Wednesday, 17 November 2021

कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना शिवाजी विद्यापीठात निरोप; पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण

डॉ. नांदवडेकर यांनी कुलसचिवपद जबाबदारीने सांभाळले: कुलगुरू डॉ. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. यावेळी (डावीकडून) उपकुलसचिव संध्या अडसुळे, संचालक स्वाती खराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे, संचालक डॉ. नमिता खोत, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, सौ. वैशाली नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, व्य.प. सदस्य डॉ. एन.बी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, संचालक डॉ. एम.एस. देशमुख.

शिवाजी विद्यापीठात झालेल्या सत्कार समारंभास उत्तर देताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


 

कोल्हापूर, दि. १७ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार डॉ. विलास नांदवडेकर यांनी जबाबदारीने सांभाळून पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे काढले.

डॉ. नांदवडेकर यांच्या कुलसचिव पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला. त्या निमित्ताने विद्यापीठ कार्यालयात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदाला मोठे वलय आहे. डॉ. उषा इथापे यांच्यापासून ते डॉ. बी.पी. साबळे यांच्यापर्यंत अनेकांनी या पदाची प्रतिष्ठा वाढविली आहे. त्या पदावर काम करावयास मिळणे हाच मुळात मोठा सन्मान आहे. डॉ. नांदवडेकर यांना तो सन्मान लाभला, ही भाग्याची गोष्ट आहे. येथे काम करीत असताना प्रशंसेपेक्षा विविध घटकांच्या व्यथा, अपेक्षा आणि तक्रारी यांचा मोठा ओघ व्यवस्थेमध्ये असतो. ते प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी कुलसचिवांवर असते. शिवाजी विद्यापीठाच्या कारभाराकडे समस्त घटकांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे येथील प्रश्न जबाबदारीने हाताळण्याचीही भूमिका कुलसचिवांना घ्यावी लागते. डॉ. नांदवडेकर यांनी त्यांच्या परीने ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. महापूर, कोरोना आदी संकटांमध्ये शासन व जिल्हा प्रशासन यांच्याप्रती सहकार्याची भूमिका घेऊन विद्यापीठाची समाजाभिमुखता जपली. सीमाभागातील शिनोळी (ता. चंदगड) येथील उपकेंद्र उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध घटकांशी योग्य समन्वय राखून त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केली.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, डॉ. नांदवडेकर यांना शैक्षणिक, संशोधकीय अनुभवाच्या तुलनेत प्रशासकीय अनुभवाची पार्श्वभूमी नसतानाही शिवाजी विद्यापीठाच्या अतिव्यापक पटलावर यशस्वीपणे कार्य केले. वादातीत कारकीर्द म्हणून त्यांच्या कार्यकाळाकडे पाहावे लागेल.

सत्काराला उत्तर देताना कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या तसेच विद्यापीठाच्या हितासाठी व पारदर्शक कारभारासाठी कायम आग्रही असणाऱ्या लोकांसमवेत काम करण्याची संधी लाभली, याचे समाधान आहे. या कालावधीत एक विद्यार्थी म्हणूनच प्रशासकीय कारभार मी शिकत राहिलो. तत्कालीन कुलगुरूंसह विद्यमान कुलगुरूंनी केलेले मार्गदर्शन व सहकाऱ्यांनी दिलेले सहकार्य या बळावर कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करता आला, याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. नांदवडेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पालकमंत्री यांच्यासह उच्चशिक्षण विभागातील सर्व अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, अधिकार मंडळांचे सर्व सदस्य, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, संस्था, शिक्षक व कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना यांच्यासह सर्वच घटकांनी केलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.

तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट देऊन कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. सौ. वैशाली नांदवडेकर यांनी कुटुंबियांच्या वतीने विद्यापीठ परिवाराप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केल्या. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे यांनी आभार मानले.

या प्रसंगी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एन.बी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी आणि डॉ. नांदवडेकर यांचे कुटुंबिय व नातेवाईक उपस्थित होते.

Tuesday, 16 November 2021

लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक: श्रीकांत देशपांडे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. सोबत (डावीकडून) जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. सोबत (डावीकडून) जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. आर.व्ही. गुरव आणि अभय जायभाये.

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत उपस्थितांसमवेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आदी.


कोल्हापूर, दि. १६ नोव्हेंबर: लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे केले.

श्री. देशपांडे यांनी आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन विद्यापीठातील निवडक अधिकारी व प्राचार्य यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली आणि त्यांना युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याविषयी विविध सूचना व प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रमुख उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, आजघडीला आपण मतदार जागृती आणि विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी या पलिकडे जाऊन लोकशाही प्रक्रियेचा भविष्यवेधी विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ मतदाता म्हणून नव्हे, तर लोकशाही प्रक्रियेतील एक सजग घटक म्हणून आपले कर्तव्य बजावण्यास सिद्ध व्हावे, या दृष्टीने त्यांचा या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुणे येथे लोकशाही गप्पा नावाचा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. त्यामध्ये अनेक नामवंतांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे लोकशाही मूल्ये आणि शिक्षकांची भूमिका यासारख्या विषयांवर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले. शंभर प्रथितयश मान्यवरांचा एक थिंक टँक निर्माण करून त्यांच्याकरवी विचारमंथनातून अनेक विधायक सूचना सामोऱ्या येतात. विद्यार्थ्यांचा या प्रक्रियेत स्वयंस्फूर्त सहभाग फार आवश्यक आहे. जीवनकौशल्ये आणि भविष्यातील संधी यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना काम करण्यास प्रवृत्त करावे लागेल. सामाजिक सेवाकार्यात त्यांचा वैयक्तिक सहभाग आणि योगदान यांचा त्यांच्या भविष्यातील शिक्षण व कारकीर्द यांसाठी उपयोग होतो, हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यास विद्यार्थी अधिक जोमाने लोकशाहीविषयक कार्यात सहभागी होतील. त्यांच्यासाठी लोकशाही आणि सुशासन, निवडणूक प्रक्रिया आदी विषयांवर एक अथवा दोन क्रेडिटचे अभ्यासक्रम राबविल्यास त्याचाही लाभ होईल. महाविद्यालयीन स्तरावर डेमॉक्रसी क्लब, स्टुडंट पार्लमेंट यांसारखे उपक्रम राबविल्यास लोकशाहीच्या विविध आयुधांची विद्यार्थ्यांना माहिती होईल, असे मतही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, लोकशाहीच्या समृद्धी व विकासामध्ये युवा वर्गाचा सहभाग वाढविण्यासाठी विविध अभ्यासक्रमांसह लोकशाहीविषयक ऑनलाईन अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्राधारित उपक्रम राबविण्यास प्राधान्य आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत इंटर्नशीप करण्यास प्रोत्साहन द्यावे लागेल. महाविद्यालयीन स्तरावर त्यासाठी विचारमंथन बैठका घेतल्या जाणे आवश्यक आहे. या कामी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभाग यांनी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊन निवडणूकविषयक कार्य करावे. महाविद्यालये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावे यांची सांगड घालून त्या विभागात मतदार नोंदणीचा कार्यक्रम अधिक कार्यक्षमपणाने राबविणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. देशपांडे यांनी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी यांची मतेही जाणून घेतली. बैठकीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. रविंद्र भणगे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, प्रशासकीय सेवक आदी उपस्थित होते.

 

Monday, 15 November 2021

महाराष्ट्र विज्ञान अकादमीकडून

डॉ. कोळेकर, डेळेकर यांना फेलोशीप

 

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. जी.बी. कोळेकर व डॉ. एस.डी. डेळेकर यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीची फेलोशीप मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) परीक्षा संचालक जी.आर. पळसे व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.


कोल्हापूर, दि. १५ नोव्हेंबर: पुणे येथील महाराष्ट्र विज्ञान अकादमी (एम.ए.एस.सी.) या प्रतिष्ठित संस्थेकडून सन २०२१च्या फेलो व यंग असोसिएट्सची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. जी.बी. कोळेकर आणि डॉ. एस.डी. डेळेकर यांना फेलोशीप जाहीर झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज सकाळी डॉ. कोळेकर आणि डॉ. डेळेकर यांचा ग्रंथभेट देऊन गौरव केला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे उपस्थित होते.

महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या काटेकोर निकषांची पूर्तता करीत या दोघा शिक्षक-संशोधकांनी फेलोशीप प्राप्त केली, ही बाब विद्यापीठासाठी भूषणावह आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काढले.

डॉ. जी.बी. कोळेकर यांना यापूर्वी भारत सरकारच्या प्रतिष्ठेच्या आय.एन.एस.ए. फेलोशीप, ब्रेनपूल फेलोशीप मिळाल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठाच्या एशियन रिसर्च नेटवर्कची फेलोशीपचेही ते मानकरी आहेत. त्यांचे १५०हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांतून प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या नावावर पाच पेटंट असून पाच विविध प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाचे (रुसा) समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

डॉ. एस.डी. डेळेकर यांना अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सी.व्ही. रामन फेलोशीप (युएसए) तसेच इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांची समर फेलोशीप मिळाली आहे. त्या माध्यमातून त्यांना अमेरिका व बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (आय.आय.एस.सी.) येथे संशोधन करण्याची संधी लाभली. ते फ्लोरिडा (अमेरिका) येथील ग्लोबल अॅम्बॅसॅडर पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांचे ८०हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांतून प्रकाशित आहेत. ४ पेटंट त्यांच्या नावे आहेत. ८० लाख रुपयांचे पाच मेजर प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत.

 

बिरसा मुंडा यांची विद्यापीठात जयंती

 



कोल्हापूर, दि. १५ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठामध्ये बिरसा मुंडा यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय भवनात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, छत्रपती शाहू महाराज मराठा अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. निलांबरी जगताप यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Sunday, 14 November 2021

शिवाजी विद्यापीठात पंडित नेहरू यांची जयंती



कोल्हापूर, दि. १४ नोव्हेंबर: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. रविंद्र भणगे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव आदी उपस्थित होते.

Saturday, 13 November 2021

शिवाजी विद्यापीठात एक्सआरडी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित डीएसटी-सैफ एक्सआरडी कार्यशाळेच्या समारोप समारंभात मनोगत व्यक्त करताना संशोधक अश्विनी पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) एस.आर. कलश, डॉ. आर.के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व डॉ. आर.जी. सोनकवडे.

कोल्हापूर, दि. १३ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठातील सैफ सुविधा केंद्रात ११ व १२ नोव्हेंबर अशा दोन दिवसीय एक्सआरडी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप काल प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते सृष्टी (SRISTI)  या आयआयटी मुंबईने सैफ केंद्रांसाठी तयार केलेल्या वेबपोर्टलचे उद्घाटन झाले.

दोन दिवसांच्या या प्रशिक्षण  कार्यशाळेत ब्रूकर कंपनीचे अॅप्लिकेशन इंजिनियर डॉ. रविकुमार यांनी एक्सआरडी उपकरणाची तांत्रिक व प्रात्यक्षिक अशी सखोल माहितदिली. रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. भांगे यांनीही  रेटव्हिल्ड (Retvield) या एक्सआरडी विश्लेषणात महत्त्वपूर्ण असणाऱ्या सॉफ्टवेरबद्दल माहिती प्रात्यक्षिक दिले. कार्यशाळेच्या सांगता समारंभास अध्यक्ष म्हणून प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते सृष्टी (SRISTI)  या आयआयटी मुंबईने सैफ केंद्रांसाठी तयार केलेल्या वेबपोर्टलचे उद्घाटन झाले. या वेबपोर्टलचे माध्यमातून विद्यापीठाच्या सैफ केंद्रातील वैज्ञानिक संशोधन सुविधा संशोधकांना वापरणे सोपे होणार आहे. युजरफ्रेंडली असणारे हे पोर्टल सैफ आणि त्याचे वापरकर्ते तसेच डीएसटी आणि सैफ केंद्र यामधील सुसंवाद सुलभ आणि परिणामकारक होण्यासाठी लाभदायक आहे. या वेबपोर्टलसाठी सीफसी विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. या कार्यशाळेत ७५ संशोधक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले. श्री. एस. आर. कलश यांनी आभार मानले.

Thursday, 11 November 2021

समस्यांची जाणीव असणारे नेतृत्त्वच सच्चे: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. राजू श्रावस्ती लिखित संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. केदार मारुलकर, डॉ. ए.एम. गुरव आदी.


कोल्हापूर, दि. ११ नोव्हेंबर: कोणताही उद्योग-व्यवसाय हा पैसा मिळविण्यासाठी किंवा नफ्यासाठी नसतो. ते नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारले जात असतात. याची जाणीव असणारे नेतृत्वच सच्चे असते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल येथे व्यक्त केले.

विद्यापीठाच्या दि युनायटेड वेस्टर्न बँकेच्या (स्व.) रा.ना. गोडबोले अध्यासनातर्फे पुण्याच्या सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथील वाणिज्य अधिविभाग प्रमुख डॉ. राजू श्रावस्ती लिखित लीडरशीप इन बँकिंग सेक्टर: चेंजिंग सिनॅरिओ इन ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी या संशोधन पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बँकिंग क्षेत्रातील नेतृत्वाच्या सर्वंकष वाटचालीचा संशोधनात्मक आढावा घेऊन त्याचे पुस्तिकारुपाने प्रकाशन करण्याचा अध्यासनाचा उपक्रम स्तुत्य आणि महत्त्वाचा आहे. ज्ञाननिर्मितीच्या अशा अधिकाधिक वाटा शिक्षक, संशोधकांनी चोखाळल्या पाहिजेत. खऱ्या नेतृत्वाचा कस पाहणाऱ्या अनेक बाबी असतात. बँकिंग क्षेत्रामध्ये संपत्ती निर्मिती आणि संपत्ती व्यवस्थापन या दोन बाबी उत्तम नेतृत्वाचा परिपाक असतात. ग्रामीण बँक उपक्रमाचे उद्गाते व जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांनी तीन शून्यांचा विचार करण्याचे आवाहन जगाला केले आहे. त्यामध्ये शून्य गरीबी, शून्य बेरोजगारी आणि शून्य प्रदूषण यांचा समावेश आहे. या तीन शून्यांसाठी जी व्यवस्था काम करते, त्या व्यवस्थेचे नेतृत्व खरे असे मानायला हवे. त्या दृष्टीने सर्व स्तरांवरील नेतृत्वांनी काम करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्वाचाही अशा पद्धतीने संशोधकीय अभ्यास करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, अपयशातून भरारी घेण्याची क्षमता असणाऱ्या नेतृत्वाची जागतिक स्तरावर आज वाखाणणी केली जाते. अशा लोकांकडेच कंपन्या आपले नेतृत्व सोपवित असतात. त्यामुळे नेतृत्व यश किती मिळविते, यापेक्षाही आपल्या आस्थापनेला अपयशातून कशा पद्धतीने सावरते, यावर त्याची महत्ता निर्धारित होत असते. प्रामाणिकपणा हे सुद्धा नेतृत्वाचे अविभाज्य गुणवैशिष्ट्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्या हस्ते संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. संशोधक लेखक डॉ. राजू श्रावस्ती यांनी संशोधन पुस्तिकेमधील विश्लेषणाची उपस्थितांना माहिती दिली. अध्यासन प्रमुख डॉ. एस.एस. महाजन यांनी प्रास्ताविकात अध्यासनाच्या वतीने दुसरी संशोधन पुस्तिका सादर करीत असताना आनंद होत असल्याचे सांगितले. डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव, तेजपाल मोहरेकर आदी उपस्थित होते.