Showing posts with label Sericulture. Show all posts
Showing posts with label Sericulture. Show all posts

Tuesday, 12 July 2022

राज्यभरातील ५४ शेतकरी देताहेत रेशीमशास्त्राची परीक्षा

 

शिवाजी विद्यापीठात रेशीमशास्त्र पदविका परीक्षेसाठी राज्यभरातून उपस्थित शेतकरी विद्यार्थी


कोल्हापूर, दि. १२ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आजपासून रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका आणि पदविका या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ झाला. विशेष बाब म्हणजे या ऑफलाईन परीक्षेसाठी अगदी सिंधुदुर्गापासून ते चंद्रपूरपर्यंतचे ५४ शेतकरी विभागात उपस्थित राहिले आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरिकल्चरची स्थापन सन २०१७-१८मध्ये करण्यात आली. त्यावेळी सेंटरमध्ये रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षापासूनच या अभ्यासक्रमांना राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. अगदी मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रवेश घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमांसाठी दहा हजार रुपये इतके शुल्क भरून शेतकरी प्रवेश घेतात आणि परीक्षाही देतात. यंदाही सिंधुदुर्गपासून ते चंद्रपूरपर्यंतचे शेतकरी प्रवेशित झाले आहे. सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकरी विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहिले आहेत. या तरुण शेतकऱ्यांकडे रेशीमशेतीतील अनेक कौशल्य आहेत. तथापि अधिक शास्त्रीय कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड मिळाल्यास रेशीमशेतीमध्ये कोशांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविता येते. तसेच, शास्त्रीय ज्ञान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम शेतीतील आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या एकूण उत्पादनात आणि अर्थशास्त्रात मोठा बदल होतो. याच कारणांसाठी शेतकऱ्यांमध्ये हा अभ्यासक्रम लोकप्रिय झाला आहे. या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे रेशीमशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी शेतकरी अवघा सहावी उत्तीर्ण आणि त्याला रेशीमशेतीतील तीन वर्षांचा अनुभव असला तरी प्राधान्याने प्रवेश देण्यात येतो. या वर्षी अशा ५४ शेतकऱ्यांनी प्रवेश घेतला आणि सध्या ते परीक्षा देत आहेत.

या बाबत अधिक माहिती देताना सेंटरचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव म्हणाले, सर्व शेतकरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात आहेत. ते इथे हजर झाले, हीच या अभ्यासक्रमाच्या यशाची पोचपावती आहे, असे मी मानतो. या अभ्यासक्रमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांची उद्यमशीलता, व्यावसायिकता आणि स्वावलंबन हे गुणही शेतीतून सिद्ध करतात. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी त्यासाठी केलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले.

Friday, 11 February 2022

रेशीमशास्त्रज्ञ डॉ. ए.डी. जाधव यांना

क्युबा सरकारचा इनोव्हेशन पुरस्कार

क्युबाच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या हस्ते डॉ. ए.डी. जाधव यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना क्युबा येथील राष्ट्रीय रेशीमशेती प्रकल्पाच्या व्यवस्थापक अदिलैदिस रुईझ बार्सेनाज.


कोल्हापूर, दि. ११ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरीकल्चरचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव यांनी क्युबा देशाच्या रेशीमविषयक विकासामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना क्युबा सरकारने इनोव्हेशन पुरस्काराने गौरविले आहे.

डॉ. ए.डी. जाधव
डॉ. जाधव हे सन २०१२ पासून क्युबा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाच्या रेशीमशेतीच्या माध्यमातून शाश्वत विकासविषयक धोरणाचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मंत्रालयाच्या डेव्हलपमेंट ऑफ दि व्हॅल्यू चेन ऑफ सेरीकल्चर इन क्युबा ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट या प्रकल्पावर ते मार्गदर्शक वैज्ञानिक म्हणूनही काम पाहात आहेत. त्यांच्या या योगदानाच्या गौरवाप्रित्यर्थ क्युबा सरकारतर्फे इनोव्हेशन अॅवॉर्ड-२०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

गेल्या २ फेब्रुवारी रोजी हवाना येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. क्युबाचे विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण उपमंत्री जोस फिडेल सन्ताना न्युएझ यांच्या हस्ते आणि क्युबाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रथम सचिव लुई अँटोनिओ टोरस इरिबर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. डॉ. जाधव यांच्या वतीने क्युबा येथील राष्ट्रीय रेशीमशेती प्रकल्पाच्या व्यवस्थापक अदिलैदिस रुईझ बार्सेनाज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. क्युबातील भारतीय राजदूत सर्वेसर्वन जानकीरामन यांनी डॉ. जाधव यांच्या क्युबातील प्रकल्पस्थळास सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे डॉ. जाधव यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे दूरध्वनीवरून अभिनंदनही केले.

या संदर्भात क्युबा येथील सेंटर फॉर रिसर्च इन प्रोटिन प्लँट्स अँड बायोनॅचरल प्रोडक्ट्सच्या सरसंचालक डॉ. मारिया डेल कार्मेन पेरेझ हमांडेझ यांच्याकडून डॉ. जाधव यांना प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे की, क्युबातील रेशीमशेती विकासाच्या मूल्य शृंखलेमध्ये झालेल्या प्रक्रिया, तांत्रिक, उत्पादन आणि संस्थात्मक नवकल्पना राबविण्यासाठी डॉ. जाधव यांनी घेतलेल्या परिश्रमाच्या परिणामस्वरुप हा पुरस्कार दिला आहे. त्यांनी राबविलेल्या प्रमुख नवसंकल्पनांमध्ये तुतीच्या उत्पादनासाठीचे तंत्रज्ञान, रेशीम कीटक वाढवण्याची पद्धती, रेशीम कीटकांची अंडी उत्पादनाची पद्धत, रोगांचे नियंत्रण आणि प्रतिबंध, कोश सुकवणे आणि रेशीमधागे मिळवणे या बाबींचा समावेश राहिला. सदर प्रकल्पाद्वारे प्राप्त होणारी सर्व उत्पादने स्थानिक विकासात योगदान देतात आणि आर्थिक सामाजिक लाभावर सकारात्मक परिणाम घडवित आहेत. या सर्व बाबींसाठी, भारतासोबतच्या आणि विशेषत: डॉ. जाधव यांच्या सहकार्याचे महत्त्व आहे. त्यासाठी त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

अभिमानास्पद योगदान: कुलगुरू डॉ. शिर्के

डॉ. ए.डी. जाधव हे गेली अनेक वर्षे क्युबा सरकारला रेशीमशेतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा लाभ तेथील शेतकऱ्यांसह स्थानिक उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर होत आहे, ही बाब महत्त्वाची आहे. त्यांच्या योगदानाचा तेथील सरकारकडून पुरस्कार देऊन झालेला गौरव हा शिवाजी विद्यापीठासाठी आणि भारतासाठीही अभिमानास्पद क्षण आहे. 

Thursday, 13 June 2019

महाराष्ट्राच्या रेशीम सल्लागार समितीवर

डॉ. ए. डी. जाधव यांची निवड



Dr. A. D. Jadhav
कोल्हापूर, दि. १३ जून: महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या रेशीम सल्लागार समितीवर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. डी. जाधव यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग सचिव हे समितीचे अध्यक्ष राहणार असून नागपूरचे रेशीम संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
डॉ. जाधव रेशीमशास्त्र विषयाचे अध्यापन, संशोधन, प्रसार व प्रचार यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. क्युबा या देशासाठीही ते रेशीम सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वांगीण रेशीम विकासाच्या दृष्टीने धोरण तयार करणे, राज्यातील रेशीम विस्तार व विकासासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू इत्यादी राज्यांच्या धर्तीवर तुती रेशीम उद्योगाची आणि झारखंड, छत्तीसगड राज्यांच्या धर्तीवर टसर रेशीमगाठी विकास कार्यक्रमांचा सर्वंकष कृती आराखडा तयार करणे, धोरण तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी कामकाजाची दिशा ठरविणे, राज्यात पैठणी, येवला इत्यादी पारंपरिक कौशल्यावर आधारित रेशीम उत्पादनाचा जागतिक पातळीवर प्रचार करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सेरी-टुरिझम प्रकल्प हाती घेण्यासाठी उपाययोजना सुचविणे आदी कामकाज समितीमार्फत करणे अपेक्षित आहे. सदर समितीने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने रेशीम संचालक सल्लामसलत करून त्याची विस्तृत पृथक्करण व अंमलबजावणी करतील. त्याचप्रमाणे सदर समितीची बैठक दोन महिन्यांतून एकदा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती रेशीम संचालनालयाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.



Thursday, 8 May 2014

रेशीम उद्योगाच्या विकासाला महाराष्ट्रात व्यापक संधी



वस्त्रोद्योग सहसचिव सुधीर कुरसंगे यांचे मत
 कोल्हापूर, दि. ७ मे: महाराष्ट्रात रेशीमउद्योगाच्या विकासाला अतिशय व्यापक संधी उपलब्ध असून त्यादृष्टीने या क्षेत्रातील कुशल व प्रशिक्षित विद्यार्थी घडविण्याचे शिवाजी विद्यापीठात सुरू असलेले काम कौतुकास्पद असल्याचे मत राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा भेटीवर आलेल्या श्री. कुरसंगे यांनी आज सकाळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार आणि प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, उपकुलसचिव बी.बी. पाटील, रेशीमशास्त्र विभागाचे डॉ. ए.डी. जाधव उपस्थित होते.
श्री. कुरसंगे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या खूप मोठ्या लागवडीमुळे आणि उत्पादनामुळे अन्य शेतीकडे तुलनेत कमी लक्ष दिले जाते आहे. तथापि, राज्य शासनाने अल्प खर्चातला आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणाऱ्या रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुद्याळ आणि यळगूड या ठिकाणी सुरू असलेल्या रेशीम प्रकल्पांना भेट देऊन तेथील स्थानिकांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना विविध योजनांच्या साह्याने अधिक काय मदत करता येईल, या दृष्टीने विचार करण्यात येणार आहे. रेशीम क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात शिकविला जातो, ही खूप उत्साहवर्धक बाब आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात निश्चितपणे चांगले भवितव्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. पवार यांनी विद्यापीठ स्तरावर रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल आणि त्यांना शासन कसे सहकार्य करू शकेल, याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलच्या माध्यमातून एखादा अभ्यासक्रम किंवा पथदर्शी प्रकल्प राबविता येईल का, यादृष्टीने विचार करता येईल. विशेषतः विद्यार्थी आणि शेतकरी यांचे साहचर्य या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वृद्धिंगत होण्यासाठी शेतकऱ्यांचे टार्गेट ग्रुप तयार करून त्यांना रेशीम उद्योगाबाबत प्रशिक्षित करता येऊ शकेल. विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांपर्यंत याचे लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालयांचे जाळे त्यासाठी खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.