Monday, 28 March 2022

निव्वळ शून्य उत्सर्जनासाठी भरीव प्रयत्नांची आवश्यकता: प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

 

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) कर्नल शशिकांत दळवी, नितीन डोईफोडे, डॉ. सुभाष आठल्येडॉ. मधुकर बाचुळकरकमलाकर बुरांडे व प्रा. मगर आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. सुभाष आठल्येडॉ. मधुकर बाचुळकरकर्नल शशिकांत दळवी, डॉ.राजन पडवळ आदी.

शिवाजी विद्यापीठात निव्वळ शून्य उत्सर्जनाबाबत कार्यशाळा

कोल्हापूर, दि. २८ मार्च: निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी आज जगभरात विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारचे प्रयत्न स्थानिक पातळीवरही भरीव प्रमाणात व्हायला हवेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आज येथे दिली.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया अध्यासन आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात नेट झिरो एमिशन: ए ग्लोबल नेसेसिटी" या विषयावर एक दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, झिरो कार्बन आणि नेट झिरो एमिशन अशा अनेक संज्ञांनी सामान्य माणूस व कार्यकर्त्यांच्या मना कुतूहल निर्माण केलेले आहे. खऱ्या अर्थाने यासंदर्भातील काम नेटाने पुढे नेण्यासाठी काही कार्यकर्ते स्वतःहून समाजा या विषयावर भरपूर काम  करत आहेत. समाजातील अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून या विषयाला अग्रस्थानी आणण्याचे उद्दिष्ट या कार्यशाळेच्या माध्यमातून साध्य झाले आहे. अशा पद्धतीच्या प्रबोधनात्मक चर्चा सातत्याने घडवून आणल्या जाणे आवश्यक आहे. त्यातून समाजाला या विषयांचे गांभिर्य लक्षात येईल, या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ग्लासगो परिषदेत झालेल्या चर्चेनुसार सन २०७०पर्यंत नेट झिरो एमिशन साध्य करण्यासाठी काय करावे लागेल, या दृष्टीने डॉ. सुभाष आठल्ये, डॉ. मधुकर बाचुळकर व कर्नल शशीकांत दळवी या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नागरिकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही, तर नजीकच्या काळात तापमानवाढीचे गंभीर दुष्परिणाम मानवाला भोगावे लागतील. वारंवार होणारी चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, ओला व सुका दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी संकटे येत राहतील आणि मानवच त्याला कारणीभूत असेल, असा सूर या चर्चेत उमटला.

कार्यक्रमात सुरवातीला चेअर प्रोफेसर डॉ. राजन पडवळ यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील भूमिका विद केली. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

यावेळी विश्व वन्यजीव निधीचे सुहास वायंगणकर, ग्राहक प्रबोधन प्रचार प्रांत समिती प्रमुख सचिन जंगम, श्री. बुरांडे, दिनकर चौगुले, विश्वास पवार, डॉ. भेंडे (मुंबई), डॉ. घाळी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. उंदरे, प्रा. मगर, प्रा. व्हंडकर व प्रा.गोडघाटे, केआयटी महाविद्यालयाचे प्रा.यादव व प्रा. काटकर, राजारामबापू इन्स्टिट्यूटच्या डॉ. सीमा देसाई, प्रा. अनिकेत परदेशी, प्रा. मुल्ला, अर्जुन थोरात, कमलाकर बुरांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. राजन पडवळ यांनी आभार मानले.

Friday, 25 March 2022

यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा तरुणांनी वेध घ्यावा: डॉ. राजन गवस

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. उमेश गडेकर संपादित पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. राजन गवस व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. संतोष सुतार, डॉ. गडेकर, डॉ. प्रकाश पवार व गजानन साळुंखे.

डॉ. राजन गवस


डॉ. उमेश गडेकर संपादित पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. २५ मार्च: आजच्या तरुण पिढीने यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा सर्वंकष वेध घेण्याचा प्रयत्न करीत राहायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने “कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण व हमीद अली” या डॉ. उमेश गडेकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील होते.

डॉ. गवस म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्त्व सामाजिक, राजकीय या पलिकडे साहित्यिक व सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत सजग व प्रगल्भ होते. आजही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू अप्रकाशित आहेत. सर्वसामान्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामध्ये त्यांनी केलेले सामाजिक परिवर्तनाचे कार्य, देशबांधणीच्या कार्यातील त्यांचे योगदान आणि सर्वसमावेशक विकासासाठीची तळमळ या बाबींचा साकल्याने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.

डॉ. गवस पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या ३२ (ग) या कायद्याने कसणाऱ्याला दिलेल्या जमिनीच्या मालकी हक्कामुळे समाजातील शोषित आणि प्रस्थापित अशी समाज रचना बदलून नवीन समाज रचना आकारास आली. त्यांनी घेतलेला नादारीचा निर्णय खेड्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सशक्तीकरण करणारा ठरला आणि त्यामुळेच स्त्री साक्षरता शक्य झाली, ही बाब आपण अभिमानपूर्वक स्वीकारायला हवी. डॉ. गडेकर यांनी संपादित पुस्तकात यशवंतरावांच्या अशा काही पैलूंवर चांगला प्रकाश टाकला आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण व हमीद अली यांच्या कार्यात ग्रामीण विकास हा समान दुवा आढळतो. ज्या प्रकारे कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागात शैक्षणिक संकुलाचे जाळे निर्माण केले, त्याच प्रकारे यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. हमीद अली यांनी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेला मोठे सहकार्य केले. ही ग्रामीण आस्था हा तिघांच्याही कार्याचा समान धागा आहे.

कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण अध्यासन व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश पवार, पुस्तकाचे संपादक डॉ. उमेश गडेकर, संयोजक प्रा. गजानन साळुंखे, डॉ. नितीन माळी, चेतन गळगे, सुधीर देसाई, डॉ. संतोष सुतार, अमोल मिणचेकर, डॉ. वैशाली भोसले, डॉ. कविता वड्राळे, डॉ. उर्मिला दशवंत, डॉ. नीलम जाधव, मृणालिनी जगताप, परशुराम वडार, सागर वाळवेकर, डॉ. विशाल ओहाळ, डॉ. दादा ननवरे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

पुस्तकाविषयी थोडक्यात...

“कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण व हमीद अली” या पुस्तकात कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा) यांचे नातू श्री. सुभाष आप्पासाहेब देसाई यांनी कर्मवीरांच्या तत्त्वनिष्ठपणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेल्या श्री. यशवंतराव चव्हाण: आदर्शाच्या प्रकाशात विकसित झालेले व्यक्तिमत्त्व या लेखात यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली आहे. डॉ. अरुण भोसले यांच्या “राष्ट्रीय मनोवृत्तीचे सनदी अधिकारी हमीद अली” या लेखातून प्रकाश झोतात न आलेल्या हमीद अली यांच्या व्यक्तिमत्त्वाची व कार्याची ओळख करून दिलेली आहे.


बहुविद्याशाखीय संशोधनास चालना देणे आवश्यक: प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

 

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित चार दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. एम. व्ही. वाळवेकर आणि अधिविभाग प्रमुख डॉ. ए.ए. देशमुख.


कोल्हापूर, दि. २५ मार्च: बहुविद्याशाखीय संशोधनास चालना देणे ही आजघडीची सर्वात मोठी गरज आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी काल येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित चार दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. मॉलेक्युलर टेक्निक्स इन बायोलॉजीकल रिसर्चया विषयावर आहे.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, आंतरविद्याशाखीय ज्ञानार्जनाचे महत्त्व आज नव्याने अधोरेखित झाले आहे. त्याच्या बरोबरीनेच आता विविध विद्याशाखांतील संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. यात केवळ विज्ञान विद्याशाखाच नव्हे, तर तिच्या जोडीने सामाजिक शास्त्रज्ञांचाही सहभाग असणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने बहुविद्याशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे संबंधित संशोधकांनी आता नवकल्पनांच्या मदतीने देशातील आर्थिक व्यवस्था कशी विकसित करता येईल, या अनुषंगानेही संशोधनाची दिशा केंद्रित करणे अभिप्रेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अधिविभागप्रमुख डॉ. ए. ए. देशमुख यांनी कार्यशाळेचा आराखडा आणि महत्व सांगितले. कार्यशाळेत पीसीआर, इलेक्ट्रोफोरसीस, प्रोटीन प्युरीफिकेशन, लिपोफिलायझेशन, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, फ्लुरोसेन्स मायक्रोस्कोपी इत्यादींचे प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. एम. व्ही. वाळवेकर यांनी दिली. कार्यशाळेसाठी पुणे, सांगली, सातारा, औरंगाबाद आदी विविध महाविद्यालयांतून ३५ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

Tuesday, 22 March 2022

कॉ. दत्ता देशमुख बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे लोकशिक्षक: प्रा. विठ्ठल शेवाळे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा. विठ्ठल शेवाळे. व्यासपीठावर (डावीकडून) कॉ. अतुल दिघे, डॉ. भारती पाटील, डॉ. किशोर खिलारे आणि कॉ. बाबुराव तराळी.


 

कोल्हापूर, दि. २२ मार्च: कॉ. दत्ता देशमुख यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा इतिहास आहे. समोरच्या व्यक्तीचे प्रथम ऐकून घेऊन मग आपले मत मांडणारे बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे ते लोकशिक्षक होते,’ असे प्रतिपादन प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कॉ. दत्ता देशमुख अध्यासनातर्फे आयोजित ‘कॉ. दत्ता देशमुख: नेतृत्व आणि कर्तृत्व’ या विषयावर आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. अतुल दिघे होते.

प्रा. शेवाळे म्हणाले, ‘दत्ता देशमुख केवळ निवडणूक प्रसंगी नव्हे, तर प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर मतदारसंघाचा दौरा करीत असत. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत विधानसभेत आवाज उठवत असत. त्यामुळे लोकांचे वास्तव व खरेखुरे प्रश्न मांडले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कधीच विरोधासाठी विरोध केला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेवर निवडून देण्यामध्ये त्यांनी आणि व्ही. एन. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.’

अध्यक्षीय मनोगतात कॉ. अतुल दिघे म्हणाले, दत्ता देशमुख हे बहुजनांच्या संघर्ष प्रक्रियेतून तयार झालेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुस्तक रूपाने लोकांसमोर येणे आवश्यक आहे.’

विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. किशोर खिलारे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

याप्रसंगी कॉ. बाबुराव तराळी, डॉ. रवींद्र भणगे, प्रा. अनिल मोहिते, डॉ. अश्विनी पाटील, प्रा. मिलिंद सावंत, प्रा. साक्षी गावडे यांच्यासह विविध अधिविभागातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण शिंदे, शोभा पाटील, वैष्णवी कुंभार, भाग्यश्री मर्दाने, विद्या कांबळे आदींनी इत्यादींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Monday, 21 March 2022

सजग मतदार निर्मितीत विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची: श्रीकांत देशपांडे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत बोलताना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.

श्री. श्रीकांत देशपांडे



कोल्हापूर, दि. २१ मार्च: सजग मतदार निर्माण करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी अभ्यासक्रम निर्मितीसह विविध उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे व्यक्त केली.

श्री. देशपांडे यांनी आज शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन गत-बैठकीचा आढावा घेण्यासह निवडणूक प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने कोणते उपक्रम राबविता येतील, या दृष्टीने चाचपणी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, कोल्हापूरचे उप-जिल्हा निडणूक अधिकारी भगवान कांबळे, पन्हाळा प्रांताधिकारी तथा श्री. देशपांडे यांचे संपर्क अधिकारी अमित माळी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, सर्वसाधारणपणे विद्यार्थीदशेपासूनच निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, या उद्देशाने विद्यापीठीय व्यवस्थेकडून निवडणूक आयोगाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. हा अभ्यासक्रम मोजका सैद्धांतिक आणि अधिकाधिक कृतीशील उपक्रमांवर भर देणारा असावा, याचीही दक्षता घेण्यात यावी. त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र साधनस्रोतांचा वापर करावा. समूह कृतीगट स्थापनेतून संवाद वृद्धिंगत करण्यावरही त्याचा भर असावा. हा अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देशभरातील विद्यापीठांतही हा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी राज्य आयोगामार्फत प्रयत्न करण्यात येतील.

निवडणूक प्रक्रिया तसेच मतदार जागृतीच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल कौतुकोद्गार काढून श्री. देशपांडे म्हणाले, विद्यापीठाने यापुढील कालखंडात अधिक कृतीशील भूमिका घेऊन स्थानिक चौकशी समित्यांच्या माध्यमातून संलग्नित महाविद्यालयांतूनही इलेक्टोरल लिटरसी क्लब तथा डेमॉक्रसी क्लब स्थापन करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या समावेशन अभ्यासक्रमांतही निवडणूक प्रक्रियाविषयक माहिती अंतर्भूत करावी. शिवाजी विद्यापीठाने निडणूक प्रक्रिया, लोकशाही तथा मतदार जागृतीच्या अनुषंगाने विविध परिसंवाद व वेबिनार घेतले, ही स्तुत्य बाब आहे. नजीकच्या कालखंडात राज्य निवडणूक आयोग आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर संयुक्तिक विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी आयोग सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. राज्यात शक्य असेल तेथे जिल्हास्तरीय इलेक्शन म्युझियम स्थापन करण्याचाही आपण गांभीर्यपूर्वक विचार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी श्री. देशपांडे यांना शिवाजी विद्यापीठ निवडणूक प्रक्रिया व मतदार जागृतीच्या अनुषंगाने राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. आर.व्ही. गुरव यांनी लोकशाही दिन, मतदार दिवस या अनुषंगाने विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले परिसंवाद व विविध स्पर्धा यांची माहिती दिली.

Saturday, 19 March 2022

शिवाजी विद्यापीठात ‘बीएआरसी’च्या ‘रेडॉन जिओ-स्टेशन’ची स्थापना

 

मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्रामार्फत शिवाजी विद्यापीठात स्थापित करण्यात आलेल्या रेडॉन जिओ-स्टेशन यंत्रणेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. आर. के. कामत, डॉ. एम.एस. देशमुख, अभय जायभाये, डॉ. एस. एस. महाजन, डॉ. आर. जी. सोनकवडे, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा संचालक जी.आर. पळसे, बीएआरसीचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप कंसल, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. डी.के. मोरे, डॉ. विजय फुलारी, डॉ. के.वाय. राजपुरे.

शिवाजी विद्यापीठात स्थापित 'बीएआरसी'चे रेडॉन जिओ-स्टेशन


भूकंपसदृ हालचालींवर लक्ष ठेवणे होणार शक्य; सुविधा असणारे एकमेव अकृषी विद्यापीठ

कोल्हापूर, दि. १९ मार्च: येथील शिवाजी विद्यापीठामध्ये भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी) यांच्याकडून रेडॉन जिओ-स्टेशनची स्थापना करण्यात आली असून या यंत्रणेद्वारे भूगर्भातील भूकंपसदृश हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. अशी सुविधा स्थापित करण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे. ही माहिती डीएसटी-सैफ केंद्राचे समन्वयक डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्राने इंद्रा (INDRA- lndian Network for Detection of Radon Anomaly)  नावाचा प्रकल्प चालू केला आहे. त्यासाठी स्वतंत्र, सौर उर्जेवर चालणारे रेडॉन जिओ-स्टेशन विकसित केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत रेडॉन जिओ-स्टेशनची देशाच्या वेगवेगळ्या भागांत स्थापना करण्यात येत आहे. त्याच्या स्थापनेपासून देखभालीपर्यंतचा सर्व खर्च भाभा अणू संशोधन केंद्राकडून करण्यात येत आहे. शिवाजी विद्यापीठा या स्टेशनची उभारणी भौतिकशास्त्र विभागातर्फे सैफ- डीएसटी केंद्राच्या आवारामध्ये केली आहे. हे स्टेशन सौर र्जा आणि डेटा कम्युनिकेशनद्वारे चालवले जाणारे स्वतंत्र युनिट आहे. त्यामध्ये बीएसएनएल सिमचा वापर केला आहे. सुमारे शंभर किलो वजनाचे हे स्टेशन दोन मीटर जागेत स्थापित केले आहे. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील भूकंपसदृ हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने रेडॉन जिओ-स्टेशन खूपच महत्त्वपूर्ण ठरेल. हे जिओ-स्‍टेशन परिसरातील भूकंपीय हालचालींचे निरीक्षण करून भूकंपशास्त्रीय संशोधनासाठी डेटाबेस तयार करेल. हे स्टँडअलोन जिओ-स्टेशन रेडॉन डेटा थेट बीएआरसीमधील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकडे पाठविणार आहे.

यापूर्वीही भाभा अणू संशोधन केंद्रच्या सहकार्याने पर्यावरणातील किरणोत्साराचे मापण करणाऱ्या IERMON (Indian Environmental Radiation Monitoring Network) या यंत्रणेची विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात जुलै २०१९ मध्ये स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सुविधा प्रस्थापित असणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. भाभा अणू संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या मदतीने केलेल्या या जिओ-स्‍टेशन स्थापनेमुळे या क्षेत्रातील संशोधन उपक्रमांना चालना मिळेल. तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी पुढील संशोधन करू शकतील.

या स्टेशनचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे,  परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.जी.कुलकर्णी, आंतरविद्याशाखा विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. एम.व्ही. गुळवणी आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. विजय फुलारी, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. निलेश तरवाळ आणि भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप कंसल उपस्थित होते.