Friday, 17 June 2022

डिफ ऑलिंपिकपटू सुबिया मुल्लाणीने विद्यापीठाचा लौकिक उंचावला: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

ब्राझील येथे झालेल्या डिफ ऑलिंपिकमध्ये जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थिनी सुबिया मुल्लाणी हिला स्मृतिचिन्ह व मदतनिधी प्रदान करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.
 
राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघाचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत डॉ. पी.टी. गायकवाड, मृणाल खोत, प्रकाश कावले, नीळकंठ कांबळे आदी.


विद्यापीठातर्फे ५० हजारांचा मदतनिधी सुपूर्द; महिला फुटबॉलपटूंचाही गौरव

कोल्हापूर, दि. १७ जून: शिवाजी विद्यापीठाची जलतरणपटू सुबिया मुल्लाणी हिने ब्राझील येथे झालेल्या डिफ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, ही बाब विद्यापीठ परिवारासाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागात आज विद्यापीठाची ऑलिंपिकपटू सुबिया मुल्लाणी हिच्यासह कोटा येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत द्वितिय क्रमांक प्राप्त करून तमिळनाडूतील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला फुटबॉल संघातील क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला.

विद्यापीठाची जलतरणपटू सुबिया मुल्लाणी हिने ब्राझील येथे झालेल्या डिफ ऑलिंपिकमध्ये २०० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर फ्रीस्टाईल या जलतरण स्पर्धांत सहभाग घेतला. डिफ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती विद्यापीठाची पहिली क्रीडापटू ठरली आहे. या यशाबद्दल तिला ५० हजार रुपयांचा मदतनिधी प्रदान करून विद्यापीठामार्फत तिचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उंचावणाऱ्या सुबियाला यापुढील काळातही मदत करण्याचे धोरण विद्यापीठाचे राहील. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे सर्वच क्रीडापटू सातत्याने सरावात कसे राहतील, त्यांची कार्यक्षमता कशी वाढेल, या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत. खेळाडूंनीही त्यांचा आहार, प्रवास, स्थानिक तसेच स्पर्धास्थळावरील सोयीसुविधा आदींविषयी त्यांचे अनुभव विद्यापीठाला खुलेपणाने कळवावेत, जेणे करून त्यावर योग्य कार्यवाही करता येईल. त्यानंतर या संदर्भातील धोरण सुनिश्चित करणे शक्य होईल.

या प्रसंगी क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशिक्षक प्रकाश कावले यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास विशेष प्रशिक्षक मृणाल खोत, व्यवस्थापक नीळकंठ कांबळे यांच्यासह फुलबॉल संघातील अर्पिता पवार, सोनाली सुतार, निशा पाटील, सानिका चौगुले, जुलेखा बिजली, सोनाली साळवी, तेजस्विनी पाटील, यशश्री देशमुख, प्रियांका मोरे, ज्योती ढेरे, प्रेरणा गराडे, पूनम मिठारी, प्रतीक्षा मिठारी, प्रणाली चव्हाण, भाग्यश्री कदम, शासिया पठाण या क्रीडापटू उपस्थित होत्या.

Wednesday, 15 June 2022

विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश कौतुकास्पद: कुलगुरू डॉ. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) श्रीमती विद्या जठार, डॉ. पी.एस. कांबळे, पुजा अवघडे, अक्षय भागम, शिरीष शहापुरे, डॉ. व्ही.एन. शिंदे, अजित चौगुले.


कोल्हापूर, दि. १५ जून: शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे. त्यांनी यापुढील काळातही उत्तुंग यश मिळवावे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले.

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत शिवाजी विद्यापीठाच्या युजीसी पुरस्कृत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले उपस्थित होते.

विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात दरवर्षी सर्व समाजघटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा घेऊन एक वर्षासाठी मोफत प्रवेश दिला जातो. अशा प्रकारे सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षी केंद्रातील अभ्यासाच्या सोयीसुविधांचा लाभ घेऊन यंदाच्या एमपीएससी परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये अक्षय भागम (कोदे, ता. शाहूवाडी) याची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेमध्ये सहाय्यक अभियंता या वर्ग-१च्या पदावर, रविकुमार पाटील (मुधाळ) यांची पी.एस.आय. पदी आणि शिरीष शहापुरे (हासूर, ता. शिरोळ) व पुजा अवघडे (कोल्हापूर) या दोघांची नायब तहसीलदारपदी निवड झाली. आज या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या वतीने स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या यशामध्ये शिवाजी विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सदोदित लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. शिंदे आणि वित्त व लेखाधिकारी श्री. चौगुले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केंद्राचे समन्वयक डॉ. पी.एस. कांबळे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, तेजपाल मोहरेकर आदी उपस्थित होते.

Tuesday, 14 June 2022

शिवाजी विद्यापीठाच्या पूर्णवेळ अधिष्ठातापदी

डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस. महाजन यांची निवड

 

डॉ. आर.के. कामत

डॉ. एस.एस. महाजन


कोल्हापूर, दि. १४ जून: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ नुसार शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठातापदी प्रा. (डॉ.) रजनीश कमलाकर कामत यांची आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठातापदी प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण शंकर महाजन यांची आज निवड करण्यात आली. या पदांसाठी आज पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी निवड झालेले डॉ. आर. के. कामत हे मूळचे कागल येथील आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र अधिविभागांचे ते वरिष्ठ प्राध्यापक आणि अधिविभागप्रमुख आहेत. देशविदेशांतील नामांकित जर्नल्समध्ये त्यांचे २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी १६ पुस्तके लिहिली आहेत. आतापर्यंत १८ विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. शिवाजी विद्यापीठात भारत सरकारच्या निधीतून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक म्हणून काम करताना नॅक (बंगळूर) यांच्याकडून विद्यापीठास A++ मानांकन मिळवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला. गेल्या पाच वर्षांत त्यांना १० कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये युरोपियन युनियनकडून मंजूर प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यांनी युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांना संशोधनाच्या निमित्ताने भेटी दिल्या आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसह विद्यापरिषद, अधिसभा सदस्य आहेत. इतर अनेक संस्थांचे विद्यापीठ अनुदान आयोग नामांकित सदस्य आहेत. त्यांनी महाराष्ट्रात परीक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राजेश अग्रवाल समितीवर तसेच महाराष्ट्र सरकारच्या राज्य गुणवत्ता परिषदेवरही काम केले आहे.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे नूतन अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्राध्यापक व अधिविभाग प्रमुख आहेत. गेली २७ वर्षे ते शिक्षक, संशोधक व शैक्षणिक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. शिवाजी विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या संशोधन परीक्षण समित्यांसह पुणे विद्यापीठ व मुंबईच्या होमी भाभा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. डॉ. महाजन यांचे ४८ शोधनिबंध दर्जेदार जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांतून त्यांनी ६८ शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर १३ जणांनी एम.फील. पूर्ण केली आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या तीन लघु आणि युजीसी, आयसीएसएएसआर आणि इम्प्रेस यांच्या तीन मोठ्या संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. विद्यापीठाच्या प्रभारी अधिष्ठाता पदासह त्यांनी विद्यापरिषद सदस्य, अधिसभा सदस्य आणि अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. इंडो-जर्मन एज्युकेशन समीट- मुंबई-२०१६, ग्लोबल एज्युकेशन समीट, बंगलोर २०१७ या परिषदांसह शिवाजी विद्यापीठातर्फेही त्यांना उत्कृष्ट शिक्षक व संशोधक म्हणून पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दरम्यान, आज दिवसभरात विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखांसाठी पूर्णवेळ अधिष्ठाता पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या मुलाखतींसाठी पात्र आठपैकी सहा उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या मुलाखतीस पात्र चारही उमेदवार उपस्थित राहिले.

Monday, 6 June 2022

शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान:

आधुनिकीकरणाच्या नादात पन्हाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व नजरेआड होणे क्लेशकारक: डॉ. शिवाजी जाधव

 

शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. शिवाजी जाधव

शिवस्वराज्य दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. व्ही.एन. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अवनीस पाटील व दत्तात्रय मचाले.


कोल्हापूर, दि. ६ जून: वाढते पर्यटन आणि आधुनिकीकरणाच्या नादात पन्हाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व नजरेआड होणे क्लेशकारक आहे, असे प्रतिपादन येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. शिवाजी जाधव यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने डॉ. जाधव यांचे पन्हाळगडाचा इतिहास या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शिवाजी जाधव यांनी आपल्या व्याख्यानात पन्हाळगडाचा साद्यंत इतिहास उपस्थितांना सांगितला. पन्हाळगडाच्या इतिहासाचे अनेक नवे पैलू त्याद्वारे सामोरे आले. संरक्षणासह राजकीय तसेच प्रशासकीय दृष्ट्या पन्हाळगड हा इतिहासात नेहमीच महत्त्वाचा ठरल्याचे सांगून ते म्हणाले, इसवी सन १७३५मधील करवीरमहात्म्यात पन्नगालय या नावाने पन्हाळ्याची नोंद आढळते. त्यापुढील कालखंडात राष्ट्रकुट, मुस्लीम राजवट, औरंगजेब आदींनी तेथे राज्य केले. दुसरा भोज या शिलाहार राजाने आपली राजधानी म्हणून पन्हाळगडास निवडले आणि पन्हाळ्यास मोठे महत्त्व तेव्हापासून प्राप्त झाले. कोल्हापूर विभागात अणुस्कुरा, आंबा, आंबोली आदी घाट येऊन मिळतात. त्याद्वारे कोकणशी आणि तेथून बाहेर असा व्यापार चाले. या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या व्यवहार व केंद्रांवर नजर ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य पन्हाळा करीत होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनाही आदिलशाहीच्या कोकणमार्गे सुरू असलेल्या व्यापारावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी रांगणा, पन्हाळा, विशाळगड हे किल्ले महत्त्वाचे वाटले आणि त्यांनी ते आपल्या ताब्यात घेतले. पन्हाळ्यास तर मराठ्यांच्या दक्षिणेकडील राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. छत्रपती संभाजी महाराज यांचाही बराचसा अधिवास हा पन्हाळ्यावर झाला. त्याचप्रमाणे त्यांनी संगमेश्वराकडील अखेरचा प्रवास पन्हाळ्यापासूनच सुरू केल्याने त्यांच्या जीवनचरित्रातही पन्हाळ्याचे मोठे महत्त्व आहे.

मोंगल-मराठा संघर्षातही पन्हाळगडच केंद्रस्थानी असल्याचे सांगून डॉ. जाधव म्हणाले, महाराणी ताराराणी यांच्या राजधानीचे ठिकाण म्हणून या कालखंडात पन्हाळ्यास मोठे महत्त्व आले. ते त्यांनी कोल्हापुरास राजधानी हलवेपर्यंत कायम राहिले. १८४४मध्ये गडकऱ्यांचे बंड या विभागात घडून आले. या बंडाने भारतीय जनतेला ब्रिटीशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. मात्र, या बंडात पन्हाळ्यासह परिसरातील किल्ल्यांची ब्रिटीशांनी मोठी नासधूस केली. या विभागातील किल्ल्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच ब्रिटीशांनी त्यांच्याकडे आपली वक्रदृष्टी वळविलेली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या परिसरात चहाच्या लागवडीचा प्रयोग केला. तो पुढे फारसा टिकला नसला तरी त्या काळात पन्हाळा चहा-४ हा इंग्लंडच्या राणीचा आवडता होता. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचीही पसंती त्याला लाभली होती. पन्हाळ्याची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी आपण जपण्यास प्राधान्य द्यायला हवे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी डॉ. जाधव यांच्या सप्रमाण विषय मांडणीचे कौतुक केले. ते म्हणाले, एखाद्या किल्ल्याची अतिशय साद्यंत माहिती कशी सादर करावी, याचा वस्तुपाठ डॉ. जाधव यांनी दिला आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण स्वरुपाचे विवेचन त्यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यात चौदा किल्ले आहेत. इतिहास अधिविभागाने त्यांच्या माहितीचे संकलन करावे आणि त्यांच्याविषयी छोटे-छोटे माहितीपटही तयार करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी केले, तर दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.

Saturday, 4 June 2022

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. अजितसिंह जाधव

 

प्रा. (डॉ.) अजितसिंह जाधव


कोल्हापूर, दि. ४ जून: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदी येथील प्रा. (डॉ.) अजितसिंह नारायणराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून आज ही घोषणा करण्यात आली.

डॉ. जाधव हे सध्या डॉ. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथे परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. डी.वाय. पाटील शिक्षण समूहामध्ये त्यांनी सन १९९३मध्ये अधिव्याख्याता पदापासून आपल्या कारकीर्दीस सुरवात केली. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक, अधिविभाग प्रमुख, डी.वाय. अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूरचे उप-प्राचार्य व प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, अधिष्ठाता (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष), अधिष्ठाता (अभियांत्रिकी विद्याशाखा), अध्यक्ष, अभ्यास मंडळ (इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) आदी विविध जबाबदारीच्या पदांवर कार्य केले आहे.

दि. ११ मे १९६८ रोजी जन्मलेल्या डॉ. जाधव यांचे मूळ गाव मेडशिंगी (त. सांगोला, जि. सोलापूर) आहे. त्यांनी १९९०मध्ये  शिवाजी विद्यापीठातूनच इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी (बी.ई.) घेतली. त्यानंतर वॉलचंद महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर पदवी (एम.ई.) घेतली. त्यानंतर राजस्थानच्या सिंघानिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली.

परीक्षा विभागात विद्यार्थीभिमुख सुधारणा करण्यावर भर

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी निवड झाल्याचे समजल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. अजितसिंह जाधव म्हणाले, हिरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी निवड होणे ही माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असल्याने या निवडीला एक वेगळे महत्त्व आहे. या निवडीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह निवड समितीच्या सर्वच सदस्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. या कारकीर्दीत शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक विद्यार्थीभिमुख सुधारणा करण्यावर माझा भर राहील. त्यासाठी सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

दरम्यान, आज दिवसभर कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. एकूण २७ पात्र उमेदवारांपैकी १७ उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. तथापि, कुलसचिव पदासाठी कोणत्याही उमेदवाराची निवड करण्यात आली नाही.

 

 

Thursday, 2 June 2022

‘खेलो इंडिया’ आंतरविद्यापीठ स्पर्धेतील

पदकविजेत्यांचा विद्यापीठात गौरव

दुसऱ्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेतील पदकविजेते क्रीडापटू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि डॉ. पी.टी. गायकवाड.


कोल्हापूर, दि. २ जून: विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी कोविड-१९च्या कालखंडानंतर दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत बजावलेली कामगिरी उत्साहवर्धक असून पुढील काळातही स्पर्धेगणिक त्यांची कामगिरी उंचावत राहावी, अशा सदिच्छा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केल्या.

द्वितिय राष्ट्रीय खेलो इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेत विविध क्रीडाप्रकारांत पदक प्राप्त करणाऱ्या क्रीडापटूंचा गौरव समारंभ काल (दि. १ जून) बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याची बाब विद्यापीठाकडे सोपवावी आणि आपले संपूर्ण लक्ष खेळ आणि गुणवत्ता सुधारण्यावर केंद्रित करावे. विद्यापीठ प्रशासन त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये विविध क्रीडाप्रकारांत शिवाजी विद्यापीठाच्या ८६ क्रीडापटूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये ८ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण २२ पदके प्राप्त केली. या पदकप्राप्त क्रीडापटूंना कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास क्रीडापटूंसह त्यांचे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि पालक उपस्थित होते. 

स्पर्धेतील पदकविजेत्यांची नावे (कंसात अनुक्रमे क्रीडाप्रकार व पदक) अशी-

वैयक्तिक क्रीडाप्रकार: तेजस दत्तात्रय जोंधळे (वेटलिफ्टिंग, सुवर्ण), साक्षी महेश रानमळे (वेटलिफ्टिंग, सुवर्ण), सरिता सुनील सावंत (वेटलिफ्टिंग, रौप्य), प्रतीक्षा बाळू साठे (वेटलिफ्टिंग, कांस्य), ऋतुजा वीरधवल खाडे (स्विमिंग, तीन सुवर्ण (५० मी. फ्रीस्टाईल, १०० मी. फ्रीस्टाईल व ५० मी. बटरफ्लाय)), गौरव विठोबा चव्हाण (स्विमिंग, कांस्य), धनंजय राजाराम जाधव (तलवारबाजी, कांस्य), ऋषीकेश उत्तम पाटील (फ्रीस्टाईल कुस्ती, कांस्य), नंदिनी बाजीराव साळोखे (फ्रीस्टाईल कुस्ती, कांस्य), रोहन गौतम कांबळे (अॅथलेटिक्स (४० मी अडथळे), सुवर्ण), विकास आनंदा खोडके (अॅथलेटिक्स (११० मी. अडथळे), सुवर्ण), सिद्धांत सुरेश पुजारी (अॅथलेटिक्स (३००० मी. स्टेपल्स चेस), कांस्य), स्नेहा सूर्यकांत जाधव (अॅथलेटिक्स (हातोडाफेक), कांस्य), ज्ञानेश्वरी जयवीर (नेमबाजी, कांस्य).

सांघिक: योगा (पुरूष): मनन नरेंद्रकुमार कासलीवाल, अभिजीत तात्यासो सावंत, अनिकेत अरुण म्हेत्रे, ऋषीराज बापूसो माने, घननीळ दादाराव लोंढे आणि ओंकार विष्णू दाभोळे (सर्वांना रौप्य).


Wednesday, 1 June 2022

काश्मीर विद्यापीठात ‘स्तुति’ उपक्रमाची सांगता; दीडशे संशोधकांनी घेतला लाभ

 

श्रीनगर येथे स्तुति उपक्रमाच्या सांगता समारंभात काश्मीर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. निलोफर खान यांच्यासमवेत प्रा. राकेश सेहगल व प्रा. आर.जी. सोनकवडे.


कोल्हापूर, दि. १ जून: येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकारातून श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठात आयोजित स्तुतिप्रशिक्षण उपक्रमाची बुधवारी (दि. २९ मे) यशस्वी सांगता झाली.

शिवाजी विद्यापीठ आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहयोगातून दि. २३ ते २९ मे या कालावधीत श्रीनगरच्या काश्मीर विद्यापीठात स्तुति (STUTI) प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. सात दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमा दीडशे प्राध्यापक व विविध संस्थांतील संशोधक, विद्यार्थी सहभागी झाले. प्रशिक्षणात १४ तज्ज्ञ प्राध्यापकांनी अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरणांच्या तांत्रिक बाबी आणि वापराच्या अनुषंगाने २६  मार्गदर्शनपर व्याख्याने दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सैफ-सीएफसी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी सैफ-सीएफसीमध्ये उपलब्ध विविध अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरणांचे प्रकार, तांत्रिक बाबी, मूलभूत तत्त्वे, वापरण्याच्या पद्धती तसेच औद्योगिक क्षेत्रांसाठीचे त्यांचे उपयोजन याविषयी मार्गदर्शन केले. या आधुनिक उपकरणांचा जम्मू-काश्मिरी भागातील संशोधक औद्योगिक क्षेत्रांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी 'सृष्टी'  वेब पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी व इतर संबंधित प्रक्रियेची माहितीही दिली.

या उपक्रमांतर्गत गुलमर्ग येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेस क्षेत्रीय भेट (एक्झर्शन टूर) देण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते प्रा. ए. एच. कॉम्प्टन यांनी या प्रयोगशाळेत काम केले होते. या भेटीत लाईटिंग प्रेडिक्शन या विषयावर व्याख्यान आणि प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमाच्या सांगता समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनगर एनआईटीचे संचालक प्रा. राकेश सेहगल, काश्मीर विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती डॉ. निलोफर खान, भौतिकशास्त्र विभागप्रमुख बशरत वांत, स्तुति प्रशिक्षण उपक्रमाचे चेअरमन प्रा. फराक मीर उपस्थित होते.