Saturday, 26 November 2022

सांविधानिक मूल्यांच्या परीघविस्तारातूनच

आधुनिक भारताची भक्कम उभारणी शक्य

‘जगण्यातलं संविधान’ परिसंवादातील सूर

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'जगण्यातलं संविधान' या परिसंवादात बोलताना मुक्ता दाभोलकर. मंचावर (डावीकडून) सचिन पवार, गायत्री लेले, डॉ. राहुल सरवटे, सॅबी परेरा, श्रीकांत देशपांडे आणि संवादक डॉ. दीपक पवार,


कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: सांविधानिक मूल्यांच्या परीघविस्तारातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची भक्कम उभारणी शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित जगण्यातलं संविधान या विशेष परिसंवादामध्ये उमटला.

संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही गप्पा भाग-८ या कार्यक्रमांतर्गत जगण्यातलं संविधान हा विशेष राज्यस्तरीय परिसंवाद विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, स्तंभलेखक सॅबी परेरा, प्राध्यापक डॉ. राहुल सरवटे, कीर्तनकार सचिन पवार आणि प्राध्यापक डॉ. गायत्री लेले सहभागी झाले. मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी संवादक म्हणून परिसंवादाचे समन्वयन केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, संविधानाने दिलेले अधिकार हे आपल्या दैनंदिन जगण्यात अंगिकृत व परावर्तित होणे आवश्यक आहे. संविधानिक मूल्यांना सामाजिक स्वीकारार्हता ही खूप महत्त्वाची बाब आहे. समाजात प्रचलित रुढीपरंपरा, अंधश्रद्धा याविरोधात कायदा हतबल होणे गैर असून संविधानाच्या कलम ५१-अ नुसार वैज्ञनिक मूल्यांचा प्रचार व प्रसार होणे, धार्मिकतेचा अंगिकार वैज्ञानिक विचाराधारित असणे आवश्यक आहे. मूलतः संवैधानिक मूल्यांचा स्वीकार हीच खरी आधुनिक धार्मिकता आहे.

स्तंभलेखक सॅबी परेरा म्हणाले, मी अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगणारा लेखक आहे. तथापि, सध्या भावना ही बाब खूपच संवेदनशील बनलेली आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचा संकोच होऊ लागला आहे. विनोद आणि उपहास त्याला बळी पडताहेत. राज्यघटनेचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, यावर तिचे भलेबुरेपण अवलंबून आहे.

प्रा. राहुल सरवटे म्हणाले, भारतासारखा व्यामिश्र, व्यापक देश ब्रिटीशांकडून पराभूत होण्याचे कारण दोन प्रकारे सांगितले जाते. एक म्हणजे आपल्या प्रथा, परंपरा, रुढींच्या प्रभावामुळे हरलो आणि दुसरे म्हणजे आपण आपल्या प्रथा, परंपरा, रुढींपासून दुरावलो म्हणून हरलो. या दोन उत्तरांमधील आंतरविसंगती दूर करण्याचे काम राज्यघटना करते. समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या आधारे आधुनिक भारताची त्याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या समावेशासह बांधणी घटना करते. आपल्या शिक्षणाचे रुपांतर मूल्यामध्ये होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने देश सुशिक्षणाकडे वाटचाल करेल. राज्यघटना हे सामाजिक नितीमत्तेबद्दलचे विधान आहे.

वर्गशिक्षण व संविधान याबाबत बोलताना डॉ. गायत्री लेले म्हणाल्या, वर्गखोली ही लोकशाहीचा पुरस्कार करणारी जागा आहे. शिक्षकांसाठी वर्गखोली हे सुरक्षितस्थळ आहे. विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी अधिक अर्थपूर्ण व खुलेपणाने चर्चा शक्य असते. संवाद हा त्याचा पाया आहे आणि प्रतिसाद हा त्यातील कळीचा मुद्दा आहे. त्या प्रतिसादातही पारदर्शकता ही महत्त्वाची बाब आहे. हा वर्गातील संवाद अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणे गरजेचे आहे.

कीर्तनकार सचिन पवार म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये स्त्री-पुरूष संतांमधील संवाद हा समतेवर आधारित होता. माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीचे मूल्य मान्य करणे आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा सन्मान करणे हा सर्वसमावेशकतेचा गुण आहे. आज आपण राज्यघटनेच्या आम्ही या मूल्यापासून दूर जात अधिकाधिक व्यक्तीकेंद्री होत चाललो आहोत, हे थांबविले पाहिजे. संविधानाचा व संतविचाराचा मूल्यात्मक गाभा समान आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

परिसंवादानंतर विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे मान्यवरांनी समाधानही केले. पल्लवी जाधव यांनी आभार मानले.

सर्व भेदांपलिकडे माणूस म्हणून समता जपल्यासच

लिंगसमभावाची प्रस्थापना: डॉ. तारा भवाळकर

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

 

डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या कशासाठी? लिंगभाव समतेसाठी या पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन करताना डॉ. तारा भवाळकर, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वंदना खरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह लेखक.

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. मंचावर (डावीकडून) डॉ. दीपक पवार, डॉ. तारा भवाळकर, वंदना खरे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

शिवाजी विद्यापीठात संविधान दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना डॉ. तारा भवाळकर. मंचावर (डावीकडून) डॉ. दीपक पवार,मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, वंदना खरे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार.


कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर: स्त्री, पुरूष अगर तृतीयपंथी आदी भेदांच्या पलिकडे जाऊन जेव्हा आपण माणूस म्हणून समता जपण्यास प्रारंभ करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने लिंगसमभाव प्रस्थापनेच्या दिशेने जाऊ, असे प्रतिपादन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक व विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी आज येथे केले.

संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जगण्यातलं संविधान हा कार्यक्रम विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि साहित्यिक वंदना खरे प्रमुख उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या कशासाठी? लिंगभाव समतेसाठी या पुस्तकाचे डॉ. भवाळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तकाच्या अनुषंगाने बोलताना डॉ. भवाळकर म्हणाल्या, हरेक लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन माणूसपणाची संवेदना जपणे फार महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने सदर पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. नकारात्मकतेकडून सकारात्कमकतेकडे घेऊन जाणारे हे पुस्तक आहे. स्त्री म्हणून आणि माणूस म्हणून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जगताना स्त्रियांच्या अनुभवाचे संचित भल्याबुऱ्या अशा अनेकांगांनी वृद्धिंगत होत जाते. त्यामुळे दिवस साजरीकरणाच्या पलिकडे तिचे दैनंदिन जगणे सुकर आणि सुखकर होईल, या दिशेने काम करण्याची गरज त्यातून अधोरेखित होते. आज आपण साक्षर आहोत, पण सुशिक्षित तेव्हाच होऊ, जेव्हा आपण लिंगभावसमतेकडे वाटचाल करू. वाचाल तर वाचाल, असे म्हटले जाते. मात्र, वाचून आपण जेव्हा विचार कराल, त्या विचाराचा जेव्हा उच्चार कराल आणि उच्चारलेले आचरणात आणाल, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुशिक्षित व्हाल, शहाणे व्हाल आणि अखेरीस यशस्वी व्हाल. लिंगसमभाव हे संविधानास अभिप्रेत असणारे मूल्य जपणे त्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

एक महत्त्वाचे विद्रोही पुस्तक अशा शब्दांत वर्णन करताना साहित्यिक वंदना खरे म्हणाल्या की, सामान्य नागरिकांचे लिंगभावसमतेविषयीचे मनोगत आणि अनुभवकथनाचे संकलन एवढेच या पुस्तकाचे महत्त्व नाही, तर संविधानाला अभिप्रेत समता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल आणि मूल्य त्यातून जपले गेले आहे. या पुस्तकात स्त्रियांबरोबरच एक तृतीयपंथी व दोन पुरूषांची मनोगतेही आहेत. या पुस्तकाने त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली. ही केवळ स्त्रियांची रडगाणी नाहीत, तर जगताना, सोसताना त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारला आहे आणि त्याची खणखणीत उत्तरेही दिलेली आहेत, हे महत्त्वाचे. खासगी अनुभव सार्वजनिकरित्या मांडणे, ही धैर्याची बाब आहे. हे धैर्य यातील लेखकांनी दाखविले आहे आणि डॉ. दीपक पवार यांनी त्यांचे साक्षेपी संपादन केले आहे व अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहीली आहे. एक महत्त्वाचे दस्तावेजीकरण महाराष्ट्र शासनाने या माध्यमातून केले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी संविधान व मतदार जागृतीच्या अनुषंगाने विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि निवडणूक कक्ष यांच्या माध्यमातून राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत विद्यापीठातील विशेष केंद्रामध्ये १५० विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुढील काळात आदिवासी, दिव्यांग, तृतीयपंथी आदी वंचित समाजघटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक करीत असताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणुकीच्या पलिकडे विद्यार्थ्यांत लोकशाहीच्या जाणिवा निर्माण करण्याच्या दृष्टीने असे जागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, निवडणूक कक्ष समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह अधिविभागांतील व महाविद्यालयांतील शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Saturday, 19 November 2022

शिवाजी विद्यापीठात इंदिरा गांधी जयंती



कोल्हापूर, दि. १९ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात आज भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिंसा व एकतेची शपथ घेण्यात आली. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, समाजशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. आर.बी. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Friday, 18 November 2022

“विद्यापीठ आपुले जगी गर्जू दे...”

शिवाजी विद्यापीठाचा ६० वा वर्धापनदिन उत्साहात; विद्यापीठ गीताचे लोकार्पण

 


शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. शेजारी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत आणि विद्यापीठाचे अधिकारी.

१)      महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठ गीताचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना सन्माननीय अतिथी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे व दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रकाश शंकर कांबळे. मंचावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना डॉ. उत्तम कोंडिबा सकट.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना धैर्यशील विजयसिंह यादव.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना सदानंद विठ्ठल लोखंडे.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना बाळू गोविंद नलवडे.

महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. शिवाजी मुरलीधर भोसले (कराड).

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना चेतन कृष्णात पाटोळे.

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना दत्तात्रय जगन्नाथ खराडे.

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. आण्णा काका पाटील (कराड).

कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार स्वीकारताना डॉ. उषा बाहुबली पाटील.


विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली

- मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

 

कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाने गेल्या साठ वर्षांत शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात तर प्रगती केलीच, पण त्याचबरोबरीने सामाजिक बांधिलकीही प्राधान्याने जोपासली, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत तर अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ गीताचे लोकार्पण करण्यात आले. या गीताचे गीतकार प्रा. गोविंद काजरेकर व प्रा. प्रविण बांदेकर व संगीतकार अमित साळोखे यांच्यासह गायक कलाकारांचा सत्कारही मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

आज विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार अर्थशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रकाश शंकर कांबळे यांना देण्यात आला. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. आण्णा काका पाटील (कराड) यांना, तर कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार डॉ. उषा बाहुबली पाटील (कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची स्थापना करीत असताना स्व. यशवंतराव चव्हाण यांनी छोट्यात छोट्या गावातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत उच्चशिक्षणाची गंगा नेण्याचे स्वप्न बाळगले होते. यशवंतरावांचे ते स्वप्न विद्यापीठाने पूर्ण केलेच. शिवाय, विद्यापीठाचा लौकिक देशविदेशांतही उंचावला. शिक्षण व संशोधनात शिवाजी विद्यापीठ आज अग्रेसर आहे. मात्र, विद्यापीठाची सामाजिक बांधिलकीही कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या कालखंडातील कार्य असो की महापूरकाळात लोकांना दिलासा देण्याचे काम असो, विद्यापीठाने ही कामे अत्यंत आत्मियतेने केली.

मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतीने करण्याच्या दिशेने आता शिवाजी विद्यापीठाने काम करावे. या धोरणामधील विविध उच्चशिक्षणाच्या व कौशल्यविकासाच्या संधींचा विकास आणि लाभ विद्यार्थ्यांपर्यंत आणि व्यापक समाजघटकांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने काम करणे अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे डिजीलॉकरसारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थीभिमुखता विकसित करण्यासाठीही प्रयत्न करावेत.

शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक करून मंत्री श्री. पाटील म्हणाले, अलीकडेच शासनाने युनिसेफसमवेत एक महत्त्वाचा करार केला. याअंतर्गत जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा विकास करण्यासाठी बहुस्तरित प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून या सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे.

मत्स्यालयासाठी लागणारा सर्व निधी देऊ: मंत्री श्री. पाटील

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय उभारण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्या अनुषंगाने बोलताना मंत्री श्री. पाटील यांनी, शिवाजी विद्यापीठाने यासाठीचा सर्वंकष प्रस्ताव शासनाला सादर करावा. त्यासाठी लागणाऱ्या सर्व निधीची तरतूद ही राज्य शासनामार्फत करण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. त्याचप्रमाणे कौशल्य विकास, विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे, त्यांना सुरक्षा व प्रतिकाराचे प्रशिक्षण यांसह काही अभिनव उपक्रम असतील, तर त्यासाठीही प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांना केले.

 

कृषी व अकृषी विद्यापीठांत सुसंवाद वृद्धिंगत व्हावा: कुलगुरू डॉ. सावंत

वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. सावंत म्हणाले, महाराष्ट्रात कृषी व अकृषी विद्यापीठे ही विशिष्ट हेतूने निर्माण करण्यात आली आहेत. तथापि, उभय विद्यापीठांमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन तो वृद्धिंगत होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने वर्धापनदिन समारंभास प्रथमच कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आमंत्रित करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. अकृषी विद्यापीठांमध्ये मूलभूत संशोधन मोठ्या प्रमाणावर चालते, तर कृषी विद्यापीठांत उपयोजित संशोधनावर भर असतो. या पार्श्वभूमीवर, येथील मूलभूत संशोधनाचे उपयोजित संशोधनात व तंत्रज्ञानात रुपांतर करून त्याचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी काल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या जानेवारी २०२३मध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भातील सामंजस्य करार करण्यासाठी कुलगुरू डॉ. शिर्के यांना त्यांनी आमंत्रितही केले. शिवाजी विद्यापीठात आधुनिक मत्स्यालय उभारण्याचे डॉ. शिर्के यांचा मानस आहे. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

 

विद्यार्थीकेंद्री उपक्रमांत विद्यापीठ आघाडीवर: कुलगुरू डॉ. शिर्के

यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविण्यामध्ये शिवाजी विद्यापीठ सदैव आघाडीवर असून नवनवीन शैक्षणिक व संशोधकीय उपक्रमांचे लाभ विद्यार्थ्यांना करवून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. नवे शैक्षणिक धोरण राबविण्याच्या दिशेनेही विद्यापीठाने बरीचशी आघाडी घेतली असून अभ्यासक्रमांत बहुद्वार प्रवेश व बहुद्वार निर्गमनाची सुविधाही विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यापीठाने आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम सुविधा धोरण स्वीकारले असून त्याचे लाभ  विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. अर्थशास्त्रात एकात्मिक बी.एस्सी.-एम.एस्सी. अभ्यासक्रम, विद्यापीठ स्तरावर बीसीए-एमसीए अभ्यासक्रमाची सुरवात ही त्याची काही उदाहरणे आहेत. सध्या विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग स्वायत्त झाला असून नजीकच्या काळात विज्ञानाकडीलही काही अधिविभाग स्वायत्त होतील. एकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्समध्ये साठ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. उर्वरित नोंदणीही लवकरच पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, संशोधनवृत्ती, पोस्ट-डॉक शिष्यवृत्ती आदी प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. मातृभाषेतून शिक्षणाचा भाग म्हणून कायदा विषयाच्या परीक्षा इंग्रजीसह मराठीतून घेण्यास सुरवात केली आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मंत्री श्री. पाटील यांनी मत्स्यालयासाठी निधी देण्याच्या घोषणेचे स्वागत केले. त्याचप्रमाणे विद्यापीठ कॅम्पसवर विद्यार्थिनींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक झाली असून वसतिगृहे अतिरिक्त असूनही पुरेशी पडत नसल्याची बाब निदर्शनास आणली. विद्यार्थिनी वसतिगृहासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी या प्रसंगी केली. कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा वेधही थोडक्यात घेतला.

या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्याचबरोबर 'नॅक'चे +’ मानांकन मिळविणाऱ्या देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर व आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे आणि '' मानांकन मिळविणाऱ्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, उरूण-इस्लामपूर, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी, मालती वसंतदादा पाटील कन्या कॉलेज, उरूण-इस्लामपूर आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, सातारा या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.

 

उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार नॅनोसायन्स व ग्रंथालयशास्त्र अधिविभागांस!

शिवाजी विद्यापीठाने सन २०१९पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठीचा पुरस्कार स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभाग यांना देण्यात आला.

'विद्यापीठ आपुले जगी गर्जू दे...' विद्यापीठ गीताचे टाळ्यांच्या गजरात स्वागत

कीर्ती तुझी मंगलमय स्मरणी असू दे, ज्ञान हेच अमृत हे ब्रीद असू दे... विद्यापीठ आपुले जगी गर्जू दे... या विद्यापीठ गीताचे मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर सर्व उपस्थितांना टाळ्यांच्या गजरात गीताचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी या गीताप्रती आदरभाव व्यक्त करताना उभे राहून सामूहिक गायन केले.

 

वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: डॉ. प्रकाश शंकर कांबळे, अर्थशास्त्र अधिविभाग

विद्यापीठातील गुणवंत सेवक:

१. डॉ. उत्तम कोंडिबा सकट, सहाय्यक कुलसचिव, लेखा विभाग

२. धैर्यशील विजयसिंह यादव, वरिष्ठ सहायक, पगापत्रके विभाग

३. सदानंद विठ्ठल लोखंडे, वाहनचालक, वाहन विभाग

४. बाळू गोविंद नलवडे, हावलदार, संलग्नता टी-२ विभाग

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:

१. डॉ. प्रवीण नारायण चौगुले, डी.आर. माने महाविद्यालय, कागल

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक:

१.      डॉ. शिवाजी मुरलीधर भोसले, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कराड

महाविद्यालयीन गुणवंत सेवक:

१. चेतन कृष्णात पाटोळे, प्रयोगशाळा सहाय्यक, न्यू कॉलेज, कोल्हापूर

२. दत्तात्रय जगन्नाथ खराडे, ग्रंथालय परिचर, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (जि. सातारा)

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. आण्णा काका पाटील, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड

कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका: डॉ. उषा बाहुबली पाटील, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव निधीपैकी ५.३५ कोटी रुपयांचा निधी कालच शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान व राष्ट्रगीत सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील, सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले आवर्जून उपस्थित होते.

तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. शरद बनसोडे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.