Wednesday, 14 April 2021

बाबासाहेबांमुळे भारताची एकता, अखंडता अबाधित: डॉ. विजय खरे

 

शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलताना डॉ. विजय खरे. (डावीकडे) कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारताची एकता व अखंडता अबाधित ठेवण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील परराष्ट्र व संरक्षणविषयक कलमांद्वारे अत्यंत कुशलतेने केले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास अधिविभागाचे तसेच संरक्षण व रणनितिक अभ्यास अधिविभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय संरक्षणविषयक विचारया विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

Dr. Vijay Khare
डॉ. विजय खरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक विचारांकडे देशाने अत्यंत सजगपणाने पाहण्याची गरज आहे. भारताची एकता, अखंडता जपण्यासाठी, या देशाला कायम एकसंध राखण्यासाठी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ३५२, ३५६ आणि ३०७ या तीन कलमांची केलेली योजना फार बहुमोल स्वरुपाची आहे. एखाद्या राष्ट्राने लष्करी कारवाई केल्यास ३५२ कलमाच्या आधारे राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. एखाद्या वेळी काही कारणांनी देश आर्थिक संकटात सापडल्यास ३०७ कलमाच्या आधारे राष्ट्रपती राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात. यातील कलम ३५६ हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. एखादा समूह, एखादी चळवळ अति आक्रमक होऊन देशाच्या एकता व अखंडतेला धोका निर्माण करीत असेल, तर अशा वेळी राष्ट्रपती तेथे आणीबाणी जाहीर करू शकतात. खलिस्तान चळवळ, काश्मीरमधील अस्वस्थ वातावरण, ईशान्येकडील राज्यांतील अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या चळवळी अशा प्रसंगी या कलमाचा वापर करण्यात आला आणि त्या दर खेपी भारताची अखंडता अबाधित राहिली. शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित झाली. घटना समितीमध्ये या कलमाच्या अनुषंगाने सुमारे अडीच दिवस चर्चा चाललेली होती. या प्रसंगी बोलताना बाबासाहेबांनी, घरात आपण इमर्जन्सीसाठी म्हणून जशा काही वस्तू आणून ठेवतो, तशा प्रकारचे हे कलम असल्याचे सांगितले. ते सारखे वापरून बोथट करू नये. सारासार विवेकाच्या आधारेच त्याच्या वापराविषयी निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही सांगून ठेवले. त्यामुळेच आजतागायत देशाची अखंडता टिकून राहिली आहे, याचे खरे श्रेय बाबासाहेबांचे आहे.

डॉ. खरे पुढे म्हणाले, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा ही राजकीय, सामाजिक व आर्थिक बाजूंनी सर्वसमावेशक असली पाहिजे, याची जाणीव बाबासाहेबांना होती. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक इशारे देऊन ठेवले आहेत. पाकिस्तानविरुद्धचा संघर्ष हा केवळ भूमीचा नाही, तर तो अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असा आहे. त्यामुळे जोवर हा प्रश्न सुटणार नाही, तोवर भारताच्या बाह्य सुरक्षेला स्थैर्य लाभणार नाही, असे त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये सांगून ठेवले आहे. चीनच्या संदर्भातही आपल्याकडे ठोस दूरगामी परराष्ट्र धोरण आजही नाही. चीन, पाकिस्तानसारखी उपद्रवी राष्ट्रे शेजारी असल्याने असे धोरण नसणे धोक्याचे ठरते. विकास आणि सुरक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने त्यासंदर्भात भारताने काणाडोळा करणे योग्य नाही. लोकशाहीवादी राष्ट्रांशी समन्वय राखण्याबाबत बाबासाहेबांनी आवाहन केले होते. त्यानुसार भारताने योग्य दिशेने वाटचाल केलेली आहे.

एक मत, एक मूल्य, एक नागरिकत्व, एक प्रशासकीय व्यवस्था, एक न्यायव्यवस्था ही बाबासाहेबांनी या देशाला दिलेली प्रचंड मोठी देणगी आहे. तसेच, गावकुसाबाहेरील समाज बाबासाहेबांमुळे देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन प्रगतीमध्ये आपला वाटा उचलू लागला, ही त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून घडवून आणलेली रक्तविहीन क्रांती आहे, असे गौरवोद्गारही डॉ. खरे यांनी यावेळी काढले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या देशाला असलेल्या परराष्ट्र धोरण व संरक्षणविषयक पैलूंचा अधिकार वाणीने डॉ. विजय खरे यांनी परिचय करून दिला. या माध्यमातून देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेमध्ये बाबासाहेबांचे योगदान अधोरेखित झाले. त्याच्याशी राज्यघटनेचा संबंध, अन्वय यांचाही त्यांनी घेतलेला वेध अत्यंत माहितीपूर्ण व ज्ञानवर्धक स्वरुपाचा आहे. या विषयाचा सविस्तर अभ्यास करण्याकरिता शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने एक विशेष प्रकल्प हाती घेईल आणि बाबासाहेबांचा हा अद्याप फारसा झोतात नसलेला पैलू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेल, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी परिचय करून दिला. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.व्ही. गुरव, प्राचार्य हरिष भालेराव, डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. एन.बी. गायकवाड, डॉ. रविंद्र श्रावस्ती, डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. अमोल मिणचेकर यांच्यासह अनेक मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता एसएस. महाजन, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील.


कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कोविड-१९विषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात आला.


Sunday, 11 April 2021

महात्मा फुले यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. तृप्ती करेकट्टी आणि डॉ. एस.एस. महाजन. 

 

कोल्हापूर, दि. ११ एप्रिल: शिवाजी विद्यापीठात आज महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

आज सकाळी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. या प्रसंगी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह इंग्रजी अधिविभागाच्या प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. ए.एम. सरवदे, दीपक भादले, डॉ. उपरे आदी उपस्थित होते. कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून हा कार्यक्रम करण्यात आला.

Tuesday, 6 April 2021

दलाई लामा फेलोशीपसाठी डॉ. सुबोध प्रभू यांची निवड

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्सचे अॅडजंक्ट प्रोफेसर

डॉ. सुबोध प्रभू यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. विजय फुलारी आदी.


कोल्हापूर, दि. ६ एप्रिल: शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स व तंत्रज्ञान अधिविभागात अॅडजंक्ट प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंदू शास्त्रज्ञ डॉ. सुबोध (शिवदत्त) प्रभू यांची प्रतिष्ठेच्या 'दि दलाई लामा फेलो म्हणून निवड झाली आहे.

न्यूरोलॉजिकल को-रिलेट्स ऑफ बुद्धिस्ट फिलॉसॉफी या विषयावरील शास्त्रीय शोधप्रबंध ते वर्षभरात सादर करतील. त्याचप्रमाणे या विषयावर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ व तत्वज्ञांच्या समूहासमोर दोन सेमिनारही देतील.

डॉ. प्रभू यांना प्राप्त झालेल्या या फेलोशीपबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या रकमेतून दरवर्षी आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी एका संशोधकाची फेलो म्हणून निवड केली जाते. यासाठी जगभरातून प्रस्ताव सादर करण्यात येत असतात.

कोल्हापुरातील ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांचे सहकारी म्हणून दशकाहून अधिक काळ  रुग्णसेवा केल्यानंतर डॉ. सुबोध प्रभू यांनी फ्रान्समध्ये ग्रेनोबल येथे औषधांना दाद न देणाऱ्या आणि मेंदू शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या फिट्स यांवर डी.बी.एस. या नाविन्यपूर्ण उपचार पद्धतीबाबत सहा वर्षे संशोधन केले. यासाठी त्यांना फेडरेशन ऑफ युरोपियन न्यूरो सायन्स सोसायटीज् (फॅन्स) यांची वैयक्तिक ग्रँट मिळाली होती.

भारतात परतल्यावर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी बिहेविअरल इकॉनॉमिक्स विषयाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम सुरू केले. तसेच फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्रेनोबल येथील ब्रेनटेक संस्थेत ट्रान्सलेशनल थेरपीज् विषयातील संशोधक विद्यार्थ्यांचे सह-मार्गदर्शक म्हणूनही ते काम पाहतात.

ज्ञानाचा उपयोग वंचितांच्या उत्थानासाठी करा: प्रा. अनिल सहस्रबुद्धे

शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वार्षिक दीक्षान्त समारंभास सात हजार जणांची ऑनलाईन उपस्थिती

 

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात स्नातकांना ऑनलाईन संबोधित करताना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे.

शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या दीक्षान्त समारंभात विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. पी.आर. शेवाळे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन आणि डॉ. मेघा गुळवणी.

शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या दीक्षान्त मिरवणुकीचे नेतृत्व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांनी ज्ञानदंड घेऊन केले. मिरवणुकीत सहभागी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.

शिवाजी विद्यापीठाची ५७वी दीक्षान्त मिरवणूक परीक्षा संचालक जी.आर. पळसे यांच्या नेतृत्वाखाली कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर योग्य शारीरिक अंतर राखून काढण्यात आली. यामध्ये कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह अधिष्ठाता सहभागी झाले.  


(शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या ऑनलाईन वार्षिक दीक्षान्त समारंभाची संपूर्ण चित्रफीत.)



कोल्हापूर, दि. ६ एप्रिल: नवपदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील वंचित, शोषित घटकांच्या उत्थानासाठी करावा, असे आवाहन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे चेअरमन प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते.

कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते, तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचा सुमारे सात हजार नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात ७७,५४२ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्रे व पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आल्या.

प्रा. सहस्रबुद्धे नवपदवीधरांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आज आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस आणि आयुष्याच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तीव्र स्पर्धेला सामोरे जात आपण या गौरवशाली परंपरेच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला आणि आपले शैक्षणिक कार्य मोठ्या तन्मयतेने साध्य करण्याचा प्रयत्न केला. कठोर परिश्रम आणि उच्च कोटीची समर्पण वृत्ती या जोरावर आपण आपली पदवी आणि पुरस्कार प्राप्त केले आहेत. हा आपणासह आपले आयुष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलणारे आपले शिक्षक, पालक अशा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. या विद्यापीठात आपण आपल्या उच्चशिक्षणाची सुरवात मोठ्या जोमाने व उत्कटतेने केली; पण मला खात्री आहे की, हा आपला प्रवास इथेच थांबणार नाही. जोपर्यंत आपल्या जीवनाच्या प्रयोगशाळेतील अनिश्चितता, आव्हानांची पूर्तता, सकारात्मक वृत्तीने यश मिळविण्याची धमक आणि अपयशाला सामोरे जाण्याचा पूर्ण आत्मविश्वास आपल्यात निर्माण होत नाही, तोवर हा प्रवास संपत नाही. बर्‍याचदा व्यवस्थापन गुरु आणि अर्थशास्त्रज्ञ हे व्हीयूसीए (VUCA-volatile, uncertain, complex and ambiguous) अर्थात अस्थिर, अनिश्चित, जटिल आणि संदिग्ध अशा जगाबद्दल आपल्याला सांगत असतात. तथापि, मी मात्र आपणास अगदी याच्या उलट म्हणजेच एसीयूव्ही (ACUV- Dedicates Action & Positive attitude, Collaboration & co-operation, Unity & untiring efforts and emerge Victorious) अर्थात समर्पित कृती व सकारात्मक दृष्टिकोन, सहकार्य व साहचर्य आणि ऐक्य व अथक परिश्रम या त्रिसूत्रीच्या बळावर अविरत प्रयत्नांच्या साथीने अस्थिरतेवर मात करून विजयी वीर म्हणून आपला ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. सहस्रबुद्धे यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, एकीकडे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य आणि दुसरीकडे आत्मनिर्भर भारत घडविण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने समोर ठेवले असतानाच्या अगदी योग्य वेळी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेले आहे. त्यायोगे दर्जेदार शैक्षणिक संस्थांची निर्मिती,  नाविन्यपूर्ण संस्कृती आणि अत्यंत कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचीही ही योग्य वेळ आहे. तथापि, संस्थांना स्वायत्तता देणारी एक मजबूत व्यवस्था निर्माण करणे आणि त्या संस्थांना वित्तपुरवठा करणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम या बाबींना प्रेरणा देणे आणि नवोन्मेषी तंत्रज्ञानाची माहिती सर्वदूर पसरविणे या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे एकमेकांशी सहकार्य करतील आणि समाजाच्या समस्या सोडविण्यास हातभार लावतील, अशी अपेक्षा यामध्ये अनुस्यूत आहे. आगामी १५ वर्षांत आपल्याला उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रवेशाचे प्रमाण (जीईआर) ५० टक्क्यांच्या पुढे घेऊन जावयाचे आहे, जगातील आघाडीच्या शंभर शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत भारतातल्या किमान दहा संस्थांना स्थान प्राप्त करावयाचे आहे आणि त्या बळावर भारताला एक सक्षम, विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित करावयाचे आहे, याची जाणीव बाळगून त्या दिशेने सक्रिय भूमिका बजावण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना भारताच्या इतिहास आणि संस्कृतीचा सखोल परिचय करून देईल आणि त्यांना जागतिक नागरिकांमध्ये रूपांतरित करेल. हे धोरण मानवी समस्यांसाठी एकात्मिक सर्वसमावेशक संशोधन समाधानास प्रोत्साहन देईल. त्यासाठी या धोरणाची सुयोग्य अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण देशाला आपल्या तरुण लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी (डेमोग्राफिक डिव्हिडंड) सक्षम करेल आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये (एसडीजी 2030) साध्य करण्यासाठीही प्रेरित करेल. नॅशनल रिसर्च फाऊंडेशनच्या स्थापनेमुळे संशोधनाची गुणवत्ता वाढेल. शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्याधुनिक संशोधनात अत्यंत सक्रिय आहे. आता या स्पर्धात्मक वातावरणात संशोधनासाठी वित्तपुरवठा प्राप्त करण्याची आपणास अधिक संधी असेल, असेही त्यांनी सांगितले.

शासन विद्यापीठासमवेत: मंत्री उदय सामंत

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
महाराष्ट्र शासन विद्यार्थी हिताच्या उपक्रमांसाठी सदैव शिवाजी विद्यापीठासमवेत असल्याचे सांगून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. शिवाजी विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रालगतच्या सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी प्रयत्न चालविले आहेत. अलिकडेच विद्यापीठातर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने मोठा पुढाकार घेतला, ही अभिनंदनीय बाब आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ साथीच्या काळात पोलीस मित्र, आरोग्य मित्र अशा अनेक भूमिकांतून काम केले आणि आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले, ही बाब कौतुकास्पद आहे. शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमांना महाराष्ट्र शासनाचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही या प्रसंगी त्यांनी दिली.
रत्नागिरी या आपल्या विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे पाठविला आहे. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तो मंजूर करावा, अशी आग्रहाची मागणी त्यांनी प्रा. सहस्रबुद्धे यांच्याकडे या प्रसंगी केली.

ही पदवी पहिली ठरावी; अंतिम नव्हे: कुलपती भगतसिंह कोश्यारी

कुलपती भगतसिंह कोश्यारी
शिवाजी विद्यापीठाचे ७७,५४२ स्नातक आज पदवी घेऊन बाहेर पडताहेत. मात्र, त्यांच्यासाठी ही पदवी पहिली ठरावी, अंतिम नव्हे! कारण शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे आणि विद्यार्थ्यांनी संधी मिळेल तितके उच्चशिक्षण घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रसंगी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिक्षणाच्या पुढची पायरी म्हणजे विद्या अगर ज्ञान संपादन ही असते. ज्ञानमेवामृतम् हे शिवाजी विद्यापीठाचे ब्रीद आहे. याचा अर्थ ज्ञान मनुष्याला अमर बनविते. ही मोठी बाब आहे. या ज्ञानाचा वापर आपण आपल्या भोवतालाचे कल्याण करण्यासाठी करणे आवश्यक आहे. मानवासह समस्त प्राणिमात्र, निसर्ग आणि पर्यावरण यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांनी आपले जीवन समर्पित करावे. सध्या आपण सारे प्रांतवाद आणि जातिभेदाने घेरले जातो आहोत. आपण स्वतःला एक मानव अगर भारतीय म्हणून का मानत नाही,  हा मोठा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांची आपण नावे घेतो, मात्र त्यांचे विचार अंमलात आणत नाही, हे खेदजनक आहे. आत्मनिर्भरतेची सुरवात ही स्वतःपासून करायला हवी आणि त्यामध्ये या साऱ्या पर्यावरणाचा विचार असायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, खूप काम करावे. आज अनेक साधने उपलब्ध आहेत, त्या साधनांचा देशहितासाठी सुयोग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. आपण केवळ आधुनिकच नव्हे, तर अत्याधुनिक बाबतीतही अग्रणी असायला हवे. त्यायोगे आपले योगदान सर्वोत्तम असण्याच्या बाबतीत आग्रही राहावे. अशा चांगल्या कामातून आनंद मिळवावा, असे आवाहनही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले. कोविड-१९चे संकट पुन्हा आपल्यासमोर ठाकले आहे. यावेळीही सर्व घटकांनी एकजुटीने आणि दुप्पट जोमाने त्याला हद्दपार करण्यासाठी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणाचे जीवनाशी अभिन्नत्व: कुलगुरू डॉ. शिर्के

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. अहवाल सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांना आवाहन करताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिक्षण हे जीवनापासून विभक्त करता येऊ शकत नाही. शिक्षणाशी जीवनाचे हे अभिन्नत्व आणि एकजिनसीपण आपण साऱ्यांनी समजून घ्यावे. शिक्षणाचे उपयोजन जीवनात आपण कशा पद्धतीने करता यावर आपला भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली अंगभूत कौशल्ये, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या बळावर जगातील जवळजवळ सर्व देशांत शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी प्रशंसनीय कामगिरी करीत आहेत. विद्यापीठाच्या लौकिकात नवपदवीधारक विद्यार्थ्यांनीही मोलाची भर घालून विद्यापीठाचा लौकिक उंचावावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रथेप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षान्त मिरवणूक निघाली. यावेळी ती कुलगुरू कार्यालयापासून समारंभ स्थळापर्यंत म्हणजे राजर्षी शाहू सिनेट सभागृहापर्यंत काढण्यात आली. त्यामध्ये कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता सहभागी झाले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांनी पदव्यांचे वाचन केले. डॉ. टी.के. करेकट्टी, धैर्यशील यादव आणि नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनीने पसायदान व राष्ट्रगीत सादर केले. यावेळी व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.आर. शेवाळे, आंतरविद्याशाखा विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी उपस्थित होते.

 

नॅकचे ++’ मानांकन प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांकडून अभिनंदन

शिवाजी विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या नॅकच्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ++’ मानांकन मिळविल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये विद्यापीठाबद्दल गौरवोद्गार काढले. विद्यापीठाने शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय दर्जा सिद्ध करण्याबरोबरच विद्यार्थीप्रियता, सामाजिक बांधिलकी या निकषांवर देश पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, याचा अभिमान असल्याचे कौतुकोद्गार राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्यासह मंत्री उदय सामंत आणि प्रा. सहस्रबुद्धे यांनी काढले.

 

सुमारे सात हजार जणांची लाइव्ह उपस्थिती

यंदा कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठाने ५७वा दीक्षान्त समारंभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचे ठरविले. त्यानुसार आज हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीवरुन थेट प्रक्षेपित करण्यात आला. ६९०६ नागरिकांनी हा कार्यक्रम लाइव्ह पाहिला. त्यानंतरही दिवसभरात सवडीनुसार लोक हा कार्यक्रम पाहात असल्याने आकडा वाढताच राहिला.

Thursday, 1 April 2021

शिवाजी विद्यापीठ ‘अ++’ मिळविणारे देशातील अवघे दुसरे राज्य विद्यापीठ

राष्ट्रीय स्तरावर केवळ सात संस्था ‘अ++’ मानांकित

 



कोल्हापूर, दि. १ एप्रिल: नॅक (बंगळुरू) यांचेकडून सन २०१८पासून आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर केवळ सात संस्थांना ++’ मानांकन प्राप्त झाले असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे असे मानांकन मिळविणारे शिवाजी विद्यापीठ अवघे दुसरे राज्य अकृषी विद्यापीठ ठरले आहे. ही माहिती शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख यांनी दिली आहे.

डॉ. कामत व देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषद (नॅक) यांचेकडून प्राप्त झालेल्या यादीमध्ये सन २०१८पासून ++’ मानांकन मिळविणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर केवळ सात उच्चशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये अवघी दोन राज्य विद्यापीठे आहेत. तमिळनाडूमधील मदुराई कामराज विद्यापीठ आणि येथील शिवाजी विद्यापीठ अशा दोन विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. यातील मदुराई कामराज विद्यापीठाचे सीजीपीए गुणांकन ३.५४ इतके आहे, तर शिवाजी विद्यापीठाचे ३.५२ इतके आहे. उर्वरित पाचांत बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.) ही एकमेव केंद्रीय संस्था आहे, तर बनस्थळी विद्यापीठ (राजस्थान), रामकृष्ण मिशन विवेकानंद एज्युकेशनल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (पश्चिम बंगाल), कोनेरु लक्ष्मैय्या एज्युकेशन फाऊंडेशन (आंध्र प्रदेश) आणि एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (चेन्नई, तमिळनाडू) या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी दर्जाच्या शैक्षणिक संस्था आहेत.

गुणवत्तेचा चढता क्रम

शिवाजी विद्यापीठाने नॅकच्या चार फेऱ्यांना सामोरे जात असताना सातत्याने आपली गुणवत्ता उंचावत नेल्याचे दिसून येते. सन २००४मध्ये शिवाजी विद्यापीठ पहिल्यांदा नॅकच्या मूल्यांकनास सामोरे गेले, त्यावेळी विद्यापीठास ७७.७५ गुणांकनासह +’ मानांकन प्राप्त झाले. सन २००९ साली २.८५ (ऑन द स्केल ऑफ ४) सीजीपीए गुणांकनासह मानांकन प्राप्त केले. यावेळी तोपर्यंत प्रचलित असलेले सी पासून ते ++’  हे नाईन पॉइंट स्केल बदलून फक्त , बी, सी अशा तीन पॉईंटची स्केल करण्यात आली. सीजीपीए म्हणजे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट एव्हरेज ही प्रणाली गुणांकनासाठी वापरण्यास सुरवात झाली. सन २०१४मध्ये ३.१६ सीजीपीए गुणांकनासह मानांकन प्राप्त केले, तर यंदा अधिक चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करीत ३.५२ गुणांकनासह ++’ मानांकन प्राप्त केले आहे, अशी माहितीही डॉ. कामत यांनी दिली.

Wednesday, 31 March 2021

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात उगवला सुवर्णदिन

३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘नॅक’चे ‘अ++’ मानांकन

शिवाजी विद्यापीठास 'नॅक'चे 'अ++' मानांकन जाहीर झाल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मनोभावे अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्रा. आर.के. कामत, प्रा. एम.एस. देशमुख, प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, प्राचार्य डी.जी. कणसे, प्राचार्य व्ही.एम. पाटील, प्राचार्य मंगलकुमार पाटील, प्रा. व्ही.एस. मन्ने आदी.


कोल्हापूर, दि. ३१ मार्च: ‘नॅक (बंगळुरू)च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ++’ मानांकन प्राप्त करून सुवर्णाक्षरांत नोंदवावी, अशी कामगिरी केली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकन फेरीअंतर्गत नॅक पिअर टीमने १५ ते १७ मार्च २०२१ या कालावधीत शिवाजी विद्यापीठास भेट दिली. नॅकच्या बदललेल्या नव्या निकषांतर्गत गुणांकन करण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील दुसरे विद्यापीठ आहे. यामध्ये विद्यापीठाने नॅकला सादर केलेल्या स्वयं मूल्यनिर्धारण अहवालाचे (एसएसआर) सात निकषांवर सुमारे ७०० गुणांचे मूल्यांकन केले जाते. उर्वरित ३०० गुणांचे मूल्यांकन पिअर टीममार्फत करण्यात येते. सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम व वेगळे उपक्रम यांचा समावेश असतो. यामध्ये अभ्यासक्रम, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती आणि उत्तम उपक्रम यामध्ये शिवाजी विद्यापीठाने चमकदार कामगिरी केली आहे. प्रशासनाच्या संदर्भात तर शिवाजी विद्यापीठाची एक स्वतःची अशी परंपरा आहे. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवारांपासून सर्वच कुलगुरूंनी त्याकामी योगदान दिलेले आहे. विशेषतः डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या काळात नॅक सुरू झाले, तेव्हा त्यांनी या अनुषंगाने उपयुक्त अशी पायाभरणी करण्याचे काम केले. त्यामुळे अवघ्या चारच फेऱ्यांत शिवाजी विद्यापीठाने पासून ते ++’पर्यंतचा प्रवास केला आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेषतः नॅक पिअर टीमने त्यांच्या एक्झिट मिटींगमध्ये शिवाजी विद्यापीठामधील एकजुटीने आणि एकदिलाने काम करण्याच्या प्रवृत्तीचे खुल्या मनाने कौतुक केले, असे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नॅकचे अ++ मानांकन प्राप्त झाल्यामुळे आपले संशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांना अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहेत. संलग्नित महाविद्यालयांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ परिक्षेत्रातच नव्हे, तर देशभरातील विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काम करणाऱ्या सर्वांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. मिळालेले यश टिकविणे आणि वृद्धिंगत करणे ही आता आमची जबाबदारी आहे, याची जाणीव आम्हाला आहे. विद्यापीठाच्या या यशामध्ये आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी व सेवक, संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठावर प्रेम करणारे समाजातील सर्व स्तरांतील घटक या सर्वांचा बहुमोल स्वरुपाचा वाटा आहे. यापुढील काळातही सर्वांकडून असेच सहकार्य लाभत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख उपस्थित होते. प्रा. आर.के. कामत यांनी नॅकच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.

नॅकची बातमी कळताच महाराजांना अभिवादन

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजी विद्यापीठास नॅकचे अ++ मानांकन मिळाल्याची वार्ता समजताच कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले आणि कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विविध बैठकांच्या निमित्ताने विद्यापीठात आलेले व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभेचे सदस्य, प्राचार्य आणि शिक्षक यांनीही तेथे कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. विविध अधिविभागांचे प्रमुख व शिक्षकांनीही कुलगुरूंसह सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कुलगुरूंनी त्यानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रत्येक विभागात जाऊन नॅकसाठी परिश्रम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले. सायंकाळच्या सत्रात काही अधिविभागांनाही त्यांनी भेटी देऊन शिक्षकांचे अभिनंदन केले.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटी टाळण्याचे आवाहन

शिवाजी विद्यापीठास प्राप्त नॅकच्या उच्च मानांकनामुळे सर्वच घटकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. तथापि, सध्या महाराष्ट्रासह देशात कोविड-१९ची लाट पुन्हा उसळते आहे. या पार्श्वभूमीवर, मान्यवरांनी तसेच नागरिकांनी दूरध्वनी, ई-मेलद्वारे अभिनंदन करावे. प्रत्यक्ष भेटूनच अभिनंदन करण्याची जोखीम टाळावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी केले आहे.