Thursday, 29 December 2022

आशियाई देशांतील प्रश्नांकडे मानवतावादी भूमिकेतून पाहणे आवश्यक: जतीन देसाई

 


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई. मंचावर (डावीकडून) डॉ. सुखदेव उंदरे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. प्रकाश पवार.


कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: आशियाई उपखंडातील विविध देशांमधील परस्परसंबंध तणावग्रस्त झाले आहेत. या देशांतील प्रश्नांकडे भारतासह जगाने मानवतावादी भूमिकेतून पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक व आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक जतीन देसाई यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागात या वर्षी नव्याने सुरु करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संबंध व सुरक्षा या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांतर्गत आशिया खंडातील आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयावर श्री. देसाई यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार प्रमुख उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, रशिया युक्रेन युद्धामुळे आशिया प्रत्यक्षपणे प्रभावित झाला आहे. आशियाई देशांच्या राजकीय तसेच आर्थिक सहसंबंधांवर याचा स्वाभाविक परिणाम दिसून येतो आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान, इराण, म्यानमार या देशांमध्येही अस्वस्थ वातावरण आहे. त्याचाही परिणाम या समस्त विभागावर होतो आहे. आशियातील आंतरराष्ट्रीय संबंध संतुलित राखण्यामध्ये भारताने नेहमीच प्रभावी भूमिका बजावली आहे. यापुढील काळातही या समस्यांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

श्री. देसाई यांनी आपल्या मांडणीमध्ये आशिया खंडातील आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत विस्तृत चर्चा केली तसेच आशिया, दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशियामधील अनेक देशांच्या परस्परसंबंधांवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी भारताचे विविध देशांशी असलेले सामाजिक, राजकीय, व्यापारी, संघर्षपूर्ण तथा मैत्रीपूर्ण संबंध याविषयीही विस्तृत मांडणी केली. याशिवाय, जागतिक महासत्तांच्या अनुषंगाने अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या भूमिकांवरही प्रकाशझोत टाकला.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, जागतिक स्तरावर घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घटनेचा सूक्ष्मपणे अभ्यास केला तर त्याचा संबंध प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अर्थकारणाशी असल्याचे दिसते. चीनचे अफगाणिस्तानवरील प्रेम हे प्रामुख्याने अफगाणिस्तानात असलेल्या व संपुष्टात येत चाललेल्या लिथियमसारख्या दुर्मिळ खनिज संपत्तीमुळे आहे. त्यामुळे व्यापार, अर्थकारण याच्यातून सारे जग कळसूत्री बाहुलीसारखे चालविले जाते की काय, याचा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे.

यावेळी डॉ. सुखदेव उंदरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. नेहा वाडेकर यांनी आभार मानले.

छत्रपतींचा आदर्श घेऊन माती, माणसं वाचा; संस्कृती जाणून घ्या: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहिमेस प्रारंभ

पन्हाळा येथे वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

पन्हाळा येथे वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यासमोर फ्लॅग-ऑफ करून शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेस प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत प्राचार्य एस.आर. पाटील, डॉ. महादेश देशमुख, डॉ. पी.टी. गायकवाड, अभय जायभाये आदी.

पन्हाळा येथे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि मान्यवर.

पन्हाळा येथे शिवाजी विद्यापीठाच्या शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि मान्यवर.


कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: जी माती आणि माणसं वाचून छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहास घडविला, तो आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनीही आपली संस्कृती जाणून घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल पन्हाळा येथे केले.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली (ता. शिराळा, जि. सांगली) यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीमेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिव पावन प्रेरणा मोहीम ही विद्यार्थ्यांत नवी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आयोजित केलेली आहे. महाराष्ट्राचा देदिप्यमान इतिहास असणारी पावनखिंड विद्यार्थ्यांसाठी नित्य प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात धर्म न मानता सर्व घटकांना आपलेसे केले. गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन केला. या विश्वासाला तडा जाणार नाही, असे आचरण राखले. इतरांना त्याची शिकवण दिली. यामधूनच महाराष्ट्राची उभारणी झाली. विद्यार्थ्यांनी पन्हाळा ते विशाळगड पायी वाटचाल करीत असताना पावनखिंड पाहावी. येथील माती, माणसं वाचावीत. आपली संस्कृती जाणून घ्यावी, असे आवाहन केले.

प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी या मार्गावरील विविध वाड्या-वस्त्यांवरील सामाजिक जीवनाची बाजू जाणून घ्यावी, असे आवाहन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी इतिहासातील व्यक्तींमधील पर्यावरणविषयक जाणिवांविषयी विवेचन केले. यावेळी देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पन्हाळा येथील संजीवन नॉलेज सिटीचे चेअरमन पी. आर. भोसले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव एन.आर. भोसले,  विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, प्राचार्य डॉ. जैन, उपप्राचार्य सपाटे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये यांनी आभार मानले.

पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीम शिवाजी विद्यापीठामार्फत गेल्या पाच वर्षापासून आयोजित करण्यात येते. यंदाच्या मोहिमेत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे १५० स्वयंसेवक आणि शिक्षक व कर्मचारी सहभागी आहेत. मोहिमेचे संयोजन डॉ. पी. आर. माळी, संग्राम मोरे, आर. आर. पाटील, विजय नागाळकर, आनंदा घोडे, सुरेखा आडके आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी केले.

दरम्य़ान, आज सकाळी मोहिमे पन्हाळा येथील शिवा काशिद यांच्या पुतळ्यास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार वाहून सुरुवात करण्यात आली. यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यासही हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळीही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सहभागींना शुभेच्छा दिल्या आणि कुलगुरूंसह सर्वच मान्यवर मसाई पठारापर्यंत मोहिमेत सहभागी झाले.

Tuesday, 27 December 2022

शिवाजी विद्यापीठात डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती

 



कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. मनोज लेखक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 19 December 2022

फुले-आंबेडकरी विचारांतच समग्र समानतेची बीजे: डॉ. वंदना महाजन

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. वंदना महाजन, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. श्रावस्ती.

शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलताना डॉ. वंदना महाजन. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. दीपा श्रावस्ती.


डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: फुले-आंबेडकरी विचारांतच स्त्री-पुरूषादी समग्र समानतेची बीजे रुजलेली आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अधिविभाग प्रमुख तथा साहित्यिक डॉ. वंदना महाजन यांनी आज सायंकाळी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आज डॉ. दीपा श्रावस्ती लिखित आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया (विमेन इन डॉ. आंबेडकर्स मूव्हमेंट) या संशोधन ग्रंथाचा प्रकाशन समारंभ राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

Vandana Mahajan
डॉ. वंदना महाजन यांनी आपल्या भाषणात अगदी वेदकाळापासून स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा आणि योगदानाचा वेध घेतला. त्या म्हणाल्या, एकीकडे स्त्रीचे देवतेपासून ते आईपर्यंतचे स्वरुप समाज दाखवित होता, त्याचवेळी दुसरीकडे व्यवस्थेच्या विरोधातील स्त्रियांचे मात्र नकारात्मक चित्रण करीत होता. त्यामुळे महिलांचे सामाजिक स्थान हे सातत्याने पुरूषी आक्रमकपणापुढे आकुंचित झाले. समग्रापासून स्त्रियांचा धागा तुटला. हा खंडित झालेला धागा फुले-आंबेडकरी चळवळीने पुन्हा जोडण्याचे काम केले. धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांची सखोल चिकित्सा करून घटनेच्या माध्यमातून स्त्रियांना समग्र समानता प्रदान केली.

डॉ. महाजन पुढे म्हणाल्या, वासाहतिक कालखंडात सामाजिक-धार्मिक पुनरुत्थानाच्या चळवळी उदयास आल्या पण महात्मा फुले वगळता अन्य चळवळींची झेप ब्राह्मण स्त्रियांच्या उद्धारापलिकडे गेल्याचे दिसले नाही. आगरकरांचा काही अंशी अपवाद इथे होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही चळवळ अधिक जोमाने पुढे घेऊन जातात. त्याचप्रमाणे फुले यांचा स्त्रीशिक्षणाचा मुद्दाही ते तडीस नेतात. भारतीय समाजाच्या श्रेणीबद्ध उतरंडीमध्ये सर्वाधिक वंचितता दलित स्त्रियांच्या वाट्याला आली. वर्गशोषण, जातीशोषण आणि पुरूषसत्ताक शोषण अशा त्रिस्तरीय शोषणाच्या त्या बळी होत्या. लैंगिकतेच्या पातळीवरही स्त्री उपभोगवादाची बळी होती. बाबासाहेब या सर्व स्तरांवर स्त्रीमुक्तीचा हुंकार तीव्र करतात. अपमानातून मानवतावादाकडे स्त्रियांना घेऊन जाताना माणूस म्हणून नाकारलेले हक्क त्यांना प्रदान करतात. नवयानाची मांडणी करताना त्यामधील स्त्रियांचे समानतेचे स्थान अधोरेखित करताना बुद्धाशीही त्यांचे नाते नव्याने जोडतात.

डॉ. दीपा श्रावस्ती यांच्या संशोधनातून बाबासाहेबांच्या चळवळीमधी स्त्रियांचे योगदान प्रकर्षाने सामोरे येतेच, पण त्यातून विविध नवीन संशोधन प्रकल्पांचे सूचनही होते, असे कौतुकही डॉ. महाजन यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा अनेकांगांनी वेध घेत राहण्याची आवश्यकता आहे. हिंदू कोड बिल प्रकरणावरुन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन कोल्हापुरात प्रथमच आल्यानंतर सन १९५२मध्ये येथील विविध जातीधर्मांच्या नऊ महिला मंडळांनी त्यांना विशेष मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. स्त्रीमुक्तीची बीजे या देशात रोवणारा तो क्षण होता. डॉ. श्रावस्ती यांनी एक उत्तम संशोधनग्रंथ साकारला असून येथून पुढे या विषयाच्या अनुषंगाने संशोधनकार्य पुढे चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. दीपा श्रावस्ती यांनी हा संशोधनग्रंथ म्हणजे आपल्या सर्व पूर्वमातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असून वर्तमानातील महिलांना प्रेरित करण्यासाठी केलेली कृती असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. शिर्के आणि डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते विमेन इन डॉ. आंबेडकर्स मूव्हमेंट या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. केंद्राचे संचालक तथा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. हरिष भालेराव, डॉ. गिरीष मोरे, डॉ. प्रभाकर निसर्गंध, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. योगेश साळी, डॉ. रविंद्र श्रावस्ती, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, विलास सोयम आदी उपस्थित होते.

Sunday, 18 December 2022

शिवाजी विद्यापीठाला सलग तिसऱ्या वर्षी

गार्डन क्लब पुष्प स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

 'क्वीन ऑफ दि शो'सह विविध ३० गटांत पटकावली एकूण ४९ पारितोषिके

 

गार्डन क्लबच्या पुष्प स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक सुनिता थोरात यांच्या हस्ते स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव आणि त्यांचे सहकारी. सोबत उपस्थित मान्यवर.

कोल्हापूर, दि. १८ डिसेंबर: येथील गार्डन क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५२व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठास सलग तिसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या गुलाबास क्वीन ऑफ दि शोचा बहुमानही लाभला. दि. १७ व १८ डिसेंबर २०२२ रोजी ही स्पर्धा महावीर गार्डन येथे पार पडली.

विद्यापीठाने विविध पुष्प स्पर्धांमध्ये एकूण १७ प्रथम क्रमांक, १४ द्वितीय क्रमांक आणि १८ तृतीय क्रमांक अशा एकूण ४९ पारितोषिकांसह 'सर्वसाधारण विजेतेपद' पटकावले. विद्यापीठाच्या दुरंगी गुलाबास क्वीन ऑफ दि शो या प्रदर्शन व स्पर्धेचा आज सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ झाला.

यावेळी समारंभाच्या प्रमुख पाहुण्या जीएसटी विभागाच्या सह-आयुक्त सुनिता थोरात यांच्या हस्ते विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव, स्वच्छता निरीक्षक शशिकांत साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आर.एल. तावडे फौंडेशनच्या शोभा तावडे यांच्यासह गार्डन क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, कोषाध्यक्ष राज अथणे आदी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागामार्फत या स्पर्धेसाठीची आवश्यक ती तयारी करण्यात आली. विद्यापीठास मिळालेल्या पारितोषिकांचा तपशील पुढीलप्रमाणे:

क्लास १: गुलाब ( एकच फूल): १. पांढरा (प्रथम, द्वितीय, तृतीय), २. फिका गुलाब (प्रथम, द्वितीय तृतीय), ३. गडद गुलाब (प्रथम), ४. नारिंगी (प्रथम), ५. किरमिजी (तृतीय), ६. फिका पिवळा (प्रथम, द्वितीय, तृतीय), ७. गडद पिवळा (प्रथम, तृतीय), ८. पट्टे असलेला (प्रथम), ९. दुरंगी (प्रथम (क्वीन ऑफ शो)), १०. मिश्र रंग (प्रथम, तृतीय).

क्लास २: गुलाब (एकाच जातीचे): १. एकूण ६ फुले (प्रथम, तृतीय), २. एकूण ९ फुले (प्रथम, तृतीय)

क्लास ३: बटण गुलाब (द्वितीय)

क्लास ४: बटण गुच्छ: १. पॉलीएंथा (प्रथम, द्वितीय, तृतीय)

क्लास ६: गुलाब ३ टप्प्यातील (प्रथम)

क्लास ७: फुले: १. डेलिया (द्वितीय), २. ग्लाडीओलस (द्वितीय, तृतीय), ३. झिनिया (द्वितीय, तृतीय), ४. अस्टर (तृतीय), ५. कर्दळ (प्रथम), ६. शेवंती (तृतीय), ७. सालविया (प्रथम, द्वितीय), ८. निशिगंध (द्वितीय), ९. जास्वंद (तृतीय).

 

क्लास ९ : कुंड्यातील रोपे: १. गुलाब (प्रथम, द्वितीय, तृतीय), २. फर्न (तृतीय), ३. क्रोटोन (प्रथम, द्वितीय), ४. कोलीअस (द्वितीय, तृतीय) ५. इतर झाडे (फुलाशिवाय) (द्वितीय), ६. औषधी व सुगंधी वनस्पती (तृतीय).