Saturday, 20 May 2023

चित्रपटांचा विविधांगी संशोधकीय अभ्यास होणे आवश्यक: प्रा. माया पंडित

‘अंडर द लेन्स: फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात ‘अंडर द लेन्स: फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. अनमोल कोठडिया, डॉ. माया पंडित, डॉ. तृप्ती करेकट्टी.


कोल्हापूर, दि. १९ मे: चित्रपटांचा कलेच्या पलिकडे जाऊन विविधांगांनी संशोधकीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सिनेसाक्षरता वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रा. माया पंडित यांनी केले. त्या ‘अंडर द लेन्स: फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकाच्या  प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. 

शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे काल (दि. १९) ‘अंडर द लेन्स: फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. हे पुस्तक इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी आणि डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी संयुक्तरित्या संकलित व संपादित केले आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ईएफएल विद्यापीठाच्या माजी प्र-कुलगुरू प्रा. माया पंडित व चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.

प्रा. माया पंडित म्हणाल्या, कोल्हापूरने भारतीय सिनेमाच्या जडणघडणीत दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे, याचे विसमरण होऊ देता कामा नये. आपल्या कोल्हापुरात सिनेमा आणि संस्कृती व लिंगभावना या अतिशय महत्त्वाच्या विषयावर परिषद होते आणि त्यातील चर्चेचे पुस्तकरुपाने प्रकाशन होते आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर आणि भारतीय सिनेसृष्टीची सुरवात व प्रवास उलगडला. विविध उदाहरणे देऊन सेन्सॉरशीप, स्त्रीचे क्रयवस्तू म्हणून सादरीकरण याविषयीही मांडणी केली. चित्रपटांकडे पाहण्याचा निकोप दृष्टीकोन विकसित होण्यासाठी शिक्षणामध्ये सिनेमाला स्थान देण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडीया यांनी चित्रपटांचा समाजव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी विवेचन केले. समर नखाते यांचा पुस्तकातील लेख सिनेमाचे बदलते स्वरूप आणि सामाजिक वास्तव समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड तसेच इटालियन सिनेमाच्या विवेचनामुळे हे पुस्तक बहुसांस्कृतिक झाले आहे. या सर्वच सांस्कृतिक परिस्थितीमध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र फारसा वेगळा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रकाशित केली जाणारी पुस्तके अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत, यासाठी ती ऑडिओबुक स्वरूपात देखील तयार करण्यात यावीत, अशी सूचना त्यांनी केली.

डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. त्यानंतर प्रा. तृप्ती करेकट्टी यांनी पुस्तकाचा आशय व प्रकाशनामागील उद्देश स्पष्ट केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. मेघा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुप्रिया पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, अधिसभा सदस्य श्री. मिठारी, डॉ. पारिजात, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. अरुंधती पवार, डॉ. श्रुती जोशी यांच्यासह इंग्रजी विभागातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुस्तकाविषयी थोडक्यात...

‘अंडर द लेन्स: फिल्म्स, जेंडर अँड कल्चर’ या पुस्तकात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२२ या कालावधीत पार पडलेल्या ‘एक्सप्लोरिंग द इंटरसेक्शन ऑफ लिटररी स्टडीज, फिल्म स्टडीज अँड जेंडर स्टडीज’ या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय वेबिनारमध्ये सादर करण्यात आलेल्या निवडक शोधनिबंधांचे संकलन करण्यात आले आहे. क्रिसेंट पब्लिशिंग कॉर्पोरेशन, नवी दिल्ली यांनी ते प्रकाशित केले आहे.


Friday, 19 May 2023

विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल व क्रीडा वसतिगृह: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 कलरपुरस्कार वितरण समारंभात न्यू कॉलेज सलग सहाव्यांदा सर्वसाधारण विजेते

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सन २०२१-२२मधील सर्वोत्कृष्ट क्रीडा कामगिरी बजावणारे महाविद्यालय म्हणून दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांना क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषक प्रदान करून गौरविण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक स्वीकारताना प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंच्या वार्षिक गुणगौरव समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. प्रकाश गायकवाड.

शिवाजी विद्यापीठाच्या कलर पुरस्कार विजेत्या खेळाडू मान्यवरांसमवेत

शिवाजी विद्यापीठाचे कलर पुरस्कार विजेते खेळाडू व संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक मान्यवरांसमवेत



कोल्हापूर, दि. १९ मे: शिवाजी विद्यापीठात लवकरच अत्याधुनिक कुस्ती संकुल आणि सुसज्ज व स्वतंत्र क्रीडा वसतीगृह साकार होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आणि द्वितिय खेलो इंडिया स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खेळाडूंच्या गुणगौरव समारंभात (कलर एवॉर्ड) ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड आणि क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सन २०२१-२२मधील सर्वोत्कृष्ट क्रीडा कामगिरी बजावणारे महाविद्यालय म्हणून दि न्यू कॉलेज, कोल्हापूर यांना क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषक प्रदान करून गौरविण्यात आले. न्यू कॉलेजने सलग सहाव्या वर्षी हा बहुमान प्राप्त केला आहे. या महाविद्यालयात सर्वाधिक ५७८ गुण प्राप्त झाले.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले. शिवाजी विद्यापीठाच्या मिशन ऑलिंपिक मोहिमेला बळ देण्याचे काम सर्व खेळाडू करीत असल्याचे सांगून ते म्हणाले, विद्यापीठाच्या खेळाडूंनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांतील विविध क्रीडा प्रकारांत १०२ आणि खेलो इंडिया स्पर्धेत २२ पदके पटकावली. ही संख्या लक्षणीय आहे. त्यातही महिला खेळाडूंची संख्या आणि यशाची कमान ही चढती आहे. महिलांनी एकूण १३ प्रकारांत तर पुरूषांनी १० प्रकारांत पदके मिळविली आहेत. विद्यापीठाशी संलग्नित काही महाविद्यालयांत आता क्रीडा क्षेत्राला पूरक अशी परिसंस्था निर्माण झाली आहे. तथापि, महाविद्यालयांतून हे खेळाडू जेव्हा पदव्युत्तर शिक्षणात येतात, तेव्हा त्यांचे क्रीडा विषयाकडे दुर्लक्ष होते. मात्र, करिअर म्हणून आता क्रीडा क्षेत्राची निवड करण्यास पोषक वातावरण आहे. विद्यापीठानेही क्रीडापटूंसाठी विविध योजना व सवलती जाहीर केलेल्या आहेत. खेळाडूंच्या मागण्या व गरजांची पूर्तता करण्यासाठी क्रीडा विभाग तत्पर आहे. पायाभूत क्रीडा सुविधांचा विकास करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. इनडोअर खेळांसाठी आधुनिक संकुल उभारण्याचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अत्याधुनिक कुस्ती संकुल उभारण्यात येणार आहे. त्याचा आणि स्वतंत्र क्रीडा वसतीगृहाचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या कामास प्रारंभ करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विद्यापीठाचे खेळाडू विविध आणि रग्बी, कयाकिंगसारख्या नवनव्या क्षेत्रांत घवघवीत यश मिळवताहेत, ही अभिमानाची बाब आहे. कोल्हापूर ही क्रीडापंढरी आहे. त्यामुळेच या मातीत शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू तयार झाले आहेत. विद्यापीठाच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपले प्रभुत्व सिद्ध केले आहेच, आता त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी उंचावण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी करिअर करण्याच्या नादात खेळातून आनंद मिळविणे मात्र सोडू नका, असा मौलिक सल्ला खेळाडूंना दिला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिर्के तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना ब्लेझर, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संघव्यवस्थापक, क्रीडा प्रशिक्षक यांचाही ब्लेझर व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. न्यू कॉलेजच्या वतीने नागेशकर चषक प्राचार्य डॉ. व्ही.एम. पाटील यांनी स्वीकारला.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू मयूर रोकडे, स्वाती शिंदे आणि स्वप्नाली वायदंडे यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तसेच सायटेशन सर्टिफिकेट वाचन डॉ. शरद बनसोडे यांनी केले. डॉ. दीपक डांगे-पाटील यांनी सूसंचालन केले, तर डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.

Thursday, 11 May 2023

विद्यापीठात राजर्षी छत्रपती शाहू महाराज माहितीपट महोत्सव उत्साहात

माहितीपटांतून उलगडले शाहूंचे कार्य; 'कोल्हापूर ते मिरज रेल्वे' ठरला सर्वोत्कृष्ट

शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या राजर्षी शाहू माहितीपट महोत्सवातील विजेत्यांना पारितोषिक वितरण प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे व विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांच्यासमवेत (डावीकडून) विक्रम रेपे, डॉ. शिवाजी जाधव, अनुप जत्राटकर, अनमोल कोठाडिया, डॉ. सुमेधा साळुंखे, जगदीश गुरव व परशराम पवार.
(समोर उभे) पारितोषिक विजेते चेतन सूर्यवंशी, समृद्धी पाटील, पल्लवी पाटील व सिमरन ठाणेकर.

शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या राजर्षी शाहू माहितीपट महोत्सवातील प्रथम पारितोषिक विजेता चेतन सूर्यवंशी यास पारितोषिक प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) अनुप जत्राटकर, अनमोल कोठाडिया, डॉ. विलास शिंदे, डॉ. निशा पवार.



कोल्हापूर, दि. ११ मे: शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय माहितीपट महोत्सव २०२३चे आज आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात पार पडलेल्या या महोत्सवात शाहू महाराजांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे १९ माहितीपट नोंदवले होते. विजेत्या पाच माहितीपटांचे स्क्रीनिंग यावेळी करण्यात आले. विजेत्यांना प्रथम, द्वितीय तसेच विशेष परीक्षक पुरस्कार, छायाचित्रण, संकलन आणि ध्वनी अशा स्वरुपाची पारितोषिके तसेच शिवाजी विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी होते, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

महोत्सवात चेतन सूर्यवंशी यांच्या 'कोल्हापूर ते मिरज रेल्वे' या माहितीपटास प्रथम, समृद्धी पाटील यांच्या 'साठमारी'ला द्वितीय, सोनाली हुंबरे यांच्या 'मोतीबाग तालीम'ला विशेष परीक्षक पुरस्कार उत्कृष्ट ध्वनी अशी पारितोषिके  देण्यात आली. सिमरन ठाणेकर यांच्या 'लक्ष्मी-विलास पॅलेस' पल्लवी पाटील यांच्या ''विचार शाश्वत वसतिगृहांचा' या माहितीपटांना अनुक्रमे उत्कृष्ट छायाचित्रण उत्कृष्ट संकलन पारितोषिके मिळाली. पारितोषिक विजेत्यांसह इतर सहभागींनाही शिवाजी विद्यापीठाचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज हे आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे चरित्र जागतिक पातळीवर पोहोचावे, महाराज सगळ्यांना कळावे, या उद्देशाने शाहू महाराजांचे चरित्र २७ भाषांमध्ये प्रकाशित करण्याचे काम सुरु आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शाहूंचे योगदानाचा जागर निश्चित घडून आला आहे. विद्यार्थांनी शाहू महाराज अंगी करावे त्यामुळे शाहू महाराजांसारखे आदर्श व्यक्तिमत्व नक्की घडतील’, असे मत  कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.

लोकोत्तर व्यक्तींचे कर्तृत्व महान असते. नि:स्वार्थ भावनेतून समाज हिताचे कार्य अशा व्यक्तींकडून होत असते. असे व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज होत. अशा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्वावर माहितीपट निर्मितीचे काम विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक आहे, असे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले.

या महोत्सवासाठी चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमादरम्यान दोन्ही परीक्षकांनी माहितीपट निर्मितीबाबतच्या तांत्रिक बाबी, संशोधन, संहिता लेखन आदींबाबत माहिती दिली.

महोत्सवाच्या आयोजक डॉ. निशा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उद्देश स्पष्ट केला, तसेच मान्यवरांचा परिचय करून दिला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, परशराम पवार यांनी परिश्रम घेतले. पल्लवी पाटील जावेद तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले.