ययन, अध्यापन प्रणाली व संशोधन विकासावर भर देणार

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदावर आपली निवड केल्याबद्दल आणि विश्वास दाखविल्याबद्दल कुलपती भगतसिंह कोश्यारी आणि कुलगुरू डॉ. डी.डी. शिर्के यांच्याप्रती डॉ. पी.एस. पाटील यांनी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण अध्ययन, अध्यापन प्रणाली आणि विशेषतः संशोधन विकासावर भर देण्याचा माझा प्रयत्न राहील. नजीकच्या काळात विद्यापीठ नॅक मानांकनाच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. त्या दृष्टीने संघबांधणी आणि क्षमता वर्धन या बाबींवर तातडीने भर देण्यात येईल. विद्यापीठाची एन.आय.आर.एफ., वर्ल्ड क्यू.एस. रँकिंग इत्यादी विविध मानांकनांच्या क्रमवारीत वृद्धी करण्यासाठीचे प्रयत्न येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील शिक्षक, संशोधकांसह सर्वच घटकांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Tuesday, 8 December 2020

संत जगनाडे महाराजांना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 


कोल्हापूर, दि. ८ डिसेंबर: संत संतुजी जगनाडे महाराज यांना आज जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अंतर्गत लेखापाल अजित चौगुले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.