Tuesday, 12 July 2022

राज्यभरातील ५४ शेतकरी देताहेत रेशीमशास्त्राची परीक्षा

 

शिवाजी विद्यापीठात रेशीमशास्त्र पदविका परीक्षेसाठी राज्यभरातून उपस्थित शेतकरी विद्यार्थी


कोल्हापूर, दि. १२ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आजपासून रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका आणि पदविका या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ झाला. विशेष बाब म्हणजे या ऑफलाईन परीक्षेसाठी अगदी सिंधुदुर्गापासून ते चंद्रपूरपर्यंतचे ५४ शेतकरी विभागात उपस्थित राहिले आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरिकल्चरची स्थापन सन २०१७-१८मध्ये करण्यात आली. त्यावेळी सेंटरमध्ये रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षापासूनच या अभ्यासक्रमांना राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. अगदी मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रवेश घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमांसाठी दहा हजार रुपये इतके शुल्क भरून शेतकरी प्रवेश घेतात आणि परीक्षाही देतात. यंदाही सिंधुदुर्गपासून ते चंद्रपूरपर्यंतचे शेतकरी प्रवेशित झाले आहे. सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकरी विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहिले आहेत. या तरुण शेतकऱ्यांकडे रेशीमशेतीतील अनेक कौशल्य आहेत. तथापि अधिक शास्त्रीय कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड मिळाल्यास रेशीमशेतीमध्ये कोशांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविता येते. तसेच, शास्त्रीय ज्ञान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम शेतीतील आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या एकूण उत्पादनात आणि अर्थशास्त्रात मोठा बदल होतो. याच कारणांसाठी शेतकऱ्यांमध्ये हा अभ्यासक्रम लोकप्रिय झाला आहे. या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे रेशीमशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी शेतकरी अवघा सहावी उत्तीर्ण आणि त्याला रेशीमशेतीतील तीन वर्षांचा अनुभव असला तरी प्राधान्याने प्रवेश देण्यात येतो. या वर्षी अशा ५४ शेतकऱ्यांनी प्रवेश घेतला आणि सध्या ते परीक्षा देत आहेत.

या बाबत अधिक माहिती देताना सेंटरचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव म्हणाले, सर्व शेतकरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात आहेत. ते इथे हजर झाले, हीच या अभ्यासक्रमाच्या यशाची पोचपावती आहे, असे मी मानतो. या अभ्यासक्रमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांची उद्यमशीलता, व्यावसायिकता आणि स्वावलंबन हे गुणही शेतीतून सिद्ध करतात. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी त्यासाठी केलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले.

Tuesday, 5 July 2022

जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता भारतात: डॉ. नारायणन

 

वेल्लोर येथील स्तुति कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी (डावीकडून) संचालक डॉ. ए. राजा अन्नामलाईसहयोगी अधिष्ठाता डॉ. अरुण टॉम मॅथ्यूडॉ. आर. जी. सोनकवडेइस्रो (तिरुअनंतपुरम)चे समूह संचालक (मटेरिअल्स, व्हीएसएससी) डॉ. रमेश नारायणनमाजी अधिष्ठाता डॉ. आर. वासुदेवन आणि अधिष्ठाता डॉ. देवेंद्रनाथ रामकुमार.


वेल्लोर येथे स्तुति कार्यशाळेचे उद्घाटन

कोल्हापूर/वेल्लोर, दि. ५ जुलै: भारतामध्ये सन २०३० पर्यंत वार्षिक ५०० अब्ज अमेरिकी डॉलरइतक्या उलाढालीचे जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन इस्रोच्या तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे मटेरियल मॅनेजमेंट संचालक डॉ. पी. रमेश नारायणन यांनी काल (दि. ४) वेल्लोर (तमिळनाडू) येथे केले.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे (डीएसटी) प्रायोजित आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुति (सिनर्जिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) योजनेअंतर्गत ४ ते ११ जुलै या कालावधीत सातदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नारायणन बोलत होते.

डॉ. नारायणन् म्हणाले, मेक इन इंडियाउपक्रमाच्या सहाय्याने भारत अत्याधुनिक उत्पादनांचे केंद्र म्हणून वेगाने सामोरा येतो आहे. याचे कारण म्हणजे जागतिक बलाढ्य उद्योगांनी एक तर भारतात उत्पादन प्रकल्प स्थापन केले आहेत किंवा ते स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहेत. भारत सरकार देशातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी निकोप वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम व योजना राबवित आहे. त्याचा नजीकच्या काळात भारताला निश्चितपणे लाभ होणार आहे. जागतिक पटलावर भारत हा एक महत्त्वाचे उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळेल.

या उद्घाटन समारंभात शिवाजी विद्यापीठाच्या सैफ विभागाचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी अत्याधुनिक उपकरणे वापरून संरचनात्मक वैशिष्ट्यीकरण” या विषयावर व्याख्यान दिले. तत्पूर्वी, अधिष्ठाता डॉ. देवेंद्रनाथ रामकुमार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग अँड रिसर्चचे संचालक व कार्यशाळेचे समन्वयक डॉ. ए. राजा अन्नामलाई यांनी कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ.आर.वासुदेवन यांनी आभार मानले.

 


Friday, 1 July 2022

विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनासाठी

प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्याकडून भरीव देणगी

शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांच्याकडे देणगी निधी सुपूर्द करताना प्राचार्य श्रीधर हेरवाडे.
 

कोल्हापूर, दि. १ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी ज्येष्ठ प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बृहत देणगी दिली आहे. गुरूपुष्यामृत दिनी भगवान महावीर अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. विजय ककडे यांच्याकडे त्यांनी हा निधी सुपूर्द केला. 

प्राचार्य हेरवाडे भगवान महावीर अध्यासनाच्या सल्लागार समितीवर मार्गदर्शक असून त्यांनी जैन धर्म तत्वज्ञान यावर विपुल लिखाण केले आहे. व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या या देणगीबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, देणगी संकलन समितीचे अध्यक्ष डॉ. जे. एफ. पाटील तसेच वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांनी धन्यवाद दिले आहेत.

भगवान महावीर अध्यासनाच्या भव्य इमारत बांधकामास सर्व दानशूर, अहिंसाप्रेमी व्यक्ती व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन डॉ. विजय ककडे यांनी केले आहे. सदर देणगी आयकर सवलतीस शंभर टक्के पात्र असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा विद्यापीठात गुणगौरव

 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत संलग्नित गुणवंत महाविद्यालयांचे प्राचार्य.


कोल्हापूर, दि. १ जुलै: सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील 'शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती'प्राप्त गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा आणि अधिविभाग प्रमुखांचा गुणगौरव समारंभ काल (दि. ३०) सायंकाळी विद्यापीठात संपन्न झाला.

वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत प्रमुख उपस्थित होते.

या समारंभा एकूण नऊ महाविद्यालये आणि एका अधिविभागाचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग, शिवराज कॉलेज ऑफ आर्टस् ॲन्ड कॉमर्स डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंगलज, दुधसाखर महाविद्यालय, बिद्री, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर, डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्ल, पद्मभुषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, कवठे महांकाळ (सांगली),  मानव्यशास्त्र विद्याशाखेतून दि न्यू कॉलेज, कोल्हापूर, डी. आर. माने महाविद्यालय, कागल, पद्मभुषण डॉ. क्रांतीवीर नागनाथअण्णा नाईकवडी आर्टस् कॉलेज, झरे तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतून डेक्कन कॉलेज ऑफ इंटिरीअर डिझाईन, कोल्हापूर यांचा समावेश होता. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देन गौरव करण्यात आला. यात डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. एम.के. पाटील, डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. व्ही.ए. पाटील, डॉ. एस.डी. पाटील, डॉ. एस.एम. कदम, डॉ. ए.बी. कोळेकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले, तर उपकुलसचिव श्रीमती बी.एम. नाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. पदव्युत्तर प्रवेश विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वसंतराव नाईक यांची शिवाजी विद्यापीठात जयंती

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. पी.एस. पांडव, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. आर.व्ही. गुरव, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. व्ही.वाय. धुपदाळे, अॅड. अनुष्का कदम.

शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण करताना सेवानिवृत्त कर्मचारी धनाजी कुंडले. सोबत कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी.

शिवाजी विद्यापीठात वृक्षारोपण करताना सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी मोरे. सोबत कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी.


कोल्हापूर, दि. १ जुलै: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. व्ही.वाय. धुपदाळे, विधी अधिकारी अनुष्का कदम यांच्यासह अन्य अधिकारी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

यानंतर आजच्या कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या खुल्या व्यायामशाळा परिसरामध्ये विद्यापीठाच्या मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये धनाजी कुंडले, शिवाजी मोरे यांचा समावेश राहिला. यापुढील काळात विद्यापीठाच्या प्रत्येक सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हस्ते निवृत्तीच्या दिवशी एक रोप लावण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी कुलगुरू व प्र-कुलगुरूंसह अन्य अधिकाऱ्यांनीही रोपे लावली. यात जांभूळ व बहावाच्या ४० रोपांचा समावेश आहे. विद्यापीठाचा उद्यान विभाग व अभियांत्रिकी विभाग यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

Wednesday, 29 June 2022

शिवाजी विद्यापीठाकडून कानपूर विद्यापीठास राजर्षी शाहू चरित्रग्रंथ भेट

 

डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू चरित्रग्रंथाचा हिंदी अनुवाद ग्रंथ कानपूरच्या छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने भेट देताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती. शेजारी (डावीकडे) शिवाजी विद्यापीठाचे प्रा. अविनाश भाले. 


नवसंबंधांची अनोखी सुरवात; शाहू जयंतीला प्रा. अविनाश भाले प्रमुख बीजभाषक

कोल्हापूर, दि. २९ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील शिवाजी विद्यापीठ आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथील छत्रपती शाहू जी महाराज युनिव्हर्सिटी यांच्यातील सहसंबंधांची एक अनोखी सुरवात झाली. शिवाजी विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशक धोरण केंद्रातील प्रा. अविनाश भाले यांना कानपूर विद्यापीठाने शाहू जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात बीजभाषक म्हणून विशेष आमंत्रित केले. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कानपूर विद्यापीठास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित व हिंदी अनुवादित शाहू चरित्र ग्रंथ भेट देण्यात आला. कानपूरच्या विद्यापीठात दाखल झालेले हिंदीमधील हे पहिलेच शाहू चरित्र ठरले. त्याबद्दलची कृतज्ञता कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांनी जाहीररित्या व्यक्त केली.

१०२ वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज कानपूर येथे आले असता त्यांच्या कर्तृत्वाने व वाणीने प्रभावित झालेल्या कानपूरच्या जनतेने महाराजांना राजर्षी ही उपाधी बहाल करून त्यांचा गौरव केला. त्या कानपूरमध्ये राजर्षींच्या नावे असणाऱ्या विद्यापीठाशी स्नेहबंधांचा एक नवा अध्याय आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या साक्षीने शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू होतो आहे.

कानपूर येथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठात स्कूल ऑफ आर्ट्स ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्सेसतर्फे आयोजित शाहू जयंतीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती होते, तर प्रा. अविनाश भाले हे बीजभाषक अर्थात प्रमुख वक्ते होते. आपल्या बीजभाषणात प्रा. भाले यांनी शाहूंची राजवट स्वतंत्र भारतासाठी आदर्श ठरली आणि त्यांनी राबवलेली समावेशक धोरणे आणि योजना आजही देशास मार्गदर्शक असल्याचे सांगितले. शाहू महाराजांची सामाजिक धोरणे, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरणे याबाबत मांडणी करता शाहू महाराजांची सामाजिक, आर्थिक शैक्षणिक क्षेत्रांतील समावेशी धोरणे ही त्यांच्या कुशल राज्यकारभाराचे मूळ आहे, अशी मांडणी त्यांनी केली. ती उपस्थितांना खूपच भावली. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कानपूर विद्यापीठास डॉ.जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू चरित्रग्रंथाचा हिंदी अनुवाद भेट देण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले छत्रपती शाहू महाराजांचे वंशज त्यांचे नातू व माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्रस्टच्या वतीने विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि कानपूर विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करून दोन विद्यापीठे आणि शहरे जोडण्याचा प्रस्तावही त्यांनी या प्रसंगी मांडला. या कार्यक्रमात कुलपती आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल ऑनलाइन सहभागी झाल्या. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांनी सामाजिक कुप्रथा निर्मूलनासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

कुलगुरू प्रा. विनयकुमार पाठक यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जातिवाद, प्रादेशिकता, धर्मवाद यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. डॉ.पतंजली मिश्रा यांनी चर्चासत्राची रूपरेषा मांडली आणि डॉ.मानस उपाध्याय यांनी संचालन केले. कुलसचिव डॉ.अनिलकुमार यादव यांनी आभार मानले.

Sunday, 26 June 2022

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना मान्यवर आणि उपस्थित.

कोल्हापूर, दि. २६ जून: शिवाजी विद्यापीठात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, डॉ. भारती पाटील, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. अवनिश पाटील, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. सोमनाथ पवार, 'कास्ट्राईब'चे आनंद खामकर आदींसह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर मान्यवरांनी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्र येथेही महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.