Wednesday, 22 September 2021

विद्यापीठाच्या ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ विषयावरील व्याख्यानमालेस प्रारंभ

हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावध होणे गरजेचे: डॉ. अनिल कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठाच्या हवामान बदलविषयक व्याख्यानमालेत सहभागी झालेले (clockwise) डॉ. सचिन पन्हाळकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


 

कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपणास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मानवाने हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावधगिरीची पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.) चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलीटी स्टडिज्मार्फत हवामान बदल व शाश्वत विकासया विषयावरील व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सदर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना तापमानवाढ व जलस्रोतांवर होणारा परिणामया विषयावर डॉ. कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, हिमालयामध्ये अनेक पर्वतरांगा आहेत, ज्यात शिवालिक, पीर पंजाल, ग्रेट हिमालय, काराकोरम अशा पर्वत रांगांचा समावेश होतो. पैकी दक्षिणेकडील शिवालिक पर्वत रांग वगळता इतर पर्वत रांगांमध्ये प्रामुख्याने बर्फ आढळतो. उत्तर भारतात सिंधु, गंगा व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांची खोरी आहेत. हवामान बदलामुळे या नद्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. १९६० पर्यंत भारताच्या इतर भागाशी तुलना करता हिमालयीन क्षेत्र थंड होते. पण जसा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव वाढत गेला तसे हिमालयीन क्षेत्रामधील तापमान वाढत गेल्याचे दिसून येते. या वाढत्या तापमानामुळे पर्वत रांगांमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. जवळपास उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतू बदलानुसार तेथील भूपृष्ठात ७५% बदल दिसून येतो. वितळलेल्या बर्फामुळे सिंधु खोऱ्यात ७०% पाणी पुरवठा होतो. गंगा नदी खोऱ्यात त्याचे प्रमाण केवळ १०-१५% असून ब्रह्मपुत्रा खोऱ्यात ते त्यापेक्षा कमी होते.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, कमी उंचीवरील बर्फ हा जास्त उंचीवरील हिमनगांपेक्षा हवामान बदलाला अधिक प्रतिसाद देतो. परिणामी, पर्वत रांगांच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकवस्तीची जीवनशैली असुरक्षित होते. ती असुरक्षितता मोजण्याची आणि त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सर्वच क्षेत्रांनी संयुक्तपणे घेण्याची गरज आहे. विविध सांख्यिकीय आकडेवारीच्या आधारे त्यांनी सतलज, रावी, बियास, अलकनंदा, चंद्रा, भागीरथी या नद्यांच्या खोऱ्यात गेल्या १२ वर्षांत झालेला बदल दर्शविला. ढगफुटी, हिमस्खलन, भूस्खलन, फ्लॅश फ्लड अशी अनेक आव्हाने तेथील लोक समुदायासमोर आहेत. हिमनदी तलावांची निर्मिती व त्याचा बेड रॉकवर पडलेला दबाव यामुळे फ्लॅश फ्लडचा धोका अधिक वाढतो. हा धोका टाळणे शक्य आहे, पण त्यासाठी मॉडेलिंग टेक्निक वापरून फ्लो पाथ, व्हेलोसिटी, धोक्याची तीव्रता, हिमनदी तलावांचे स्थान व भविष्यातील त्याचा विस्तार या गोष्टींकडे नवीन अभ्यासकांनी लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नुकत्याच केलेल्या पोटॅन्शियल ग्लॅशियर रिट्रीट: स्पिती व्हॅलीया अभ्यासानुसार त्यांनी  सिंधु खोऱ्यातील स्पिती व्हॅली भागात भविष्यात २०५० पर्यंत जवळपास ६०%, तर २०७० पर्यंत ६६% बर्फ वितळण्याची शक्यताही व्यक्त केली. इतर ऋतूंमधील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी लडाखमध्ये  ‘ICE STUPAS’ (बर्फाचे स्तूप) निर्माण करून ७.५ कोटी लिटर पाण्याचे संवर्धन केले आहे. इतर भागांसाठी हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी अधिक वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, हवामान बदलांचे दुष्परिणाम सार्वत्रिक आहेत. मानवी समुदायाबरोबरच पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होतो आहे. या दुष्परिणामांना अटकाव करण्यासाठी संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन व उपाययोजना करण्याची गरज आहे. या विषयाच्या अध्ययनाकडे विद्यार्थी तसेच शिक्षकांनी लक्ष देणे आवश्यक असून सदर मॉडेलिंग टेक्निकचा समावेश अभ्यासक्रमात करण्याची गरज असल्याचे सांगितले.  

या ऑनलाईन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध विद्यापीठांतील अभ्यासक, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व साधन व्यक्तींचा परिचय केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी करून दिला. सदरच्या व्याख्यानासाठी डॉ. प्रशांत पाटील, सुधीर पोवार व अभिजीत पाटील यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

 

समाजसेवा हेच शासकीय सेवेचे उद्दिष्ट: विकास खारगे

 

 

श्री. विकास खारगे


कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: समाजसेवा हेच शासकीय सेवेचे प्रथम व अंतिम उद्दिष्ट असते; असले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव विकास खारगे यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल (दि. २१) ऑनलाईन पध्द्तीने 'स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी' या चार दिवसी ऑनलाईन व्याख्यानमालेस सुरूवात झाली. त्यावेळी श्री. खारगे बोलत होते. व्याख्यानमालेचे द्घाटन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. खारगे म्हणाले, स्पर्धा परीक्षांच्या तयारीची सुरूवात शालेय जीवनापासूनच करावी लागते. शासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी मुळातूनच आवड असणे गरजेचे आहे. परीक्षेची तयार करताना यश-अपयशाचा विचार करता स्वयंअध्ययनावर भर द्यावा. चांगलया लेखकांची पुस्तके वाचावीत. या काळा विद्यार्थ्यांना कुटुंबीयांकडून मानसिक आधाराची गरज महत्वाची असते.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना विविध परीक्षांची तयारी करावी लागते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पूर्ण यश मिळविण्यासाठी अविश्रांत प्रयत्न केले पाहिजे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये वावरताना शिवाजी विद्यापीठाचे विविध उपक्रम राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारायला हवेत. त्याचा लाभ सर्वदूर पसरलेल्या विद्यार्थी वर्गाला व्हायला हवा. उत्तम नियोजन आणि ठोर परिश्रमाने विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्राचे समन्वयक डॉ.पी.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर अजय कुंभार यांनी आभार मानले.



शिवाजी विद्यापीठाची मुख्य अभ्यासिका, स्टडी सेंटर विद्यार्थ्यांसाठी खुले

५० टक्के प्रवेश; दोन्ही लसी घेऊन १४ दिवस झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक

 



कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे मुख्य अभ्यासिका व स्टडी सेंटर अभ्यासिका आज, बुधवार, दि. २२ सप्टेंबरपासून ५० टक्के उपस्थिती व शासनाच्या कोविडविषयक नियमावलीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात येत आहेत, असे संचालक डॉ. नमिता खोत यांनी कळविले आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत अशा कार्यालयीन वेळेत अभ्यासिका खुल्या राहतील.

शासनाचे नियम / जिल्हा प्रशासन / विद्यापीठ प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या कोविड-१९ बाबतच्या आदेशांचे पालन करणे संबंधित विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. अभ्यासिकेत बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण होऊन चौदा दिवस झाल्याची खातरजमा करण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्षातील २०२०-२१ या वर्षातील प्रवेशित पदव्युत्तर विद्यार्थी, एम.फिल., पीएच.डी. व संशोधक विद्यार्थ्यांकडे ज्ञानस्रोत केंद्राचे /स्टडी सेंटर विभागाचे चालू वर्षीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मुख्य अभ्यासिका व स्टडी सेंटर अभ्यासिकेची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत असेल. तसेच, कार्यालयीन सुट्टीदिवशी, प्रत्येक रविवारी, दुसरा व चौथा शनिवार दोन्ही अभ्यासिका पूर्णपणे बंद राहतील. महाराष्ट्र शासन/ जिल्हा प्रशासन/विद्यापीठ प्रशासन नियमानुसार पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच मुख्य अभ्यासिकेत प्रवेश दिला जाईल. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांनी योग्य शारीरिक सुरक्षित अंतराबाबतचे (फिजिकल डिस्टन्स) नियम पाळून बसावे, असे आवाहनही संचालक डॉ. खोत यांनी केले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात उत्साहात

 



शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह अन्य अधिकारी व शिक्षक.


कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: थोर समाजसुधारक व शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते कर्मवीर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही पुष्प वाहून अभिवादन केले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह उपकुलसचिव डॉ. विलास शिंदे, विलास सोयम, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. संभाजी शिंदे, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. मीना पोतदार, डॉ. एम.टी. गोफणे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, 21 September 2021

सैद्धांतिक मांडणीबरोबरच सामाजिक चळवळींतील

डॉ. गेल ऑम्वेट यांचे कृतीशील योगदान मौलिक

शिवाजी विद्यापीठात मान्यवरांकडून आदरांजली

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित डॉ. गेल ऑम्वेट आदरांजली सभेत बोलताना डॉ. भारत पाटणकर. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. राजन गवस, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


शिवाजी विद्यापीठात आयोजित डॉ. गेल ऑम्वेट आदरांजली सभेत डॉ. ऑम्वेट यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,डॉ. राजन गवस, डॉ. भारत पाटणकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.

 

कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर: डॉ. गेल ऑम्वेट यांनी समाजशास्त्रीय संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची सैद्धांतिक, चिकित्सक मांडणी करण्याबरोबरच सामाजिक चळवळीत दिलेले कृतीशील योगदान मौलिक स्वरुपाचे आहे. त्यांचे हे कार्य समकालीन सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकास मार्गदर्शक आहे. डॉ. ऑम्वेट यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालविणे आवश्यक आहे, असे मत आज शिवाजी विद्यापीठात आयोजित डॉ.गेल ऑम्वेट आदरांजली सभेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 'डॉ.गेल ऑम्वेट: सैध्दांतिक आकलन व योगदान' या विषयावर सदर सभा आयोजित करण्यात आली. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते; तर, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर प्रमुख उपस्थित होते.

Dr. Bharat Patankar
यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, गेल ऑम्वेट या कोणत्याही अवांतर अभिनिवेशाविना भारतीय ग्रामीण समाजजीवनाशी निष्ठेने आणि मनापासून एकजीव झाल्या. मूळच्याच हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याने त्यांच्या सामाजिक संशोधनाला स्वाभाविक अधिष्ठान प्राप्त झाले. थेट तळागाळापर्यंत जाऊन चळवळीचा अभ्यास व संशोधन करण्याची त्यांची विशिष्ट शैली होती. त्यातून त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र संशोधन पद्धती विकसित झाली. त्याद्वारे सिद्ध होणारे संशोधनही दर्जेदार स्वरूपाचे होते.  चळवळीचा पिंड कायम ठेवून तिचे सिद्धांतन करण्याचे कौशल्य त्यांना साधले होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने जाऊन बहुविद्याशाखीय सामाजिक संशोधन करण्याची हातोटी त्यांनी आत्मसात केली होती. मानवी अस्तित्वासंबंधाने नवे सिद्धांत उभे करणे, आणि पूर्णत: मानुष होणे हे त्यांचे जीवनध्येय होते.

Dr. Rajan Gavas
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस म्हणाले, डॉ. गेल ऑम्वेट या उत्तम संशोधक, सामाजिक कार्यकर्त्या होत्या, हे तर खरेच; पण, वक्तृत्वावरही त्यांचे प्रभुत्व होते. आपले म्हणणे कमीत कमी शब्दांत, कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कसब त्यांच्याकडे होते. सैद्धांतिक मांडणी करणारे खूप असतात;  पण, सिद्धांत उभे करणारे दिसत नाहीत. डॉ. गेल ह्या अशा सिध्दांत उभे करणाऱ्यांपैकी होत्या. माती, पाणी, स्त्री आणि विठ्ठल-बुद्ध या चार पायांवर त्यांनी आपल्या सिद्धांताला सक्षमपणे उभे केले होते.

Dr. D. T. Shirke
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यापीठीय मंचावरून डॉ.गेल ऑम्वेट यांच्या कार्याचा वेध घेत असताना त्यांचे शैक्षणिक आणि संशोधकीय योगदान प्रकर्षाने अधोरेखित करणे आवश्यक आहे. डॉ. गेल या लौकिकार्थाने कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेत पूर्णवेळ कार्यरत नव्हत्या. मात्र, तरीही त्यांनी समाजशास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्राला दिलेले योगदान अतुलनीय व अमूल्य आहे. संशोधनाचा उपयोग सामाजिक चळवळींना अधिष्ठान देण्यासाठी करणे आणि सामाजिक चळवळींबाबतचे संशोधन पुन्हा पुढे नेणे, अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली होती. त्या अर्थाने त्यांच्याकडे एक 'बहुमुखी शिक्षणतज्ज्ञ' म्हणून पाहावे लागेल. विद्यापीठ परिवार त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध माध्यमांतून कार्यरत राहील, अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. 

यावेळी माजी समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. एस.एन. पवार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, अर्थशास्त्र अधिविभागाचे डॉ. पी.एस. कांबळे, शारदाबाई अध्यासनाच्या संचालक डॉ. भारती पाटील, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी मनोगते व्यक्त केली.

सुरवातीला कुलगुरू डॉ.शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.पाटील आणि डॉ.पाटणकर यांच्या हस्ते डॉ.गेल ऑम्वेट यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. ऑम्वेट यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमास कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांच्यासह निवडक ५० निमंत्रित उपस्थित होते.  डॉ.प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले; तर, अमोल मिणचेकर यांनी सूत्रसंचालन केले.